You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्यन खान प्रकरणापासून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप राजकीय आखाडा का बनले?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांच्या महाविकास आघाडी सरकारला पुढच्या महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. परंतू सत्तास्थापनेपासून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात सुरू झालेला राजकीय संघर्ष आजही कायम आहे. किंबहूना दिवसेंदिवस तो तीव्र होताना दिसत आहे.
2 ऑक्टोबर 2021 पासून राज्यात आर्यन खान ड्रग प्रकरणाची सुरुवात झाली. पण हे प्रकरण केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलं नाही तर यातही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं राजकारण पहायला मिळालं.
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर महाराष्ट्राला बद्नाम करण्यासाठी केला जातोय अशी टीका महाविकास आघाडीने केली. तर ड्रग बाळगणाऱ्यांना तुम्ही पाठिशी घालू इच्छिता का? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला.
आता तर या प्रकरणाची दिशाही बदलताना दिसत आहे. कारण नवाब मलिक यांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग पेडलरशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत, तर फडणवीसांनी नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत प्रत्युत्तर दिलं आहे.
तेव्हा आर्यन खान प्रकरणापासून सुरू झालेल्या या घडामोडींचा राजकीय आखाडा कसा बनला? याचा फायदा कोणाला होतोय आणि याचा राजकीय फटका कोणाला बसू शकतो? याचा आढावा आपण घेणार आहोत.
आतापर्यंत काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी केंद्रीय तपास यंत्रणा असल्याने त्याचा भाजपशी संबंध जोडत, केंद्रीय तपास यंत्रणा राज्याला बदनाम करण्यासाठी वापरल्या जात आहेत असा आरोप केला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राला बद्नाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं म्हटलं, तर महाविकास आघाडी ड्रग बाळगणाऱ्यांना पाठिशी घालत आहे का असा प्रश्न भाजपने उपस्थित केला.
या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे की ज्ञानेश्वर वानखेडे यावरुन रान उठलं. समीर वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
समीर वानखेडे यांचीही याप्रकरणी आता चौकशी सुरू झालीय. आर्यन खान सह इतर आरोपींना ड्रग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हे प्रकरण थंड होत नाही तोपर्यंत नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला.
जयदीप राणा याला एनसीबीने जून 2021 साली ड्रेग पेडलर म्हणून अटक केल्याचा दावा मलिक यांनी केला असून जयदीप राणा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी जाहीर केले.
तसंच अमृता फडणवीस यांनी नद्यांच्या स्वच्छते मोहिमेसाठी जे गाणं गायलं होतं त्याचा फायनान्सर जयदीप राणा होता असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर देत नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्यासंबंधीचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं म्हटलंय. दिवाळीनतर हे पुरावे समोर आणणार असंही ते म्हणाले.
अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक राजकारण करत असल्याची टीका केलीय. जयदीप राणा हा रिव्हर मार्च या सामाजिक संस्थेने गाणं बनवण्यासाठी आऊटसोर्स केलेला व्यक्ती होता. त्यामुळे त्याच्याशी आपला काहीही संबंध नसून काम करत असताना अनेकांनी फोटो काढले तसा जयदीप राणा यानेही फोटो काढला असं स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिलं.
राजकारण वैयक्तिक पातळीवर केलं जात आहे का?
नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "नवाब मलिक हे बिघडेल नबाव आहेत, माझ्या हेतूवर शंका घेतल्यास मी सोडणार नाही. तुमची लढाई देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. मग राजकारणात मला का मध्ये आणलं जात आहे? मी राजकारणी नाही."
यावर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "गेल्या 26 दिवसांत दोन महिलांशिवाय मी कोणत्याही इतर महिलांवर आरोप किंवा कुणाचा उल्लेख केलेला नाही. दोन्ही महिलांचा उल्लेख आला कारण, त्यांच्याशी संबंधित काही बाबी आहेत. मात्र, तुम्ही आरोप करता त्या इतरांच्या कुटुंबातील महिला कुणाच्या आई, बहीण पत्नी नाहीत का? जे लोक महिलांबाबत मुद्दे उपस्थित करत आहेत त्यांना मी हा प्रश्न विचारू इच्छितो."
"किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या आईचा उल्लेख केला, बहिणीचा उल्लेख केला. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवलं. खडसेंच्या पत्नीला ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवलं. किरीट सोमय्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वारंवार नाव घेऊन आरोप करत आहेत."
आरोप झाले की, त्यांच्या घरातील महिला महिला आहेत, आणि इतरांच्या घरातील महिला महिला नाहीत का? असा सवाल करत आरोपांचा स्तर भाजपनं खाली आणला आहे आम्ही नाही," असं मलिक म्हणाले.
या वक्तव्यांवरुन राज्यातलं राजकारण आता वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीपर्यंत पोहचल्याचं दिसतं. राजकीय आणि जनतेच्या मुद्यांपेक्षा राजकीय नेत्यांकडून वैयक्तिक स्तरावर आरोप आणि टीका सुरू झाली आहे.
राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी सांगतात, "कोणी आम्हाला 'अरे' केलं तर आम्ही 'का रे' करायला तयार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार महाविकास आघाडीची ही तयारी असल्याचं यावरुन दिसतं. नवाब मलिकांचे फडणवीसांवर आरोप हा भाजपला एकप्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं."
