You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जिल्हा परिषद निवडणूक निकाल : महाविकास आघाडीला 'स्वबळ' मानवतंय?
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचा स्वतंत्रपणे विचार करायचा झाल्यास भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याचं दिसून येतंय.
त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात यावरून विविध प्रकारची चर्चा आणि वादविवाद होत आहेत.
यंदा पार पडलेली निवडणूक ही केवळ 6 जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक होती असं नव्हे. तर राज्यातील ओबीसी राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती.
यानंतर पुढील सहा महिन्यांमध्ये राज्यातील जवळपास दहा ते बारा महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. त्याच सुमारास राज्यात काही ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही होतील. या पार्श्वभूमीवर यंदाच्या जिल्हा परिषदांकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या निकालाचा आगामी निवडणुकांवर कशा प्रकारे परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याविषयी आपण राज्यातील तज्ज्ञ राजकीय विश्लेषकांकडून माहिती घेऊ, तत्पूर्वी यंदाच्या जिल्हा परिषद निकालांकडे एक नजर मारूया
जिल्हा परिषद निकाल : कुणाला किती जागा?
राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, पालघर या 6 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणार्या 38 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले.
मंगळवारी (5 ऑक्टोबरला) या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. तर बुधवारी मतमोजणी होऊन निकाल हाती आले आहेत.
अंतिम निकालानुसार जिल्हा परिषदेच्या 85 जागांपैकी भाजपला 22, काँग्रेसला 19, राष्ट्रवादी काँग्रेस 15 तर शिवसेनेला 12 ठिकाणी विजय मिळाला. याव्यतिरिक्त इतर लहान-मोठ्या पक्षांना एकूण मिळून 13 तर 4 ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
भाजपची 'स्पेस' वाढतेय - देवेंद्र फडणवीस
जनतेने भाजपला कौल दिला आहे. 25 टक्के जागा एकट्या भाजपला जनतेने दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाची स्पेस वाढच चालली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निकालावर दिली आहे.
भाजपने ग्रामपंचायती जिंकल्या आता पंचायत समिती जिल्हापरिषदेतही भाजपने विजय मिळवला आहे. भाजपची स्पेस वाढतच जाईल. पण शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचीच स्पेस खात जाणार आहेत. याचा त्यांनी विचार करावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.
मराठा आणि ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका - अशोक चव्हाण
काँग्रेस नेत्यांनी मात्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेतल्यानेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, "जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या 85 जागांमध्ये काँग्रेसच्या 13 जागा होत्या. मात्र, यावेळी या जागा वाढल्या आहेत.
दुसरीकडे भाजप 31 वरून 22 पर्यंत खाली घसरली. वंचित बहुजन आघाडीच्या 12 जागांची संख्या 8 वर आली. हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे," असं चव्हाण म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या निवडणुकीतील विजयाचं श्रेय काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलं. ही तर फक्त सुरुवात आहे, असं ते म्हणाले.
'भाजपसाठी सगळंच आलबेल नाही'
जिल्हा परिषद निकालांबाबत बीबीसीशी चर्चा करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली.
ते म्हणतात, "एकूण अंतिम निकाल पाहता, सर्वांत मोठा पक्ष भाजप आहे यात शंका नाही. पण ही स्थिती इतकी सोपी नाही. त्यामुळे भाजपसाठी सगळंच आलबेल आहे, असं मानण्याचं कारण नाही."
देसाई यांच्या मते, "भाजपने यंदाची निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढवली होती. पण त्याचा त्यांना फार काही फायदा मिळाला नाही. एकूण भाजपसाठी परिस्थिती जैसे थे ठरली. त्यामुळे याचा फायदा तर नाहीच पण तोटा नक्कीच आहे," असं ते म्हणाले.
पण ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचं मत याबाबत थोडं वेगळं असल्याचं दिसून आलंय.
