You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनिल देशमुखांविरोधात कोणतेही नवे पुरावे द्यायचे नाहीत- परमबीर सिंह
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आपल्याकडे याहून अधिक पुरावा नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे.
"मला कोणाचीही उलट तपासणी करायची नाही. मला या प्रकरणी चौकशी आयोगासमोर कोणताही अधिकचे पुरावे सादर करायचे नाहीत," असं परमबीर सिंग यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
अनिल देशमुख हे 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असतील असे सांगण्यात आले आहे.
PMLA कायद्याच्या सेक्शन 19 अंतर्गत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी मुंबईच्या सेशन्स कोर्टात हजर केलं. कोर्टाला दिवाळीची सुट्टी असल्याने हॅालिडे कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं.
या प्रकरणी अनिल देशमुख याचे दोन स्वीय सहाय्यक संजय पालांडे आणि कुंदन शिंदे यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.
जुलैमध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडी कोठडी मागताना ईडीनं 14 दावे केले होते.
- अनिल देशमुख या कटाचे प्रमुख सूत्रधार.
- पालांडे यांनी जबाबात सांगितलंय की IPS अधिकाऱ्यांच्या बदली मागे अनिल देशमुख यांचा हात होता.
- सगळा व्यवहार रोखीने व्हायचा.
- संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मध्यस्थ आहेत.
- पैसे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जात होते.
- चौकशीत अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा थेट सहभाग असलेल्या 11 आणि अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या 13 कंपन्यांची भूमिका.
- चौकशीत उघड झालंय की अनिल देशमुख यांच्या अप्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यातून त्यांच्या प्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यात पैशांचा व्यवहार होत होता.
- हा मनी लॅांडरिंगचा प्रकार आहे,
- सचिन वाझे यांच्या जबाबानुसार त्यांना अनिल देसमुख यांच्याकडून काही प्रकरणात थेट आदेश मिळत होते.
- वाझे जबाबात सांगतात त्यांनी अनिल देशमुख यांच्या आदेशावरून 4.70 कोटी रूपये कुंदन शिंदे यांना दिले.
- अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत 4.18 कोटी रूपये ट्रान्सफर झालेत. पैसे देणाऱ्या दिल्लीच्या कंपन्या फक्त पेपरवर आहेत.
- हवालाच्या माध्यमातून पैसे दिल्लीहून नागपूरला आणण्यात आले.
- अनिल देशमुख यांना बार मालकांकडून 4.70 कोटी रूपये लाच म्हणून मिळाले.
- मुलगा ऋषीकेश देशमुख याच्या माध्यमातून दिल्लीच्या कंपन्यांना पैसे देऊन हा पैसा साई शिक्षण संस्थेत फिरवण्यात आला.
अनिल देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम
21 मार्च - रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं.
5 एप्रिल - अनिल देशमुख यांचा राजीनामा.
10 मे - ईडीने मनी लॅाडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला.
26 जून - अनिल देशमुख यांना पहिलं समन्स.
29 जून - दुसरं समन्स.
5 जुलै - तिसरं समन्स पाठवण्यात आलं.
16 जुलै - चौकशीसाठी चौथं समन्स देण्यात आलं.
17 ऑगस्ट - अनिल देशमुख यांना पाचवं समन्स.
2 सप्टेंबर- देशमुख यांनी बॅाम्बे हायकोर्टात समन्स रद्द करण्याची याचिका केली.
29 ऑक्टोबर - अनिल देशमुख यांची समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली.
1 नोव्हेंबर - अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर.
2 नोव्हेंबर - अनिल देशमुख यांना अटक.
मला कुणाचीही उलटतपासणी करायची नाही - परमबीर सिंग
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
'मला कोणाचीही उलट तपासणी करायची नाही. मला या प्रकरणी चौकशी आयोगासमोर कोणताही अधिकचे पुरावे सादर करायचे नाहीत," असं परमबीर सिंग यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सिंह यांनी 100 कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता. याच प्रकरणी देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने अटक केली. कोर्टाने अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवलंय.
अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर परमबीर सिंह बेपत्ता आहेत. परमबीर सिंह परदेशात पळून गेल्याची चर्चा आहे.
