दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीतला विजय शिवसेनेसाठी महत्त्वाचा का?

    • Author, प्राजक्ता पोळ,
    • Role, बीबीसी मराठीसाठी

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 45 हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या.

भाजपच्या महेश गावितांना कलाबेन डेलकर यांनी पराभूत केलं. महाराष्ट्राबाहेरून निवडून येणाऱ्या कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या पहिल्या खासदार ठरल्या आहेत.

या विजयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटलं, "महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेने ही पहिली पायरी ओलांडली आहे. आता झेप दिल्लीकडे असेल व्हाया दादरा नगर हवेली".

यावरून आता शिवसेना राष्ट्रीय पातळीवर पक्ष वाढवण्यास सक्रिय होतेय का? शिवसेनेला यात किती यश मिळेल? हे प्रश्न समोर येऊ लागले आहेत.

राजकीय पार्श्वभूमी काय?

कलाबेन डेलकर यांचे पती आणि दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 ला मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी डेलकर यांनी 'सुसाईड नोट' मध्ये काही भाजप नेत्यांनी त्रास दिल्याचे म्हटले होते.

डेलकर कुटुंबियांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून भाजप नेत्यांनी त्रास दिल्याचे सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारनेही डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उचलून धरला होता.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातही डेलकरांच्या आत्महत्येवरून महाविकास आघाडी सरकारने राज्यातील भाजप नेत्यांना टार्गेट केले होते. अँटेलिया जिलेटीन प्रकरण आणि त्याच्याशी असलेले सचिन वाझेंचे संबंध हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मोहन डेलकर प्रकरणही महाविकास आघाडीकडून उचलण्यात आले. त्यानंतर कलाबेन डेलकर आणि त्यांच्या मुलाने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.

मोहन डेलकरांच्या रिक्त जागेवर कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. मोहन डेलकर हे 7 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. ते काही काळ कॉंग्रेस आणि नंतर भाजपबरोबर होते. 2019मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.

जेष्ठ पत्रकार सचिन परब सांगतात, "मोहन डेलकरांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबियांना शिवसेनेत आणणं. त्याचबरोबर डेलकर कुटुंबियांनाही भाजपविरोधी लढण्यासाठी शिवसेना आहे असं वाटणं यात शिवसेनेचं यश आहे असं वाटतं".

शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर किती यश मिळालं आहे?

शिवसेना पक्षाची ओळख ही प्रादेशिक पक्ष म्हणून आहे. पण महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेने पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. पण आतापर्यंत त्याला फारसं यश मिळालेलं दिसलं नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर उत्तरप्रदेशमधून पवन पांडे हे शिवसेनेचे एकमेव आमदार निवडून आले होते.

त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी कलाबेन डेलकर या निवडून आल्या आहेत. यावेळी अभिनंदन करताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, "कलाबेन डेलकर यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर शिवसेनेकडून प्रचार केलेल्या कार्यकर्त्यांचे आणि ज्यांनी या निवडणुकीसाठी मेहनत घेतली ते संजय राऊत, अनिल देसाई, अभिनव डेलकर या सर्वांचेही अभिनंदन करतो."

2020 मध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने 23 उमेदवार निवडणूकीत उतरवले होते. तुतारी वाजवणाऱ्या मावळ्याचं चिन्ह यावेळी शिवसेनेला मिळालं होतं. पण 23 पैकी 21 उमेदवारांना 'नोटा'पेक्षाही कमी मतं मिळाली होती आणि सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

पुढच्यावर्षी उत्तरप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत शिवसेना 403 जागा लढविणार असल्याचं शिवसेनेचे उत्तरप्रदेशचे प्रभारी विश्वजित सिंह यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. यावर भाजपने टीका केली आहे. "उध्दव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यांना शुभेच्छा"! अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

शिवसेनेला राष्ट्रीय भूमिका स्पष्ट करणे गरजेचे?

1984 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची पहील्यांदा युती झाली होती. हिंदुत्वाच्या विचारधारेवर ही युती झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हापासून महाराष्ट्रात शिवसेना प्रभावशाली आणि राष्ट्रीय पातळीवर भाजप प्रभावी असं चित्र होतं.

लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "इतकी वर्षे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हे युतीचे कुटुंबप्रमुख आणि राष्ट्रीय पातळीवर प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे सर्वेसर्वा असा अलिखित नियम होता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर याला धक्का लागू लागला. महाराष्ट्रात भाजप पाय पसरू लागली आणि राज्यात शिवसेनेचा मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न करू लागली. यामुळे शिवसेनेने युतीमधून बाहेर पडून कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायचा निर्णय घेतला.

शिवसेनेने अद्याप राष्ट्रीय पातळीवरची त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. हिंदुत्ववादी विचारधारा असल्याचं जरी ते सांगत असले तरी सध्या ते धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर सत्तेत आहेत. भाजप हा पूर्णपणे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून काम करतोय. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेची असलेली संभ्रमाची भूमिका तितकीशी टिकेल असं वाटत नाही. "

दादरा नगर हवेलीच्या निवडणूकीनंतर शिवसेना राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होईल असं वाटतं नसल्याचंही संदीप प्रधान सांगतात.

सेना-भाजप युती तुटल्यापासून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं वारंवार भाजपकडून सांगण्यात येत आहे. पण काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नवं हिंदूत्वाची भूमिका मांडली. "हिंदुत्वाच्या नावावर दादागिरी करणे हे हिंदुत्व नसून सर्व समावेशक लोकांचा विचार करून घेतलेली भूमिका म्हणजे नवं हिंदुत्व" असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

जेष्ठ पत्रकार सचिन परब सांगतात, "ही नव हिंदुत्वाची भूमिका राष्ट्रीय पातळीवर उद्धव ठाकरेंनी मांडली. तशी संघटना बांधणी केली तर शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त होऊ शकतं. फक्त दादरा नगर हवेलीतून निवडणूक जिंकणं म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची सुरुवात झाली आहे असं म्हणता येणार नाही.

दादरा नगर हवेलीमध्ये बरेचसे मतदार हे मराठी आहेत. भाजपचा प्रभाव असणाऱ्या प्रांतांत शिवेसेनेने ताकद लावणं. त्यातून यश मिळवणं हे सोपं नव्हतं. त्यांनी करून दाखवलं हे नाकारता येणार नाही. पण हा सहानुभूतीचा पॅटर्न सगळीकडे पुन्हा घडेल हे ही शक्य नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)