सामना : 'कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच भाजप नेत्यांची बेताल बडबड' #5मोठ्याबातम्या

वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया,

1. 'कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच भाजप नेत्यांची बेताल बडबड'- सामना'तून टीका

'भाजप आणि केंद्रातील त्यांचे सरकार लोकशाही मानत नाही. प्रश्न विचारणाऱ्याला ते संपवतात. घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षातला मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच त्यांना अशा कल्पना सुचतात,' अशी टीका शिवसेनेनं आपलं मुखपत्र 'सामना'तून केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. 'उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन 'दम मारो दम' करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते.' असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

'कमी प्रतीचा गांजा' या मथळ्याखाली हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर भाजपकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. 'माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?' असा अलोकशाही प्रश्न उपस्थित केल्याचा,' उल्लेखही यात करण्यात आला आहे.

एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री बनले या विरोधकांच्या टीकेला सुद्धा शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

'उद्धव ठाकरे हे शिवसैनिकच आहेत आणि कोणी परकीय राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. ते कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री बनले याचं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी वाजत गाजत लाखो लोकांच्या उपस्थितीत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून शपथ घेतली नाही.' असा टोला शिवसेनेनं लगावला.

2. क्रिकेटर युवराज सिंगला अटक आणि जामीन

क्रिकेटर युवराज सिंग याला रविवारी (17 ऑक्टोबर) हरियाणा पोलिसांनी जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी अटक केली होती. काही वेळातच युवराजला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

हे प्रकरण 2020 चे असून युवराज सिंगने दलित समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होता. रजत कलसन यांनी याविरोधात पोलीस स्टेशला गुन्हा नोंदवला होता.

रोहित शर्मासोबत केलेल्या एका लाईव्ह चॅट दरम्यान युवराज सिंगने फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलबाबत जातीवाचक शब्दप्रयोग केल्याचं समोर आलं होतं. यानंतर युवराज सिंगला नेटकऱ्यांनी ट्रोल करत त्याने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर युवराज सिंगने याप्रकरणी समाज माध्यमांमधून माफी मागितली.

रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी लाईव्ह चॅटमध्ये क्रिकेट आणि इतर अनेक गोष्टींबाबत गप्पा मारल्या. यातच भारतीय संघातील गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र सिंह यांच्याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी युवराजने जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप आहे. वाल्मिकी समाजाविषयी ही टिप्पणी करण्यात आली होती.

3. 19 महिन्यांनंतर पहिल्यांदाच मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यूची नोंद नाही

20 मार्च 2020 नंतर रविवारी (17 ऑक्टोबर) पहिल्यांदाच मुंबईत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून दररोज मुंबईत कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत होता. त्यामुळे 17 ऑक्टोबरच्या आरोग्य अहवालानुसार, रविवारी मुंबईत कोरोना मृत्यूची नोंद शून्य आल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कायम असून 17 ऑक्टोबरला 1 हजार 715 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

मुंबईत 367 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. सध्या मुंबईत 5 हजार 30 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवसांवर गेला आहे.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 19 हजार 687 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 7,27,084 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 28 हजार 631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

4. राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला अटक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला मुंबईत मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. मराठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माते युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांना अटक करण्यात आली असून यात एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मढ परिसरात एका सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आरोपींनी राज ठाकरे यांना ओळखत नाही का? मराठी येत नाही का? कोणासाठी काम करतो? असे प्रश्न विचारल्याचे दिसते. यात सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचंही समोर आलं आहे.

मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षिक अनुराग दिक्षित यांनी याबाबत माहिती दिली असून यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5. आरोग्य विभागाची परीक्षा आता 24 ऑक्टोबरला होणार

दोन वेळा रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता 24 ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी याबाबत माहिती दिली. टिव्ही 9 मराठीने हे वृत्त दिलं आहे.

या भरती प्रक्रियेत 2 हजार 739 रिक्त पदं भरली जाणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया वादात अडकली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट 'क' व 'ड' पदभरती परीक्षेबाबत जवळपास 2 हजार 869 उमेदवारांच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

याविषयी बोलताना डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या, "या परीक्षेसाठी आतापर्यंत 4 लाख 5 हजार 156 अर्ज आलेत. कोरोना आरोग्य संकट पाहता सरकारने 100 टक्के रिक्त पदं भरण्याची परवानगी दिली आहे. न्यास एजन्सीमार्फत ही परीक्षा होईल."

उमेदवार ज्या जिल्ह्यातील पदासाठी अर्ज भरणार त्या विभागातच त्याला परीक्षेचे केंद्र मिळणार असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. उमेदवार ज्या विभागासाठी अर्ज देत आहे त्याभागात परीक्षेसाठी त्याने हजर होणं अपेक्षित आहे असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)