न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर वकील महेश पांचाल यांच्यामार्फत सिंह यांनी हे प्रतिज्ञापत्र 13 ऑक्टोबर रोजी दाखल केलं होतं. यात परमबीर सिंह म्हणतात,
- अनिल देशमुख प्रकरणात कोणतेही नवीन माहिती आयोगासमोर सादर करायची नाही.
- या प्रकरणी कोणाचीही उलटतपासणी करायची नाही आणि नवीन पुरावे आयोगासमोर ठेवायचे नाहीत.
- मुख्यमंत्र्यांना सर्व पुरावे देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतलीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रापेक्षा अधिक काहीच माहिती द्यायची नाही.
- परमबीर सिंह यांनी 11 ऑक्टोबरला याबाबत आपल्या वकीलांना माहिती दिली आहे.
परमबीर सिंह यांच्या प्रतिज्ञापत्राबाबत माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचे वकील शशीर हिरे बीबीसी मराठीशी बोलतान म्हणाले, "सिंह यांनी आयोगासमोर दाखल प्रतिज्ञापत्रात कोणतेही नवीन पुरावे सादर करायचे नाहीत असं म्हटलंय. त्याचसोबत त्यांना कोणाची उलटतपासणी करायची नाही असंही त्यांनी सांगितलंय."
चांदीवाल कमिशनने सिंह यांना चौकशीसाठी दोन वेळा समन्स पाठवले होते. पण सिंह आयोगासमोर चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत.
परमबीर सिंह परदेशात पळून गेल्याची चर्चा ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वीच हायकोर्टात माहिती देताना राज्य सरकारने परमबीर सिंह कुठे आहेत याची माहिती नसल्याचं सांगितलं होतं.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपास म्हणाले, "परमबीर सिंह याचं हे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट संकेत देतं की अनिल देशमुखांवर करण्यात आलेले आरोप चुकीचे होते. आम्ही पहिल्यापासूनच म्हणत होतो अनिल देशमुख यांना या प्रकरणात गोवण्यात आलं."
कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह परदेशात बेल्जियमला पळून गेल्याचा आरोप केला होता.
'देशमुखांवरील कारवाई नेत्यांना घाबरवण्यासाठी'
अनिल देशमुख यांनाही फसवण्यात आल्याचं नवाब मलिक म्हणालेत.
देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग फरार आहेत. आरोप करणारा फरार आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते चौकशीला सहकार्य करत आहेत, त्यांना अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई राजकीय हेतूनं करण्यात आली असून सरकारला बदनाम करण्यासाठी नेत्यांना धमकावण्यासाठी आहे, असा आरोप मलिकांनी केला.
आता अनिल परब यांनी बारी आहे, असे ट्वीट येत आहेत. अशाप्रकारे सत्तेचा वापर करून नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, असंदेखील मलिकांनी म्हटलं.
परमबीर सिंग पळून गेलेच कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. विमानमार्गे परमबीर पळून गेले असतील किंवा समुद्रामार्गे गेले असतील तर ते केंद्राच्या अंतर्गत येतं. रस्त्याच्या मार्गाने गेले असतील, तर ज्या तीन राज्यांतून ते जाऊ शकतात तिथं भाजपची सत्ता आहे, असं मलिक म्हणालेत.
त्यामुळे परमबीर यांना पळून जाण्यात मदत करण्यात आली का? त्यांच्या मार्फत खोटे आरोप करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याचंही उत्तर भाजप द्यावं लागेल, असं मलिक म्हणालेत.
मविआच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न - संजय राऊत
अनिल देशमुख यांना ईडीनं केलेली अटक हा दुर्दैवी प्रकार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. अनिल देशमुख न्यायालयीन लढाई लढत होते. ही अटक माझ्य मते कायद्याला आणि नितीमत्तेला धरून नाही, असं राऊत म्हणाले.
देशमुख यांच्यावर आरोप करणारे पळून गेलेले नाहीत, तर त्यांना पळवून लावलं आहेत. कोणीही केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच देशाबाहेर पळून जातो. महासंचालक दर्जाचा अधिकारी देश सोडून जातो तेव्हा त्याला केंद्रीय सत्तेचं पाठबळ असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही, असं राऊत म्हणाले.
चौकशी किंवा तपास करायला हरकत नाही. पण देशमुख पहिल्यांदाच ईडीसमोर हजर झाले तेव्हा त्यांना अटक होणं, चुकीचं असल्याचं राऊत म्हणाले.
