नवज्योत सिंग सिद्धू 1996 मध्ये इंग्लंड क्रिकेट दौरा अर्धवट सोडून तडकाफडकी परत का आले?

फोटो स्रोत, Getty Images
पंजाबमध्ये राजकीय नाट्य घडतंय. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
"पंजाबचं भवितव्य आणि पंजाबच्या नागरिकांचं कल्याण यासाठी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. त्यामुळे मी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी यापुढेही काँग्रेससाठी काम करत राहीन", असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रकात म्हटलं आहे.
सिद्धू यांनी केलेल्या बंडामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
अशात सोशल मीडियावर चर्चा होतेय ती सिद्धूंच्या आणखी एका बंडाची. 'कॅप्टनशी न पटल्यामुळे अर्ध्यातून निघून जायची ही सिद्धूची पहिली वेळ नाही' अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत.
त्यांचा रोख अर्थातच नवज्योत सिंग सिद्धू आणि अझरूद्दीन वाद आणि सिद्धूने क्रिकेटचा दौरा अर्धवट सोडून परत येणं याकडे आहे. ही घटना 1996 ची आहे.
त्या दौऱ्यात नक्की काय घडलं होतं?
भारतीय संघ 1996 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. सिद्धू त्यात सलामीचे फलंदाज होते. पण ऐन दौऱ्यादरम्यान कॅप्टन मोहमंद अझरउद्दीन यांच्याशी वाद झाल्यामुळे ते चालू दौरा अर्धवट सोडून भारतात परत आले होते.
सिद्धूंनी या प्रकरणी नक्की काय घडलं यावर भाष्य कधी केलं नाही, पण अंतर्गत मतभेदांमुळे हा दौरा आपण अर्धवट सोडत आहोत असं ते म्हणाले होते.
त्याकाळी भारतीय संघाचे व्यवस्थापक आणि नंतर बीसीसीआयचे सचिव असणाऱ्या जयवंत लेले यांनी आपल्या पुस्तकात या घटनेची आठवण लिहिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लेले आपल्या 'आय वॉज देअर, मेमोअर्स ऑफ क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेटर' या पुस्तकात लिहितात की
"अझरउद्दीन सतत वाईट बोलायचे. शिव्या द्यायचे. हे सहन न झाल्यामुळे सिद्धूंनी आपला दौरा अर्धवट सोडला."
ते पुढे असंही लिहितात की, "सिद्धूंना ज्या शिव्या वाटल्या, ते शब्द अझरउद्दीनच्या आसपास, ते जिथले होते त्या हैद्राबादमध्ये सामान्यपणे वापरले जायचे. त्याचा अर्थही वेगळा होता. सिद्धूंचा गैरसमज झाला होता."
लेले यांनी या प्रकरणावर सविस्तर लिहिलं आहे.
त्यांच्या पुस्तकात ते उल्लेख करतात की या घटनेनंतर क्रिकेट बोर्डाने यासाठी चौकशी समिती नेमली. पण नक्की काय झालं हे सांगायला सिद्धूंनी नकार दिला.
लेले लिहितात, "सिद्धू आपल्या म्हणण्यावर ठाम होते की दौरा अर्धवट सोडून परत येणं ही त्यांची चूक होती आणि त्याचे परिणाम भोगायला ते तयार आहेत. पण दौऱ्यात अझहर आणि त्यांच्या काय झालं हे त्यांनी कोणाला सांगितलं नाही"
शेवटी असं ठरलं की या चौकशी समितीतला एक सदस्य बदलून त्यांच्या जागी पंजाबी बोलणारा दुसरा सदस्य आणावा म्हणजे आपल्या मातृभाषेत बोलणारा व्यक्ती पाहून खाजगीत का होईना सिद्धू नक्की काय झालं ते सांगतील.
सुनिल गावस्कर यांच्या जागी मोहिंदर अमरनाथ समितीत आले.
सिद्धूंना परत पाचारण करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी समितीसमोर काहीच सांगितलं नाही पण ब्रेक झाल्यानंतर मोहिंदर सिद्धूंना बाजूला घेऊन गेले आणि घडल्या प्रकाराबद्दल विचारलं.

फोटो स्रोत, facebook
लेले लिहितात, "फिरून आले तेव्हा मोहिंदर हसत होते तर सिद्धू यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. मोहिंदर यांनी समितीला सांगितलं की काहीही झालेलं नाही आणि आपण हे प्रकरण विसरून जाऊ. नंतर समितीला खरं कारण कळलं. अझरूद्दीन सिद्धूंना हाक मारताना असे काही शब्द वापरायचे की जे उत्तर भारतात शिव्या समजले जातात पण अझरूद्दीनच्या हैद्राबादमध्ये सहजपणे वापरले जातात. सिद्धूंशी बोलताना अझरूद्दीन त्यांचा अपमान करत नव्हते तर दोस्ती खात्यात बहात मारत होते पण सिद्धूंचा गैरसमज झाला."
आणि गंमत म्हणजे झाल्या प्रकाराची अझहरउद्दीन यांना काहीच कल्पना नव्हती. त्यांनाही कळलं नव्हतं की सिद्धू दौरा अर्धवट सोडून का गेले.
अलिप्त राहाण्याचा स्वभाव
बीबीसीचे जेष्ठ पत्रकार रेहान फजल सिद्धूंच्या स्वभावाविषयी बोलताना म्हणतात की त्यांचा स्वभाव मुळात अलिप्त राहाण्याचा होता. ते फारसे कोणात मिळून मिसळून राहायचे नाहीत.
सिद्धूंनी इंग्लंडचा दौरा अर्धवट का सोडला याची आणखी थिअरी आहे असं रेहान फजल म्हणतात.

फोटो स्रोत, Ani
"एका टेस्ट मॅचमध्ये अझहरउद्दीन यांनी सिद्धूंना खेळवलं नाही. पण याची कोणतीही पूर्वकल्पना सिद्धू यांना दिलेली नव्हती. त्यांना अगदी टॉस झाला तेव्हा सांगितलं गेलं. याचा राग आला म्हणून ते परत आले असं म्हणतात."
पण या प्रकरणामुळे त्यांना 10 टेस्ट मॅचमध्ये खेळू दिलं नव्हतं आणि यानंतर सिद्धूंनी कमबॅक केलं.
रेहान त्यांच्या स्वभावाचं वर्णन करताना असंही म्हणतात की त्यांचा खेळ आणि करियर यावरून तरी असंच दिसतं की सिद्धू मागचा पुढचा विचार न करता तडकाफडकी निर्णय घ्यायचे.
"कोणत्याही दौरा असा अचानक पूर्वकल्पना न देता अर्धवट सोडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. पण तसं करताना सिद्धू एकदाही कचरले नाहीत."
सिद्धू खेळताना फारसं कोणाशी बोलायचे नाहीत, नर्व्हस असायचे, पण ते कॉमेंट्री करायला लागले तेव्हा त्यांचं एक नवं रुप सगळ्यांना दिसलं.
त्यांची कॉमेंट्री भरपूर लोकप्रिय झाली होती पण या काळात काही वादही झाले. ESPN या खेळाशी संबधित वाहिनीने त्यांचा करार रद्द केला कारण त्यांनी ऑन एअर एक शिवी दिली होती.
रेहान म्हणतात की, "सिद्धूंच खेळाचं करियर त्यांच्या राजकीय करियरसारखं रंगीत आणि अनेकविध घटनांनी भरलेलं होतं. तुम्ही त्यांच्याही असहमत होऊ शकता पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








