पंजाब निवडणूकः नवज्योत सिंग सिद्धू पंजाब काँग्रेससाठी किती महत्त्वाचे आहेत?

नवजोत सिंह सिद्धू

फोटो स्रोत, ANI

    • Author, अरविंद छाब्रा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

27 सप्टेंबर रोजी पंजाबमध्ये नवे मंत्री त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारत होते, त्याचवेळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी ट्विटरवर पोस्टद्वारे शेअर केलेल्या राजीनाम्यानं पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला.

सिद्धू यांनी दोन दिवसांनंतर एक व्हीडिओ पोस्ट करत राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलं. नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या सरकारमध्ये कलंकित किंवा 'आरोप' असलेले अधिकारी आणि नेत्यांच्या नियुक्तीवर नाराज असल्याचं ते म्हणाले.

पक्षाचे काही नेते नवज्योज सिंग सिद्धू यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची समजूत काढण्यासाठी अशा 'कलंकित' नेते आणि अधिकाऱ्यांना हटवणार का?

तसंच सिद्धू यांना समजावण्यासाठी पक्ष कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतो? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सिद्धू यांचं पक्षातील स्थान

नवज्योत सिद्धू यांना याच वर्षी जुलै महिन्यात पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मात्र, या निर्णयानं तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आनंदी नव्हते.

नवजोत सिंह सिद्धू

फोटो स्रोत, ANI

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं सरकार महत्त्वाचे निर्णय घेण्यात सक्षम नसल्याच्या मुद्द्यावरून, सिद्धू हे सातत्यानं त्यांच्यावर टीका करत होते. तरीही सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष बनल्यामुळं त्यांच्यात वाद होणं स्वाभाविक होतं. पण यामुळं झालेला परिणाम म्हणजे, इतर काही नेतेदेखील कॅप्टन यांच्या विरोधात बोलू लागले आणि मुख्यमंत्री बदलाची मागणी करू लागले.

विधीमंडळ पक्षाचे नेते असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना न सांगताच पक्षानं विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आणि अखेर अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

पंजाब काँग्रेसमध्ये अशा प्रकारचं संकट निर्माण होताच, त्रिपत राजिंदर सिंग बाजवा यांनी आमदारांना एकत्र करायला सुरुवात केली होती, असं ज्येष्ठ पत्रकार जगतार सिंग म्हणाले.

"नवज्योत सिंग सिद्धू यांना केवळ पुढं करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांना लोक माझ्यामुळंच एकत्र आले, असा भ्रम होत होता," असंही ते म्हणाले.

कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रिपदावरून हटल्यानंतर नवज्योत सिद्धू यांचं पक्षामधलं वजन चांगलंच वाढलं देखील, मात्र मुख्यमंत्री बनण्यासाठी ते पुरेसं नव्हतं.

सिद्धू सुपर सीएम?

सिद्धू यांनी आमदारांची पसंती असलेल्या सुखविंदर सिंग रंधावा यांनाही मुख्यमंत्री बनवण्यास नकार दर्शवला होता. अखेर चरणजीत चन्नी मुख्यमंत्री बनले.

मागासवर्गीय समुदायातील ते पंजाबचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले. पंजाबमध्ये जवळपास एक तृतीयांश दलित लोकसंख्या आहे. त्यामुळं या माध्यमातून काँग्रेसनं दलित वोटबँकेला आकर्षित करण्याच्या संधीचं सोनं केलं.

दरम्यान, सिद्धू हे सुरुवातीला चन्नी यांच्याबरोबर अनेक ठिकाणी दिसले. त्यामुळं ते सुपर सीएम आहेत आणि चन्नी हे केवळ चेहरा आहेत, असं वाटू लागलं होतं. मात्र, चन्नी हे काही रबर स्टॅम्प नेते नाही, हे त्यांना ओळखणाऱ्यांना चांगलंच ठाऊक आहे. शिवाय चन्नी यांनीही ते सिद्ध करायला वेळ लावला नाही.

सुरुवातीला कॅबिनेट मंत्र्यांची यादी आली. त्यात सिद्धू यांचा फारसा प्रभाव दिसला नाही. मात्र पोलिस महासंचालक आणि महाधिवक्ता अशा अधिकाऱ्यांची निवड करतानाही, त्यांची पसंती असलेल्या उमेदवारांची निवड झाली नाही. त्यामुळं सिद्धू यांना हवं ते होत नसल्याचं स्पष्ट होतं.

एजी आणि डीजी

सध्याचे एजी म्हणजे महाधिवक्त्यांनी पंजाब सरकारच्या विरोधात माजी पोलिस महासंचालक सुमेध सैनी यांच्या बाजूनं खटला लढला होता. त्यांना जामीन मिळवून देत, पंजाब सरकारला मोठा धक्काही दिला होता.

त्यामुळं, पोलिस महासंचालक इकबाल सिंग सहोता यांचं नाव न घेता सिद्धू यांनी आरोप केले. ज्यांनी बादलांना (माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि त्यांचे कुटुंब) क्लीन चीट दिली होती, त्यांना पदं दिल्याचं सिद्धू यांचं म्हणणं आहे.