हे सर्व ठरवून चाललं आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांना त्रास द्यायचा, त्यांना बदनाम करायचं काम सध्य सुरू आहे. अजित पवारांशी संबंधित लोकांवरही आज कारवाई झाली आहे. भाजपचे लोकं सगळे जंगलात राहतात का? त्यांच्या काही प्रॉपर्टी नाही किंवा त्या सगळ्या वैध मार्गानं मिळवलेल्या आहेत का, असं राऊत म्हणाले.
आम्ही अनेकांबाबत माहिती ईडीला दिली आहे. त्याला आजवर हात लागलेला नाही. त्यांची कुटुंबं ही कुटुंब आहेत मग आमची कुटुंब रस्त्यावर आली आहेत का? भाजपनं सुरू केलेलं हे घाणेरडं राजकारण त्यांच्यावर उलटेल असं राऊत म्हणाले.
भाजप नेत्यांची टीका
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली आहे.
हे 100 कोटीपेक्षा अधिकच्या गैरव्यवहाराचं प्रकरण आहे. आता या 100 कोटीची वसुली कुणाच्या खात्यात कशी गेली याचीही माहिती बाहेर येणार, असं किरिट सोमय्या यांनी म्हटलं आहे. आता अनिल देशमुखनंतर अनिल परब यांच्यावर पुढील कारवाई होणार असं म्हटलंय.
तर, माजी गृहमंत्र्यांना अटक करून विषय संपत नाही. त्यांचे मालक कोण आहेत. तीन पक्षांच्या कोणत्या नेत्यांना या वसुलीचा वाटा मिळाला त्यांची नावं आणि ते सगळे तुरुंगात जाईपर्यंत प्रकरण संपत नाही, असं भाजप आमदार राम कदम म्हणाले. महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आमची लढाई असल्याचंही ते म्हणाले.
अनिल देशमुखांना गृहमंत्री कुणी केलं त्यांच्याबरोबर आणखी अनिल कोण होते आणि हे दोन्ही अनिल वाटा कोणाला द्यायचे याचा छडा लावण्याची गरज आहे, असं भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणालेत.
वसुलीकांडातील ही पहिली अटक असली तरी ही प्याद्याची अटक आहे. त्यामुळं आगामी काळात सीबीआय आणि ईडी मास्टरमाईंडपर्यंत पोहोचून भ्रष्टाचाराची कीड नष्ट करेल, असंही भातखळकर म्हणाले.
मी ED समोर हजर झालो, आरोप करणारे परमबीर सिंग कुठेत - अनिल देशमुख
गेल्या काही दिवसांपासून देशमुख अज्ञातवासात होते. याआधी ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी छापे टाकले होते.
अनिल देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते ,असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.
अनिल देशमुख यांनी मात्र परमबीर सिंगांचे आरोप फेटाळून लावले होते.
अनिल देशमुख काय म्हणाले?
अनिल देशमुख यांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हीडिओत त्यांनी म्हटलंय की, "मला ईडीचं समन्स आलं, तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही, अशापद्धतीच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमांमध्ये आल्या. मला ज्या ज्या वेळी समन्स बजावण्यात आलं, त्या त्या वेळी मी सांगितलं की, माझी याचिका हायकोर्टात आहे. त्याची सुनावणी चालू आहे.
"मी सुप्रीम कोर्टातसुद्धा याचिका दाखल केलेली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये येईल."
ते पुढे म्हणाले, "माझी केस अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंगमध्ये आहे. पण, आज मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झालो आहे. ज्या परमबीर सिंगांनी माझ्यावर आरोप केले, तेच देश सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत.
"परमबीर सिंग यांच्या आदेशानुसार, सचिन वाझेनं माझ्यावर आरोप केला. तो स्वत: आज तुरुंगात आहे. या अशा लोकांच्या आरोपांमुळे माझी चौकशी करत आहे, माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे, त्याचा मला त्रास होत आहे."
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "अनिल देशमुख यांना शेवटी ईडीच्या कार्यालयात यावं लागलं. ते आले तर स्वत:च्या गाडीत बसून पण आता 100 दिवस ईडीच्या कस्टडीत राहावं लागणार. दरमहिन्याचा 100 कोटींचा वसुलीचा हिशोब द्यावा लागणार.
"शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दरमहिन्याला किती, अनिल परब यांची भूमिका काय, सगळी माहिती द्यावी लागणार."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)