माने यांच्या मते, "भाजपला जागा वाढवता आल्या नसल्या तरी त्यांनी बऱ्यापैकी शिवसेनेचा मतदार आपल्याकडे ओढण्यास यश मिळवलं आहे."
ते सांगतात, "भाजपने या निवडणुकीत अनेक ठिकाणी केवळ ओबीसी उमेदवार दिले होते. तिथं त्यांची ही खेळी यशस्वी ठरली आहे. शिवाय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केली. मुळात विदर्भात शिवसेनेचं अस्तित्व फार काही दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचा होता नव्हता तो मतदार भाजप आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात असणार हे नक्की."
काँग्रेसची कामगिरी उल्लेखनीय
जिल्हापरिषदेत काँग्रेसची कामगिरी उल्लेखनीय झाली, असं मत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले, "देशात सर्वत्र काँग्रेसची पीछेहाट होत असताना महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काँग्रेस अजूनही पाळंमुळं रोवून आहे, हे यामधून दिसून येतं."
देसाई यांनी यावेळी मंत्री सुनील केदार यांचंही कौतुक केलं.
"सुनील केदार यांनी बिकट परिस्थितीतही गडकरींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम केलं. अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीत भाजपला फायदा होणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान केदार यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे तणावही निर्माण झाला होता. पण तरीही त्याचा फटका काँग्रेसला बसला नाही.
उलट केदार यांच्या आक्रमक प्रचारशैलीच्या आधारे काँग्रेसला यश मिळालं असू शकतं," असं देसाई यांना वाटतं.
केदार यांच्या कामगिरीमुळे त्यांचं पक्षातलं तसंच मंत्रिमंडळातलं वजन वाढू शकतं, असा अंदाज देसाई यांनी व्यक्त केला आहे.
'सगळेच स्वबळावर लढल्यास आश्चर्य नाही'
यंदाच्या पोटनिवडणुकीत बहुतांश ठिकाणी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढताना दिसून आले.
आगामी काळातही अशीच परिस्थिती पाहायला मिळेल की युती-आघाडी दिसेल, हा प्रश्नही यामुळे उपस्थित होतो.
याबाबत देसाई म्हणतात, "या निवडणुकीप्रमाणेच पुढील निवडणुकांमध्येही राजकीय पक्ष स्वबळावरच लढण्याचा प्रयत्न करतील. राज्यात सत्तेत असल्यामुळे निकालानंतर आघाडी करून सत्ता हस्तगत करणं, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना शक्य आहे. त्यामुळे भाजप वाढल्याचा दावा फडणवीस करत असले तरी निकालांनंतरची परिस्थिती वेगळी ठरू शकते.
प्रमोद माने यांनीही अशाच प्रकारचं मत व्यक्त केलं.
"राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. पण अनेक ठिकाणी महापालिकांवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपला लढा देण्यासाठी सगळे आतूर असतील. शिवाय, आजवरचा इतिहास पाहता महापालिका निवडणुकांमध्ये निकालानंतर आघाडी करणं शक्य आहे. हीच स्थिती जिल्हा परिषदेत पाहायला मिळाली. त्यामुळे युती-आघाडी न करता सगळे पक्ष स्वबळावर लढत असल्यास आश्चर्य नाही," असं माने यांनी म्हटलं.
आगामी काळात खरी लढाई शिवसेना-भाजपमध्येच?
आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुका प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध भाजप अशाच होतील, असं प्रमोद माने यांना वाटतं.
प्रमोद माने यांच्या मते, शिवसेना या निवडणुकीत मागे पडल्याचं दिसत असलं तरी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत फरक असतो. जिल्हा परिषद निवडणुका ग्रामीण तर महापालिका निवडणुका शहरी भागात लढवल्या जातात. दोन्ही ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे आहेत. गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शहरी भागात फारसं यश मिळत नाही. अशा स्थितीत खरी लढाई शिवसेना आणि भाजप यांच्यातच पाहायला मिळेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)