You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठवाडा : 'दुष्काळ आणि वडिलांचा आजार अशी संकटं सोबतच आली'
- Author, निरंजन छानवाल
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गुढीपाडव्याचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होत होता. त्याच दिवशी गोकुळ आणि त्याच्या भाऊबंधांच्या शेतातली मोसंबीची बाग मोडण्याचा काम सुरू होतं. जेसीबीच्या सह्याने एक-एक झाड शेतात आडवं होत होतं. याच बागेच्या भरवश्यावर BSc Agri पर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या गोकुळच MBA करण्याचं आणि नोकरीचं स्वप्नही उद्ध्वस्त होत होतं.
गोकुळच्या डोळ्यांसमोर मोसंबीची बाग मुळासकट उखडून फेकली जात होती.
त्यानं BSc Agri केलं आहे. गोकुळचे वडील भास्करराव निर्मळ आणि पाच भावंडांचं एकत्र कुटुंब. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतवस्तीतच ते राहातात. एका विहिरीवर या भावंडांनी मोसंबीची बाग फुलवली.
त्यांनी २०१६च्या दुष्काळात ती बाग कशीबशी जगवली. पण नंतरही तीन वर्षं सातत्याने पावसाने हुलकालवणी दिल्याने शेकडो झाडं वाळू लागली. उन्हाळा येता येता त्यातली निम्म्याहून अधिक झाडं वाळली.
याच भावंडांपैकी एक असलेले प्रभाकर राजाराम निर्मळ यांच्या ३०० झांडापैकी शंभर झाडं गुढीपाडव्याच्या दिवशी जेसीबीच्या सह्याने तोडण्यात आली. औरंगाबादपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेला पाचोडचा परिसर एके काळी मोसंबीचा आगार मानला जायचा. पलीकडे जालना जिल्ह्यातला अंबड तालुका हाही मोसंबीसाठी प्रसिद्ध. २०१६च्या दुष्काळात अंबड तालुक्यातल्या अनेक मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या.
पाचोडपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर पैठण रोडला थेरगाव आहे. याच थेरगाव शिवारातल्या अनेक बागा आता मरणपंथाला लागल्या आहेत. ज्यांना शक्य आहे ते टँकरने पाणी आणून बागा जगवण्याची धडपड करत आहेत.
मुख्य रस्ता सोडून गावात प्रवेश करताच तुम्हाला घरांसमोर ड्रमच्या रांगा लावलेल्या दिसतात. गावात भीषण पाणीटंचाई. टँकरच्या साह्याने गावाला पाणीपुरवठा केला जातो.
नुकताच गुढीपाडवा होऊन गेला. या गावात सात दिवसांनी गुढ्या उतरवण्याची परंपरा आहे. गावात गुढीपाडव्यानिमित्त उभारलेल्या गुढ्या अद्यापही घरांवर डोलत होत्या.
या भागात जवळपास दोन हजारांवर मोसंबीची झाडं ही अलीकडच्या काळात तोडण्यात आल्याचं समजलं होतं.
निर्मळ कुटुंबाची भली मोठी बाग उखडून टाकल्याची माहिती मिळाल्याने या शेतीचा शोध घेत गाव ओलांडलं. पाच भावंडांमध्ये दोन हजार मोसंबीची झाडं आहेत. त्यातली दीड हजार झाडं आता तोडण्यात आली आहेत.
वडजी रस्त्यावर पुढे गेल्यावर डाव्या हाताला असलेल्या शेतात मोसंबीची वाळलेली अख्खी बाग जमिनीवर आडवी झालेली दिसली. केरू पठाण यांचं हे शेतं. जवळपास दोनशेवर झाडं त्यांनी मुळासकट तोडली होती. कारण एकच - पाणी नाही.
पाणी द्यायचं म्हटलं तर टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार. ते शक्य नाही. कारण तेवढे पैसे नाहीत.
इथून थोडं पुढे गेल्यावर निर्मळ वस्तीवर गोकुळ भेटला. त्याचे काका प्रभाकर निर्मळ यांनी गुढीपाडव्याच्या दिवशीच शंभर झाडं जेसीबीच्या मदतीने तोडली होती. तेसुद्धा भेटले.
चुलत्याने काल बाग तोडताना काढलेला एक व्हीडिओ दाखवला. गावातल्या व्हॉटसअॅप ग्रुपवर तो फिरत होता. सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे, अशी भावना प्रभाकर निर्मळ व्यक्त करत असल्याचं त्यात दिसलं.
