शिवलीला पाटील: 'पाकिस्तानात गेले तरी मुखात विठुराया, छत्रपतींचेच विचार असणार' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. पाकिस्तानात गेले तरी मुखात विठुराया, छत्रपतींचेच विचार असणार - शिवलीला पाटील

"माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, हाच माझा शुद्ध हेतू होता. मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी उद्देश प्रामाणिक होता. बिग बॉसमध्ये गेल्याबद्दल मी माफी मागते, पण मी पाकिस्तानात गेले तरी माझ्या मुखात विठुराया आणि छत्रपतींचेच विचार असतील", असं वक्तव्य कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी केलं आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना शिवलीला पाटील यांनी आपलं बिग बॉसमध्ये जाण्याचं कारण स्पष्ट केलं. शहरी भागातील लोकांना कीर्तन काय आहे, ते समजावून सांगण्यासाठी आपण तिथं गेलो होतो, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, माझा मार्ग चुकला असला तरी हेतू शुद्ध होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही, असंही शिवलीला पाटील यांनी म्हटलं.

2. 'मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून आतातरी बाहेर या'

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. पण याच वक्तव्यावरून विरोधी पक्ष त्यांच्यावर निशाणा साधत असल्याचं दिसून येत आहे.

नवी मुंबईत एका कार्यक्रमाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी 'मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे' असं विधान केलं आहे.

पण या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली. महाविकास आघाडी सरकारला आता जवळपास दोन वर्ष होतील, मला वाटतं की त्या मानसिकतेतून देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला बाहेर काढलं पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं.

तर, देवेंद्र फडणवीस अजूनही स्वप्नातून बाहेर यायला तयार नाहीत. आता ते मुख्यमंत्री नाहीत हे मानायला तयार नाहीत, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी झी 24 तासने दिली.

3. ढिसाळ कारभारामुळे कोळशाचा तुटवडा - नितीन राऊत

कोल इंडिया या देशभरात देशात कोळसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीच्या कामकाजावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळेच महाराष्ट्रात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.

मंगळवारी (12 ऑक्टोबर) आयोजित एका पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

राज्यात कोळशाअभावी 35 हजार मेगा वॅट विजेचा तुटवडा आहे. शिवाय मिळणारा कोळसाही अपेक्षित दर्जाचा नाही, त्यामुळे सणासुदीच्या दिवसात जनतेनं वीजेची काटकसर करावी लागणार आहे, असं ऊर्जामंत्री राऊत म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.

4. आघाडी सरकारला आशिष शेलारांचा इशारा

'महाराष्ट्रातील जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, दलित बांधव तसंच मराठा समाजाला काहीही मिळत नाही.

त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलनाची रुपरेषा ठरवली आहे. आगामी काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीची कुकृत्ये आणि भ्रष्टाचार यांसंदर्भात एक अहवाल काढून आपण जनतेसमोर जाणार आहोत.

तिन्ही पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकार याबद्दल बदनामीचा कट सुनियोजितपणे कसे रचत आहेत याचा भांडाफोड आम्ही जनतेसमोर करणार आहोत, असंही शेलार यावेळी म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

5. T-20 विश्वचषकासाठी धोनी घेणार शून्य मानधन

आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच T-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा मार्गदर्शक म्हणून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची निवड केली आहे.

पण महेंद्रसिंह धोनी जी जबाबदारी शून्य मानधनावरच पार पाडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने T-20 विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. पण महेंद्रसिंह धोनी यासाठी कोणतंही मानधन घेणार नाही, असं BCCI चे मानद सचिव जय शाह यांनी यासंदर्भात स्पष्ट केलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)