अरुसा आलम : कॅ. अमरिंदर सिंह यांच्यासोबत नाव जोडलं जाणारी ही पाकिस्तानी महिला कोण आहे?

कॅप्टन अमरिंदर सिंह अरुसा आलम यांच्यासोबत

फोटो स्रोत, CAPTAIN AMRINDER SINGH FB

फोटो कॅप्शन, कॅप्टन अमरिंदर सिंह अरुसा आलम यांच्यासोबत
    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला पत्रकार अरुसा आलम यांच्यासोबतच्या त्यांच्या संबंधांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांना सप्टेंबर महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे विरोधक पत्रकार अरुसा आलम यांचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसोबत संबंध असल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सिंह यांनी आपल्या फेसबुक पेजवर भारतीय पदाधिकाऱ्यांसोबत अरुसा आलम यांचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

दरम्यान, अरुसा आलम यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मी खूप नशीबवान आहे. कारण अमरिंदर यांनी या जगात मला मित्र म्हणून निवडलं आहे. आमची बौद्धिक आणि आयक्यू पातळी एकसारखी आहे.

पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी शुक्रवारी (22 ऑक्टोबर) अरुसा आलम यांच्या आयएसआयशी असलेल्या संबंधांच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर ट्वीटरवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

अमरिंदर सिंह यांनी त्यानंतर म्हटलं, "माझ्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मंत्री होता. तेव्हा तुम्ही कधी अरुसा आलम यांच्याबद्दल तक्रार केली नाही. त्या 16 वर्षांपासून भारत सरकारकडून मंजुरी घेऊन येत आहेत."

अरुसा आलम यांनी इंटरव्ह्यूमध्ये काय म्हटलं?

इंटरव्ह्यूमध्ये अरुसा यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, पंजाब काँग्रेसच्या नेत्यांच्या विधानांमुळे मी खूप दुःखी आणि निराश झालीये. आता मी कधी भारतात नाही येणार.

अरुसा आलम एका शिष्टमंडळासोबत सोनिया गांधी यांची भेट घेताना

फोटो स्रोत, CAPTAIN AMRINDER SINGH FB

फोटो कॅप्शन, अरुसा आलम एका शिष्टमंडळासोबत सोनिया गांधी यांची भेट घेताना

उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा आणि पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांवर टीका करताना अरुसा यांनी म्हटलं, "हे लोक इतक्या खालच्या पातळीवर उतरतील यावर मला विश्वास बसत नाहीये. सुखजिंदर रंधावा, पीपीसीसी प्रमुख नवजोत सिंह सिद्धू आणि त्यांची पत्नी (नवजोत कौर सिद्धू) तरसाप्रमाणे आहेत.

ते कॅप्टन यांची प्रतिमा खराब करण्यासाठी माझा वापर करत आहेत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीयेत का? ते माझा वापर करून आपला राजकीय उद्देश साधत आहेत का?"

अमरिंदर सिंह यांच्यासोबतच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना अरुसा आलम यांनी म्हटलं,

"मला त्यांना सांगायचं आहे की, प्लीज जरा मोठे व्हा. आधी आपलं घर सावरा. पंजाबमध्ये काँग्रेसनं लोकांचा विश्वास गमावला आहे. युद्ध सुरू असताना सेनापती कोण बदलतं? काँग्रेस दिशाहीन झाली आहे आणि दुभंगलेली आहे."

आयएसआयसोबत संबंध असल्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले.

अरुसा यांनी म्हटलं की, "मी गेल्या दोन दशकांपासून भारतात येत आहे. कॅप्टन यांच्या निमंत्रणावरून मी गेल्या सोळा वर्षांपासून येत आहे आणि त्याच्या आधी पत्रकार म्हणून किंवा शिष्टमंडळाच्या सोबतही आले आहे. मग माझ्या संबंधांबद्दल आताच जाग का आली आहे?"

अरुसा आलम त्यांच्या दौऱ्यावर आणि व्हिसावर उपस्थित झालेल्या प्रश्नावर सांगतात, "जेव्हा कोणी पाकिस्तानातून भारतात येतं, तेव्हा त्यांना खूप किचकट प्रक्रियेतून जावं लागतं. कोणतीही प्रक्रिया टाळली गेली नाहीये. जी तपासणी होते, ती पण केली गेली. हे क्लिअरन्स रॉ, आयबी, केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून घ्यावे लागतात. ते ऑनलाइन व्हिसाचा फॉर्मही भरून देत नाहीत. या सर्व संस्था मला अशीच परवानगी देत आहेत का?"

