उद्धव ठाकरे: 'केंद्र सरकार हे पक्षाचं सरकार नाही, राज्याची काळजी घेणं त्यांचंही कर्तव्य'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोलापुरात दौऱ्यावर आहेत.

सकाळी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातून दौऱ्याला सुरुवात केली. सांगवी गावातील नुकसानाची त्यांनी पाहणी केली.

या पाहणीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतली. "केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारनं तात्काळ मदत करावी या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, तात्काळ मदत सुरूच आहे. केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. पक्षपात न करता देशाची काळजी घेणं हे केंद्राचं कर्तव्य आहे."

"बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात जर एवढं मोठं संकट आलं आहे, तर सर्वांनी एकजुटीनं केंद्राकडे मदत मागायला हवी," असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी यांनी फोन करून विचारपूस केली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. पंतप्रधानांशी बोलल्यावर माझी खात्री पटली आहे की राज्याला जी मदत हवी आहे ती दिल्याशिवाय ते राहणार नाहीत, अशी माहिती उद्धव यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 महिलांना धनादेश देण्यात आले.

उद्धव ठाकरे यांचा हा दोन दिवसीय दौरा आहे. खासदार विनायक राऊत आणि कृषिमंत्री दादा भुसे हेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होऊन शेतकऱ्यांना मदत मिळणार का?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही पाहणी दौऱ्यावर आहेत. बारामतीपासून फडणवीस दौरा सुरू करणार आहेत. फडणवीसांचा दौरा तीन दिवसीय आहे.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

पावसाला सुरूवात झाल्यापासून मी यंत्रणेच्या संपर्कात आहे. पाऊस किती पडतोय, नुकसान किती झालंय याचा अंदाज आम्ही घेतच होतो. ज्यांचं नुकसान आहे त्यांना सांगितलं आहे, की जे काही करणं शक्य आहे ते सरकार करतच आहे. पाऊस अजूनही सुरू आहे. परिस्थितीचा अंदाज घेतला जात, पंचनामे सुरू आहेत. हे काम पूर्ण झालं की आवश्यक ती मदत देऊच.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)