शेतातल्या वाळलेल्या मोसंबींकडे हताश नजरेने पाहणारा गोकुळ एका झाडावर कुऱ्हाड चालवत होता.
2018मध्ये औरंगाबादलाच त्याने BSc Agri शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही दिवस पैठणच्या साखर कारखान्यात नोकरी केली. गाळप हंगाम संपल्याने तो गावाकडे आला होता. बेरोजगार आहे. नोकरी शोधतोय. एमबीए करायचं स्वप्न उराशी बाळगून आहे.
'प्यायला नाही झाडांना कुठून देऊ?'
"आपल्याकडे २० एकर शेती आहे. त्यातल्या पंधरा एकर शेतीवर मोसंबीची बाग होती. काल काही झाडं काढली. आणखी काही दिवसांत उरलेली झाडं काढावी लागतील. दीड हजार झाडं तोडावी लागली. इथं प्यायला पाणी नाही. झाडांना कुठून देणार."
"विहिरीवरची मोटर पंधरा ते वीस मिनीटंचं चालते. टँकरने किती पाणी आणून टाकणार. एका ट्रिपला दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. अशा किती ट्रिप पाणी बागेला टाकणार. दोन महिने बाग जगवायची म्हटलं तर त्याचा खर्च लाखाच्या घरात जाईल. इतका खर्च साधारण हातावरला शेतकरी नाही करू शकत."
"2016ला अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळेला साठ-सत्तर हजार रुपयांचं पाणी आपण टाकलं होतं. पाऊस चांगला पडत नाही. पुढच्या वेळेस पण निसर्ग साथ देईलच याची गॅरंटी नाही," असं तो म्हणाला.
आईचे झुमके विकले
"वडिलांनी जोडतोड करून माझं शिक्षण पूर्ण केलं. नंतर वडिलांना ब्रेन हॅमरेजचा आणि पक्षाघाताचा झटका आला. ते एका जागेवर पडून असतात. त्यात निसर्गही साथ देत नाही. मला MBA करायच आहे. त्यासाठी भरपूर फी द्यावी लागणार आहे."
"MBA ची फी साधारण ७५ हजार रुपये आहे. कुठून आणायचा पैसा? वडील एका जागेवर पडून असतात. निसर्ग साथ देत नाही. या सगळ्या अडचणी पाहता माझं स्वप्न हे स्वप्नच राहतं की काय असं मला वाटतं."
2016मध्ये वडिलांकडेही पैसे नव्हते. तेव्हा फी भरण्यासाठी आईच्या कानातील झुमके विकावे लागले. नंतरच मला परीक्षेला बसता आलं."
"आता बेरोजगार आहे"
"मागच्या वर्षी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही दिवस कारखान्यावर काम केलं होतं. आता हंगाम संपला ते कामही सुटलं. सध्या मी नोकरीच्या शोधात आहे.."
"बारावी केल्यानंतर माझ्या बॅचमधल्या फक्त दोन मुली सरकारी नोकरीत लागल्यात. आता कोणी विहिरीवर कामाला जातं. कोणी सेंट्रिंगच्या कामावर आहे. कोणी पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहे. माझ्यासोबत कृषी पदवीचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या काही मुलांनी कारखान्यावर नोकरी शोधल्या. वडिलांचं पाच भावंडांच कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात ४५ सदस्य आहेत. २० एकर शेतीवर सगळं चालतं. परिस्थितीच अशी आहे की सगळी झाडं तोडावी लागत आहे. जी झाडं हिरवी आहेत तीही नंतर काढून टाकावी लागतील."
गोकुळला दोन मोठे भाऊ आहेत. एकाचं पदवीपर्यतंच शिक्षण पूर्ण झालं आहे. दोघेही शेती करतात. गोकुळला पुढे शिकावंसं वाटतं.
"भावांच्या लग्नाच्या वेळी कर्ज काढावं लागलं. वडिलांवर उपचारासाठी कर्ज काढलं. पाऊसच नसल्याने भविष्यात काय नियोजन करावं, हे कळतं नाही. बाहेर गावी कंपनीत काम करून पोट भरावं लागेल. ४५ जणांच कुटुंब शेतीवर जगू शकत नाही."
मोसंबीला सरकारचं अनुदान मिळालं. डाळिंबाच्या बागेला मात्र ४० टक्के अनुदान मंजूर झाल्याचं गोकुळ म्हणाला. पाचोडच्या अलीकडे कचनेर भागातही अशीच परिस्थिती. शेतकऱ्यांनी सरकारी अनुदानाच्या आशेवर वाळलेल्या बागा ठेवल्या होत्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)