अरुसा आलम आणि राजकारण

पंजाबचं राजकारण जवळून पाहणारे तज्ज्ञ सांगतात की, अमरिंदर सिंह आणि अरुसा आलम यांची मैत्री कोणापासून लपून राहिली नाहीये. पुढच्या वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि यामुळेच या प्रकरणाला हवा दिली जातीये, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्यासोबत अरुसा आलम

फोटो स्रोत, CAPTAIN AMRINDER SINGH FB

फोटो कॅप्शन, भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्यासोबत अरुसा आलम

अमरिंदर सिंह यांनी फेसबुकवर अरुसा आलम यांचे भारतीय शिष्टमंडळासोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यातून त्यांना कदाचित हे दाखवून द्यायचं आहे की, अरुसा आलम यांचे भारत दौरे काही गोपनीय नव्हते आणि त्या ज्यांना भेटत होत्या, ते सगळे काय आयएसआयचे एजंट होते का?

राजकीय विश्लेषक विपिन पब्बी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "सिद्धू, रंधावा जे प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांना पहिल्यापासून कॅप्टन आणि अरुसा यांच्या मैत्रीबद्दल माहीत होतं. त्या कॅप्टन यांच्याच घरी राहायच्या हे पण त्यांना माहीत होते. त्यांनी तेव्हा प्रश्न का नाही उपस्थित केले?

आता जेव्हा कॅप्टन मुख्यमंत्री नाहीयेत आणि त्यांचे विरोधक आता हा राजकीय मुद्दा बनवत आहेत, जेणेकरून अमरिंदर यांची बदनामी होईल. त्यातही अमरिंदर स्वतंत्र पक्ष काढून काँग्रेस आणि सिद्धू यांना विरोध करण्याची भाषा करत असताना हा मुद्दा समोर आला आहे. पण याचा फारसा परिणाम होणार नाही."

पंजाबच्या राजकारणात नवजोत सिंह सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील संबंध कोणापासून लपून राहिले नाहीत.

विपिन पब्बी यांनी म्हटलं की, अरुसा आलम या अमरिंदर सिंह यांच्यासोबत बैठकांमध्ये भाग घ्यायच्या आणि काही निर्णयांवरही त्यांचा प्रभाव असायचा, असा विरोधकांचा आरोप आहे. आता या गोष्टी उघडपणे बोलल्या जाऊ लागल्या आहेत. अरुसा आलम ही गोष्ट मान्य करत नाहीत, मात्र सामान्य लोकांमध्ये ही भावना आहे.

कोण आहे अरुसा आलम?

बीबीसी उर्दूच्या सहयोगी हुदा इकरम सांगतात की, अरुसा आलम यांनी पत्रकारितेची सुरुवात 80 च्या मध्यात केली होती आणि त्या संरक्षण विषयक प्रश्नांचं रिपोर्टिंग करतात.

ऑगस्टा-90 पाणबुडीच्या व्यवहारचं वार्तांकन केलं होतं आणि त्यातला गैरव्यवहार बाहेर काढला होता. हा व्यवहार फ्रान्स आणि पाकिस्तानच्या दरम्यान झाला होता. त्यांच्या रिपोर्टिंगमुळे पाकिस्तानचे तत्कालीन नौसेना प्रमुख मंसरुल हक यांना अटक झाली, असंही म्हटलं जातं.

अरुसा आलम

फोटो स्रोत, CAPTAIN AMRINDER SINGH FB

फोटो कॅप्शन, अरुसा आलम

त्या अकलीम अख्तर यांची मुलगी आहेत. त्यांचे वडील तत्कालीन राष्ट्रपती याह्या खान यांचे जवळचे मित्र होते, असं म्हटलं जातं. अरुसा आलम यांच्या अनेकांसोबत ओळखी आहेत आणि त्या राजकीय वर्तुळात प्रभावशाली मानल्या जातात. त्यांना 'जनरल राणी' म्हणूनही संबोधलं जातं.

त्या साउथ एशिया फ्री मीडिया असोसिएशनच्या अध्यक्षाही होत्या. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा एक मुलगा अभिनेता आहे आणि दुसरा वकील आहे.

2004 साली अमरिंदर सिंह जेव्हा पाकिस्तान दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांची भेट लाहौरमध्ये अरुसा आलम यांच्याशी झाली होती.

2017 साली अमरिंदर सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथ ग्रहण समारंभात अरुसा आलम सहभागी झाल्या होत्या. 'द पीपल्स महाराजा' या कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यातही अरुसा आलम या सहभागी झाल्या होत्या.

अमरिंदर सिंह यांच्या पुस्तकातही अरुसा आलम यांचा उल्लेख आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)