कन्हैया कुमार यांनी खासदार होण्याच्या घाईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला का?

कन्हैया कुमार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, वात्सल्य राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कन्हैया कुमार हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) तिकिटावर बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढले होते.

यावेळी गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी हेही कन्हैया कुमार यांच्यासोबत होते. काही तांत्रिक कारणामुळे आपण काँग्रेसमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश करत नसल्याचं मेवाणी यांनी स्पष्ट केलं. पण काँग्रेसच्या चिन्हावर पुढची निवडणूक लढवू असंही ते म्हणाले.

भारताला वाचवण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं कन्हैया कुमार यांचं म्हणणं आहे. तसंच, त्यांच्या मते, काँग्रेसच महात्मा गांधी आणि भगत सिंह यांचं स्वप्न साकार करू शकते.

"तुम्ही तुमच्या शत्रूंची निवड करा, मित्र आपोआप बनत जातील. आम्ही देशातील सर्वांत जुन्या लोकशाहीवादी पक्षात प्रवेश करू इच्छित आहोत. कारण जर काँग्रेस वाचली तर देश वाचेल," असं ते म्हणाले.

गांधींच्या विचारांसह काँग्रेस पुढे जाईल, असा विश्वासही कन्हैया कुमार यांनी व्यक्त केला.

कन्हैया कुमार

फोटो स्रोत, Getty Images

कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवासंपासून सूत्रांच्या माध्यमातून मिळत होते.

काल (27 सप्टेंबर) काँग्रेसकडूनच स्पष्ट करण्यात आलं की, 28 तारखेला दुपारी कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी पक्षप्रवेश करतील. त्यानुसार आज त्यांचा प्रवेश झाला.

डाव्या विचारधारेचं काय झालं?

काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे की, कन्हैया कुमार यांच्या प्रवेशानं काँग्रेसला बळकटी मिळेल. तर दुसरीकडे, कन्हैया कुमारवर भाकपने 'संधीसाधू' असल्याचा आरोप केलाय. भाकपच्या दाव्यानुसार, कन्हैयाकडे ना कुठला जनाधार आहे, ना त्याने कुठला संघर्ष केलाय. अशावेळी कन्हैया कुमारना घेऊन काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही.

भाकपचे वरिष्ठ नेते अतुल कुमार अंजान यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "कन्हैया कुमार राज्यसभेत जाण्याच्या घाईत आहे."

"कन्हैया कुमार यांना संसद आणि राज्यसभेत पोहोचण्याची घाई झालीय. मी त्यांना शुभेच्छा देतो की, काँग्रेसमध्ये गेलेत तर लोकसभा-राज्यसभेत जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होवो," असं अतुल कुमार अंजान म्हणाले.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Twitter/@RahulGandhi

"भाकपमध्ये विचारधारेला महत्त्व आहे आणि कन्हैया कुमारसाठी विचारधारेचं महत्त्व नाहीय. कन्हैया कुमार मोठ्या कालावधीपासून राजकीय पक्षाच्या शोधात होते," असाही दावा अतुल कुमार अंजान करतात.

"जर कन्हैया कुमार यांच्या विचारधारेत त्रुटी नसतील तर त्या काँग्रेसमध्ये का गेले असते? याआधी ते जदयूमध्ये जात होते. चार महिन्यांपूर्वी याची मोठी चर्चा होती. नितीश कुमार यांनाही ते भेटले होते," असं ते म्हणाले.

निर्णय घेताना कन्हैया कुमार यांनी भाकपला अंधारात ठेवलं?

अतुल कुमार अंजान दावा करतात की, काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याबाबत कन्हैया कुमार यांनी भाकपला अंधारात ठेवलं.

त्यांच्या माहितीनुसार, "तीन दिवसांपूर्वीच कन्हैया कुमार पक्षाच्या कार्यालयात आले होते. त्याआधी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीत माझ्या शेजारीच ते बसले होते."

काँग्रेस आणि बिहारच्या राजकारणाचा अभ्यास असणारे वरिष्ठ पत्रकार उर्मिलेश यांच्या मते, कन्हैया कुमार यांचा काँग्रेसप्रवेश त्यांची 'महत्त्वाकांक्षा' दाखवून देतो.

त्यांच्या मते, या निर्णयाचा विचारधारेशी काहीही संबंध नाही.

उर्मिलेश सांगतात, "भारतात भाकपची अवस्था फार वाईट आहे. त्यातला एक तरुण नेता, जो महत्त्वाकांक्षी आहे, त्याला राजकारणात करिअर करायचं आहे, त्यानुसार त्यानं पक्षाचा शोध घेतला आणि मग काँग्रेसमध्ये गेला."

कन्हैया कुमार

फोटो स्रोत, Twitter/Srinivas BV

"जर ते महत्त्वाकांक्षी नसते, तर गेल्यावेळी त्यांनी बेगूसरायमधून लोकसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला नसता. हा पूर्णपणे विचारधारेचा प्रश्न आहे. हा पूर्णपणे राजकीय महत्त्वाकांक्षेचा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीला निर्णय घेण्याचा हक्क आहे," असं उर्मिलेश म्हणतात.

उत्तर भारतात भाकपची अवस्था पाहता कन्हैया कुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला असावा, असं ते म्हणतात.

'भाकपनं पुढे आणलं'

अतुल कुमार अंजान मात्र उर्मिलेश यांच्याशी सहमत नाहीत. ते दावा करतात की, कन्हैया कुमार आज जो काही आहे, तो भाकपच्या संघटनेमुळे आहे.

