अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, अकाली दल आणि आपला जे जमलं नाही ते सिद्धूंनी करून दाखवलं

अमरिंदर सिंग

फोटो स्रोत, @Capt.Amarinder

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर देशहितासाठी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाला विरोध करणार असल्याचं म्हटलं आहे.

"देशासाठी मी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाला विरोध करेल. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांचे मित्र आहेत. तसंच त्याठिकाणचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत," असं त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी शपथ घेतली त्यावेळी सिद्धू यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांनी पाकिस्तानात जायला नको, असं म्हटलं होतं.

मात्र, सिद्धू यांनी त्यांचा सल्ला न ऐकता ते पाकिस्तानला गेले होते.

त्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची त्यांनी गळाभेटही घेतली होती. त्यावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर कठोर शब्दांत टीकाही केली होती. भारत-पाकिस्तान दरम्यानचा करतारपूर कॉरीडोर प्रत्यक्षात साकारताना पाहायचा असल्याची इच्छा असल्याचं, बाजवा म्हणाले होते, असं सिद्धू यांनी सांगितलं.

करतारपूर साहेब शीख धर्मियांसाठीचं प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ आहे. शिखांचे पहिले गुरू, गुरु नानक यांनी याठिकाणी त्यांच्या जीवनातील अखेरची काही वर्ष घालवली होती. ते ठिकाण आता पाकिस्तानात आहे.

नवीन मुख्यमंत्री सोनिया गांधी निवडणार?

अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती.

पंजाब काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर हरिश रावत यांनी बैठकीत दोन प्रस्ताव स्वीकारले असल्याचं सांगितलं होतं.

कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाबमध्ये चांगलं काम केलं आहे. त्यांचं मार्गदर्शन पक्षाला मिळत राहील, अशी अपेक्षा असल्याचं रावत म्हणाले होते.

पक्षाचा दुसरा महत्त्वाचा प्रस्ताव नव्या मुख्यमंत्र्यांबाबत होता. मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय सोनिया गांधी करतील, असं रावत म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग दुपारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मी सकाळी काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा केली. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांना सांगितलं. आमदारांना दिल्लीत बोलावलं. दुसऱ्यांदा बोलावलं. आता तिसऱ्यांदा बोलावलं.

"माझ्या नेतृत्वावर शंका घेण्यात आली. मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. दोन महिन्यात तीनदा आमदारांना बोलावण्यात आलं. ज्यांच्यावर पक्षनेतृत्वाला विश्वास त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात येईल."

ते पुढे म्हणाले, "राजकीय भवितव्याचा विचार केला जाईल. माझे पाठीराखे, समर्थक यांच्याशी बोलेन. साडेनऊ वर्ष मी मुख्यमंत्रीपदी होतो. योग्य वेळ येईल तेव्हा राजकीय भविष्याचा निर्णय घेईन."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

असं असलं तरी अमरिंदर अन्य कोणत्या पक्षात जाणार का? अमरिंदर स्वत:चा वेगळा पक्ष काढणार का? अमरिंदर आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार काय भूमिका घेणार यासंदर्भात अमरिंदर यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. पंजाबमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरिंदर यांच्या पुढच्या राजकीय निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिंधू यांच्यात वाद सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसनं पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्त केली होती.

अकाली दल-आप यांना जे जमलं नाही ते सिद्धू यांनी एकट्याने करून दाखवलं

बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर यांनी पंजाब काँग्रेसमधील घडामोडींचं केलेलं विश्लेषण :

पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष स्वत: निर्माण केलेल्या गुंत्यामध्ये अडकला आहे. अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातील वादाच्या नाट्यात काँग्रेसने पुरेसा वेळ गमावला आहे. यामुळे पक्षाची आणि सरकारची प्रतिमा डागाळली असून, 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याच्या काँग्रेसच्या आशाअपेक्षांना सुरुंग लागला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अपमानास्पद पद्धतीने मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं आहे. केंद्रीय निरीक्षकांनी आयोजित केलेल्या आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहा असा आदेश काँग्रेस हायकमांडने दिला होता. कॅप्टन अमरिंदर हे पंजाब काँग्रेसचे गड मानले जात. जवळपास दशकभर त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. कॅप्टन अमरिंदर यांना देण्यात आलेल्या वागणुकीचा फटका काँग्रेसला लवकरच बसू शकतो.

काँग्रेसची रणनीती सोपी होती. राज्यातील नेते आणि आमदारांशी चर्चा केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर यांच्याविरोधात अनेकजण असल्याचं स्पष्ट झालं होतं. सरकारविरोधात असलेली नाराजी आणि कॅप्टन अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करणं असं केल्यास आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग सुकर होईल असं काँग्रेसमधील अनेक नेत्यांना वाटतं.