डीजीपी इक्बाल सिंह सहोता

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, डीजीपी इक्बाल सिंह सहोता

पंजाब पोलिसांनी मात्र, सहोता यांनी असं काही केलं नसल्याचं म्हणत, आरोप फेटाळून लावले आहेत.

हे प्रकरण गुरू ग्रंथ साहिबच्या अवमानाचं आहे. हा पंजाबमधील मोठा मुद्दा असून त्याचा संबंध लोकांच्या भावनांशी आहे.

2015 मध्ये बरगाडी गांवातील गुरुद्वारा साहिबच्या बाहेर विकृत भाषेत काही पोस्टर लावले होते. त्यात शिखांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या गुरू ग्रंथ साहिबचा अवमान करण्यात आला होता. त्यानंतर शिखांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली होती आणि याच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली होती.

या प्रकरणाचा तपास इकबाल प्रित सिंग सहोता यांच्या नेतृत्वातील विशेष तपास पथकानं (एसआयटी) केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं होतं. या प्रकरणी गावातीलच दोन गुरशीख तरुणांना अटक करत त्यांना आरोपी ठरवण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांना क्लीन चीट देत, इतर 7 लोकांची नावं समोर आली आणि 5 जणांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी सिद्धू यांनी दोन जणांना चुकीच्या पद्धतीनं आरोपी बनवण्यात आल्याचा आरोप करत, नाराजी व्यक्त केली आहे.

गुरु ग्रंथ साहेब

फोटो स्रोत, Getty Images

या अवमान प्रकरणातील आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवणार असल्याचा उल्लेखही ते वारंवार करत आहेत. त्यामुळं जर अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असेल, तर न्यायाची अपेक्षा कशी करणार असं सिद्धू यांचं म्हणणं आहे.

त्याशिवाय सिद्धू यांनी "कलंकित" असलेल्या नेत्यांवरही आक्षेप घेतला आहे. मात्र त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतलेलं नाही.

हेदेखिल सिद्धू यांच्या नाराजीचं एक कारण मानलं जात असल्याचं जगतार सिंग म्हणाले. "चन्नी यांनी आता स्वतः नियुक्तींबाबत स्पष्टीकरण द्यावं," असं त्यांचं म्हणणं आहे.

चरणजीत चन्नी यांनी आपल्यात काहीही "इगो" नसून या निर्णयांवर पुनर्विचारही केला जाऊ शकतो, असं म्हटलं आहे. मात्र काँग्रेस सिद्धू यांची समजूत काढण्यासाठी अधिकारी आणि मंत्री बदलणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री चन्नी यांनी दबावात येऊन या नियुक्ती रद्द केल्या तर त्यांच्या नियुक्तीवरच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात आणि त्यामुळं एक नवं संकट उभं राहील. त्यामुळं ते निर्णय मागं घेणार की, पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करू शकतील, हे पाहणं म्हत्त्वाचं आहे, असं चंदिगडधील पंजाब युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक खालीद मोहम्मद म्हणाले.

चरणजीत सिंह चन्नी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी सिद्धू यांच्यासोबत

अशा परिस्थितीत पक्षानं काय करायला हवं?

ज्या लोकांनी राजीनामे दिले आहेत, ते पक्षानं स्वीकारायला हवे. काही महिन्यांत निवडणुका होणार आहे. त्यामुळं सरकारनं जनतेच्या भल्यासाठी चांगले निर्णय घ्यावे, असं मत खालीद यांनी व्यक्त केलं.

सिद्धू किती महत्त्वाचे?

सिद्धू जेव्हा भाषण करतात तेव्हा त्यांच्या भावनिक, आक्रमक आणि रंजक शैलीनं ते लोकांना आकर्षित करतात हे खरं आहे. पण, त्यामुळं किती लोकं पक्षाला मतदान करतात यावर मतमतांतरं असू शकतात.

सोनिया गांधी आणि प्रियांका गांधींसोबत नवजोत सिंह सिद्धू

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधींसोबत नवजोत सिंह सिद्धू

"नवज्योत सिद्धू हे अलिकडच्या काळात सर्वात प्रसिद्ध नेते बनले आहेत. मात्र त्यांनी घाई केल्यामुळं विश्वासार्हता गमावली," असं मत ज्येष्ठ पत्रकार जगतार सिंग यांनी मांडलं.

त्यामुळं सिद्धू काँग्रेससाठी महत्त्वाचे तर आहेत. मात्र, ते पक्षाध्यक्ष नसतील किंवा पक्षातच नसतील तरी फार मोठं नुकसान होणार नाही, असंही मत पक्षातील काही जणांनी मांडलं आहे.

मात्र, यावेळी सिद्धू यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यांची वेळीच उत्तरं न दिल्यास पक्षाला त्यामुळं मोठं नुकसानही होऊ शकतं, ही एक मोठी अडचण आहे.

विरोधी पक्षदेखील निवडणुकीत या मुद्द्यांचा वापर करण्यात मागं राहणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)