ते पुढे म्हणतात, "कन्हैया कुमार यांच्यात कुठलीच संघटनात्मक क्षमता नव्हती. ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भाकपमुळे बनले आणि त्यांनी पुढच्या वेळेस ती संघटनाच मोडून टाकली. आमचा एकही माणूस तिथं निवडणूक लढण्यायोग्य राहिला नाही."

"आम्ही त्यांना बेगूसरायमधून लोकसभेचं तिकीट दिलं. ती जागा आम्ही सहावेळा जिंकलो होतो. पूर्वी आम्ही 10-15 लाखांच्या आत निवडणूक लढत असू. माहित नाही, कन्हैया कुमार यांनी कोट्यवधी रुपये कुठून गोळा केले. क्राऊड फंडिंग आणि इतर निधींनंतर निवडणुकीचा प्रचार वेगवान झाला. निकालात मात्र ते 4 लाख 20 हजार मतांनी पराभूत झाले. असा पराभव तर आम्ही कधीच पाहिला नव्हता," असं अतुल कुमार अंजान म्हणतात.

ते पुढे म्हणतात की, "कुठलाच वर्गसंघर्ष कन्हैया कुमार यांनी केला नाहीय. वर्गसंघर्षातून तर ते येत नाहीत, ना कुठल्या ट्रेड युनियनमध्ये त्यांनी काम केलंय. शेतकऱ्यांसाठी ना त्यांनी काम केलंय, ना मजुरांसाठी त्यांनी काम केलंय. ज्या भागातले ते आहेत, तिथे आम्ही 54 हजार मतांनी जिंकलोय."

वरिष्ठ पत्रकार उर्मिलेश म्हणतात की, मीडियातून मिळालेल्या 'हाईप'मुळे कन्हैया स्वत:ला राष्ट्रीय नेते समजू लागले.

कन्हैया कुमार

फोटो स्रोत, Twitter/@srinivasiyc

"त्यांना इतका हाईप मिळाला की, ते 'नॅशनल फिगर' बनले. खरंतर ते एका कॅम्पसमधले नेते होते. जनतेतलं काम, राजकीय व्यवहार, समाजात जाऊन काम करणं, हे त्यांनी कधीही केलं नाहीय. विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या भाषणातून ते लोकप्रिय झाले. विद्यार्थी संघटनेत विजयानं जेवढी त्यांची योग्यता होती, त्यापेक्षा जास्त त्यांचं प्रोजेक्शन झालं. मला वाटतं, त्यांना वाटायला लागलंय की, ते मोठे नेते बनलेत," असं उर्मिलेश म्हणतात.

तर अतुल कुमार अंजान म्हणतात की, कन्हैया कुमारने कुठलाच 'वर्गसंघर्ष' पाहिला नाही आणि पक्षातही कुठलेच योगदान दिले नाही.

"नॅशनल काऊन्सिल आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत एकदाच त्यांना घेतलं. दौऱ्यावर जाण्यासाठी विमानचं तिकीट पक्ष देत असे. तीन-चार कार्यकर्त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सोबत नेत असत," असं अतुल कुमार अंजान सांगतात.

कन्हैय्या कुमारने पक्ष सोडल्यानं भाकपला काहीही फरक पडणार नाही असा दावा अंजान करतात.

"भाकपला काहीही फरक पडणार नाही. भाकपचे अध्यक्ष राहिलेले श्रीपाद अमृत डांगे हेही एकदा पक्ष सोडून गेले होते, पक्षाला काहीही फरक पडणार नाही," असं अंजान म्हणतात.

काँग्रेसला काय फायदा?

कन्हैया कुमार सोबत आल्यानं काँग्रेसला काही फायदा होईल का, या प्रश्नावर उर्मिलेश म्हणतात, काँग्रेसच्या रणनितींवरून कळेल की परिणाम काय असेल.

कन्हैया कुमार

फोटो स्रोत, DEBAJYOTI CHAKRABORTY/NURPHOTO VIA GETTY IMAGES

"2018 च्या निवडणुकीत काँग्रेसनं राजस्थानमध्ये विजय मिळवला. मध्य प्रदेशही जिंकला. छत्तीसगडही जिंकला. मात्र, मध्य प्रदेशमधील सत्ता गमावली. त्यांनी योग्य पद्धतीनं योग्य लोकांना सरकारमध्ये आणलं नाही. यात कुठे ना कुठेतरी काँग्रेसचा विचारांच्या पातळीवर कमकुवतपणा आहे. काँग्रेसकेड नवा कुठला विचार नाहीय," असं उर्मिलेश म्हणतात.

"भारतातल्या सर्वांत जुन्या पक्षात नवा कंटेट भरावा लागेल. राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना कदाचित माहित नसेल की, नवा कंटेट काय आहे. तोपर्यंत काँग्रेस पक्ष बाहेरील नेत्यांना पक्षात आणून पक्षाला बळकटी मिळणार नाही. जनाधार वाढवावा लागेल. जर तुमच्याकडे नेते येत असतील आणि जनाधार वाढत नसेल, तर तुम्ही काय कराल? तुम्ही पाहिलं असाल, उत्तर प्रदेशात काँग्रेसची काय स्थिती आहे. हेच मोठं संकट आहे काँग्रेसचं," असंही उर्मिलेश म्हणतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)