"फडणवीस हे राज्यातला भाजपचा चेहरा मानले जातात. ते माजी मुख्यमंत्री आहेत, तसंच महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येतो.त्याला प्रत्युत्तर देण्यास आता महाविकास आघाडीने सुरुवात केलीय असं म्हणता येईल."
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढचा नंबर शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा आहे अशी प्रतिक्रिया दिली. यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "केंद्रीय तपास यंत्रणा काय तुमच्या बापाच्या आहेत का, हा अटक होईल, तो अटक होईल. तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात, त्या तारखा आम्ही सांगू. आम्हालाही माहिती आहे. पण या पातळीवर आम्ही उतरायचं का? महाराष्ट्राची प्रतिष्ठा, संस्कृती आम्हाला जपायची आहे."
या आरोप-प्रत्यारोपांमधून नेमकं राजकारणी काय साध्य करू पाहत आहेत? याबाबत सुनील चावके म्हणाले, "केवळ एकमेकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी ही स्पर्धा आहे. आपण मोठं होऊ शकत नाही तर समोरच्याला खाली खेचा. या राजकारणातून कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. ज्यांनी खेळ सुरू केला तेही त्यात अडकू शकतात. त्यामुळे हे राजकारण कोणत्या स्तरापर्यंत न्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे."
'एकटे नवाब मलिक का आरोप करतात?'
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक दररोज पत्रकार परिषद घेत आहेत. आर्यन खान प्रकरणी त्यांनी आपल्या परिषदांमधून एनसीबी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर त्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले.
आता नवाब मलिक यांनी देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पण नवाब मलिक हे सगळं का करत आहेत? महाविकास आघाडी सरकारचा एकच मंत्री दररोज पत्रकार परिषद का घेतात? एकटे नवाब मलिक का बोलत आहेत? असेही प्रश्न विचारले जातात.
तुम्ही करत असलेल्या आरोपांविषयी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांशी तुम्ही चर्चा केली का? असा प्रश्न बीबीसी मराठीने नवाब मलिक यांना विचारला असता ते म्हणाले, "आरोप जरी मी एकटा करत असलो तरी याबाबत मी चर्चा केली आहे. मी अन्यायाविरोधात बोलत आहे. मी गृहमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे."
यासंदर्भात बोलताना सुधीर सुर्यवंशी सांगतात, "नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्ष शरद पवार यांची सहमती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. कोणत्याही पक्षात आपल्या नेत्याने किती बोलावं, कशावर बोलावं हे ठरत असतं. या पाच वर्षांत फडणवीस यांच्यावर असा उघड आरोप करण्यात आला नव्हता. ज्याअर्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी हा आरोप केला ते पाहता याला पक्षाचे आणि सरकारचे पाठबळ आहे असे दिसते."
नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होण्यामागे आणखी एक कारण असल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसची नजर सध्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे आहे. नवाब मलिक यांच्याकडे मुंबईचं शहराध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांना पुढे आणल्यास मुंबई महापालिकेत फायदा होईल, असं पक्षाला वाटतं.
"नवाब मलिकही आपल्या पत्रकार परिषदांमधून मुद्देसूद युक्तिवाद करत आहेत. त्यांनी आतापर्यंत शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. पूर्वी त्यांच्या पत्रकार परिषदेची फारशी चर्चा व्हायची नाही. पण महिन्याभरात योग्य मुद्दे मांडून मीडियाचं लक्ष त्यांनी आपल्याकडे खेचलं आहे. पत्रकारांनाही त्यांच्या पत्रकार परिषदांना जावं वाटतं, हे महत्त्वाचं आहे," असं देसाई म्हणतात.
जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे का?
महाविकास आघाडी विरुद्ध भाजपच्या या सामन्यांमुळे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे का? राजकीय नेते दररोज एकमेकांवर चिखलफेक करत असल्याने जनतेचे मुद्दे कोण मांडणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात, "राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांकडे यामुळे दुर्लक्ष होतं. ही परिस्थिती सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी सोयीची आहे. लक्ष दुसरीकडे वळवण्यसाठी हे मुद्दे सोयीचे आहेत. यातून झटपट लक्ष वेधलं जातं. जे सोडवायचे मुद्दे आहेत ते मागे पडतात. यातून बरच काही साध्य होतं. प्रसिद्धी मिळते. ज्वलंत विषय मागे राहतात."
गेल्या महिन्याभरात पेट्रोल, डिझेलचे दर वाढले, एसटी चालकांचा संप चिघळला, आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षेत गोंधळ उडाला, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अशा अनेक लोकांच्या प्रश्नांवर राजकारण्यांनी बोलावं असं जनतेला अपेक्षित असतं. परंतु तसं होताना दिसत नाही.
सुधीर सूर्यवंशी म्हणाले, "सनसनाटी आरोप आणि प्रत्यारोपांमुळे मूळ प्रश्न बाजूला राहतात. जनतेचंही लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो. विरोधकांनीही सरकारला अशा प्रश्नांवर विचारलं पाहिजे. हे त्यांचंही अपयश आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)