INDvsPak : सामन्याच्या सुरुवातीला टीम इंडिया गुडघ्यावर का बसली होती?

फोटो स्रोत, Reuters
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
पिचवर रोहित शर्मा आणि केएल राहुल आणि मैदानाबाहेर बाकीचे भारतीय खेळाडू एक गुडघा जमिनीवर टेकवून बसले आहेत. दुबईत ट्वेन्टी20 विश्वचषकातल्या बहुचर्चित भारत-पाकिस्तान सामन्याच्या सुरुवातीलाच हे दृश्य दिसलं.
भारतीय खेळाडू गुडघ्यावर बसलेले असताना पाकिस्तानच्या खेळाडूंनी हात छातीवर ठेवून आपलं समर्थन दाखवलं. टीम इंडियाच नाही, तर या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडीजचे खेळाडूंही असेच काही क्षण गुडघ्यावर बसले होते.
या क्रियेला इंग्रजीत Taking the knee (टेकिंग द नी) असं म्हटलं जातं.
पण असं एक गुडघा टेकवून बसण्यामागे काय अर्थ असतो? अशी चर्चा लगेच सोशल मीडियावर सुरू झाली.
Take the Knee मागे अर्थ काय?
एक गुडघा जमिनीवर टेकवून बसणं, हे आता वर्णद्वेषाविरोधात मोहिमेचं एक प्रतीक बनलं आहे. अमेरिकेत सुरू झालेली ही पद्धत जगभरातल्या खेळाडूंनी स्वीकारली आहे, पण त्यावरून वादही झाला आहे.
याची सुरूवात झाली 2016 साली. अमेरिकन फुटबॉलर कोलिन केपरनिक त्यावेळी एका सामन्याआधी राष्ट्रगीतादरम्यान उभं न राहता गुडघा जमिनीवर टेकवून बसला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ज्या राष्ट्रध्वजाच्या नावाखाली कृष्णवर्णीय नागरिकांवर अत्याचार होतो आहे, त्या ध्वजाचा अभिमान म्हणून मी उभं राहू शकत नाही असं त्यानं म्हटलं होतं. अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना आजही भेदभावाचा सामना करावा लागतो, याकडे त्यानं लक्ष वेधलं होतं.
त्यानंतर आणखी काही खेळाडूंनी राष्ट्रगीताच्या वेळेस उभं न राहता एका गुडघ्यावर बसण्याचा निर्णय घेतला

फोटो स्रोत, Getty Images
पण त्यावरून अमेरिकेत वाद उभा राहिला. डोनाल्ड ट्रंप यांनी असं वागून खेळाडू देशाचा अपमान करत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं, जे खेळाडूंना मान्य नव्हतं.
मग गेल्या वर्षी जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर ब्लॅक लाईव्ज मॅटर ही चळवळ उभी राहिली, तेव्हा ही मुद्रा या चळवळीचं प्रतीक बनली.
याचदरम्यान अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांविरोधातल्या लढाईचे नेते मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचा सेल्मा इथल्या आंदोलनापूर्वी प्रार्थना करताना एक गुडघा टेकवून बसलेल्या मुद्रेतला फोटोही व्हायरल झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षभरात जगभरात अनेक ठिकाणी आंदोलनादरम्यान आणि विशेषतः खेळाच्या सामन्यातून निषेध व्यक्त करण्यासाठी खेळाडूंनी असं एका गुडघ्यावर बसण्यास सुरुवात केली.
युरो कप फुटबॉलमध्ये इंग्लंडच्या काही खेळाडूंना वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला, तेव्हा इंग्लंडच्या महिला फुटबॉलर्सनीही गुडघ्यावर बसून निषेध व्यक्त केला होता.
गेल्या वर्षी आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान भारताच्या हार्दिक पंड्याही अशाच पद्धतीनं वर्णभेदाविरोधी लढाईला समर्थन दाखवत एका गुडघ्यावर बसला होता.
त्यानंतर आता विश्वचषकात अख्ख्या टीमनं हे पाऊल उचललं. तेही भारत आणि पाकिस्तानमधल्या लोकप्रिय सामन्यादरम्यान.
साहजिकच अनेकजण टीम इंडियाचं कौतुकही करत आहेत. पण काहींनी भारतीय खेळाडूंनी जातीयता आणि अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायाचाही निषेध करायला हवा, असं मतसुद्धा मांडलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