राजीनामा सोपवताना अमरिंदर सिंग

फोटो स्रोत, @Capt.Amarinder

फोटो कॅप्शन, राजीनामा सोपवताना अमरिंदर सिंग

वर्षभरापूर्वी अमरिंदर यांच्यासाठी परिस्थिती फारशी वाईट नव्हती. त्यांना भेटणं अवघड आहे, रोजगारनिर्मितीत सरकार मागे आहे, काही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही याबद्दल चर्चा होत असे मात्र उद्रेक होईल असा असंतोष खदखदत नव्हता. हा उद्रेक निर्माण करण्याचं श्रेय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर राजकारणात आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना जातं.

भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी कर्तारपूर कॉरिडॉरवेळी पाकिस्तानचे जनरल बाजवा यांना आलिंगन दिलं होतं. यावरून सिद्धू यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये कॅप्टन अमरिंदर यांचाही समावेश होता.

सिद्धू यांनी सरकारविरोधातली नाराजी कॅबिनेट बैठकांमध्ये बोलून दाखवली होती. कॅप्टन अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं होतं. यामुळे दोन वर्षांनंतर सिद्धू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र गेल्या वर्षभरात सिद्धू यांनी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कॅप्टन अमरिंदर यांच्यावर टीकेची झोड उठवली. आश्वासनांची पूर्तता न झाल्याने कॅप्टन अमरिंदर यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाल्याचं चित्र सिद्धू यांनी तयार केलं.

अमरिंदर सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमरिंदर सिंग

याचाच परिणाम होत, कॅप्टन अमरिंदर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सुखबीर सिंग यांच्या अकाली दलाला तसंच आम आदमी पक्षाच्या भगवंत मान यांना एकत्रितरीत्या जे जमलं नाही ते सिद्धू यांनी एकट्याने करून दाखवलं. सिद्धू यांनी वैयक्तिक जोरावर काँग्रेसच्या सत्तारुढ मुख्यमंत्र्याला पदावरून बाजूला करण्यात निर्णायक भूमिका बजावली.

कॅप्टन अमरिंदर यांच्या मागील चार वर्षांच्या कार्यकाळात सगळं ठीक नसल्याचंही चित्र आहे. राज्यात ड्रग्सवर नियंत्रण, प्रत्येक घरात रोजगार, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धार्मिक वास्तूची विटंबना तसंच नासधूसप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

कॅप्टन अमरिंदर यांच्याविरोधातील आवाजाला सिद्धू यांनी ठोस बळकटी मिळवून दिली. काँग्रेस हायकमांडचा आशिर्वाद असल्याने सिद्धू यांनी पुकारलेल्या बंडाची घरोघरी चर्चा होऊ लागली.

आगामी काळ पंजाब काँग्रेससाठी आव्हानात्मक असणार आहे. अवघ्या चार महिन्यात निवडणुका आहेत. नवे मुख्यमंत्री, आधीचेच मंत्री यांच्यासह काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याचं आव्हान आहे. आम्ही आता बदललो आहोत, आम्हाला पुन्हा मत द्या हे मतदारांना पटवून देणं काँग्रेस नेत्यांसाठी अवघड असणार आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग, पंजाब, सिद्धू

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, कॅप्टन अमरिंदर आणि नवज्योत सिंग सिद्ध यांच्यातला बेबनाव काँग्रेससाठी घातक ठरला.

सिद्धू यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळावी यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धू यांची नियुक्ती व्हावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

गेल्या चार वर्षात जे करता आलेलं नाही ते पुढच्या चार महिन्यात काँग्रेसला करावं लागणार आहे. तूर्तास आगामी चार महिन्यांसाठी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख सुनील जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

प्रदीर्घ कालावधीसाठी सिद्धू यांच्याच नावाचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार होण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर यांनी राजकीय भविष्याचा निर्णय योग्यवेळी जाहीर करेन असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून 9 वर्षांचा अनुभव असल्याने पंजाब काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं वजन आहे. पंजाबच्या काही भागांमध्ये त्यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेससाठी आगामी काळ कठीण असेल.

अमरिंदर यांची राजकीय ताकद

2014 मध्ये बडे-बडे काँग्रेस नेते लोकसभा निवडणूक लढवणं टाळत होते, त्यावेळी सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अरूण जेटली यांच्याविरुद्ध अमृतसर मतदारसंघात निवडणूक लढवली. या निवडणुकीतत्यांनी जेटली यांना पराभूतही केलं. त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब विधानसभेत आमदार म्हणून कार्यरत होते.

2017 साली कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळवून काँग्रेस 10 वर्षांनंतर सत्तेत परतली.

केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून एक-एक राज्य काँग्रेसच्या हातातून निसटत असताना अमरिंदर सिंग यांनी पंजाबात मिळवलेला विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा होता.

या विजयामुळे भाजपची विजयी घोडदौड रोखण्याची कामगिरी सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केली.

2019 मध्ये पुन्हा एकदा मोदी लाटेची चर्चा होती. पण पंजाबमध्ये त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. इथल्या 13 लोकसभा जागांपैकी एकूण 8 जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलं. या विजयामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांची राजकीय उंची अधिकच वाढली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)