You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे यांचा टोला, 'युतीमध्ये 25 वर्ष अंडी उबवली'
"राजकारणात इनक्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्ही 25-30 वर्षं चालवलं. आम्ही कर्तव्य केलं. इनक्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली, पुढे काय झालं ते तुम्ही बघताय. पुढे काय करायचं ते ज्याचं त्याने ठरवावं," असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामतीत बोलताना लगावला.
इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
"माझे पाय मी धरलेत. चालायला, उभं राहायला डगमगत नाही. डगमगणार नाही. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे की तरुणांनी स्वतच्या पायावर उभं कसं राहावं," असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
"पवारसाहेबांसारखा तरणाबांड नेता. पवारसाहेबांनी विकासाचा सूर्य दाखवला. सहस्रचंद्रदर्शन झालंय हे खरंच वाटत नाही. पवारसाहेब नेतृत्व करतात. राज्याचं करतात, संस्थांचं करतात. पवार कुटुंबीय तळमळीने मनापासून काम करत आहेत," अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवार कुटुंबीयांच्या कामाचं कौतुक केलं.
"माझी ही दुसरी बारामती भेट आहे. आधीच्या भेटीत शेतीतली प्रगती दिसली होती. पाठिंबा देता येत नसेल तर विघ्न आणू नका असं सांगेन. विघ्नसंतोषींना आनंद हा शब्द ठाऊक नाही. कल्पनेला पंख फुटण्याचं वय आहे. पंखांमध्ये गरुडाचं बळ ही संस्था देते आहे. बदल घडत असतो," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "भाग्याचा क्षण की देशातलं सगळ्यांत मोठं इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. माझा वाटा उद्घाटनापुरता आहे. 50 वर्षांपूर्वीची बारामती आणि आताची यात किती फरक पडला आहे.
"पवार साहेब तुम्ही दगडाला पाझर फोडून दाखवलात. अभ्यासासाठी परदेशात जाणारे असतात. परदेशात जाऊन तिथल्या गोष्टी इथे झाल्या पाहिजेत ही वृत्ती महत्त्वाची," असं ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "विसूभाई बापटांचं वाक्य आहे- कुटुंब रंगलंय काव्यात. पवार कुटुंब रंगलंय विकासाच्या ध्यासात गुंतलं आहे. राजकारणात टीकाकार असतात. आम्ही टीकाकार होतो. पण टीका करत असताना भान राखणं आवश्यक. आम्हीही टीका केली. पण शिवसेनाप्रमुख आणि पवार साहेबांची मैत्री जगजाहीर आहे. बारामतीत जाऊन शरदबाबू काय करतात ते बघायला पाहिजे. राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही."
बकिंगहॅम पॅलेसही आपल्याकडेच उभारला गेला असता...
"लंडनला कुटुंबासह गेलो होतो. कोणीतरी विचारलं आपल्याकडे असा बकिंगहॅम पॅलेस कधी उभा राहणार? मी म्हणालो आपण इंग्रजांना घालवलं नसतं तर हेही उभारलं असतं. त्यांना घालवलं नसतं तर अशी थडगी आपल्याकडे उभारली गेली असती."
"बारामती राजकारणाचं केंद्र आहे. बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. ज्या पद्धतीने पवार कुटुंब तनमनधन देऊन काम करतंय ते महत्त्वाचं. लालफितीचं काम नको. विकासाच्या आड कधीच येणार नाही.
"दिवाळी सुरू झालीच आहे. काहीजण म्हणताहेत की दिवाळीचे फटाके उडणारेत. काहीही करा पण धूर काढू नका. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. काळजी घ्यावी लागेल", असं मुख्यमंत्री म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)