You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल: ओबीसी आरक्षणाविना झालेल्या निवडणुकीत कुणाला किती जागा?
राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, पालघर या 6 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणार्या 38 पंचायत समित्यांचे आज निकाल जाहीर झाले.
ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवायच झाली त्यामुळे देखील या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तसेच विरोधक दोन्ही गटांनी हा आपलाच विजय झाला असं म्हटलं आहे.
ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्यामुळे काही ठिकाणी भाजपला यश मिळालं तर काही ठिकाणी महाविकास आघाडीला मिळालं आहे.
मंगळवारी (5 ऑक्टोबरला) या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या 84 तर पंचायत समितीमधील 141 रिक्त जागांसाठी ही निवडणुकीत एकूण सरासरी 63% मतदान झालं.
ओबीसी आरक्षणाविना होणारी ही पहिली पोटनिवडणूक असल्यामुळे निवडणुकांचे निकाल काय लागतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.
नागपूरमध्ये काँग्रेसचा दबदबा
नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचं वर्चस्व दिसून आलं. एकूण 9 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने याठिकाणी सत्ता काबीज केली आहे.
एकूण जागा - 16
काँग्रेस - 9
भाजप - 3
राष्ट्रवादी - 2
इतर - 2
अकोल्यात वंचितची आघाडी
अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित आघाडीने आघाडी मिळवली. निकाल खालील प्रमाणे -
एकूण जागा - 14
वंचित आघाडी - 6
भाजप - 1
शिवसेना - 1
राष्ट्रवादी - 2
काँग्रेस - 1
प्रहार - 1
अपक्ष - 2
धुळ्यात भाजपची बाजी
एकूण जागा - 15
पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे - भाजप - 8
राष्ट्रवादी - 3
शिवसेना - 2
काँग्रेस - 2
पालघर जिल्हा परिषदेत काँटे की टक्कर
15 जागा
पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे -
भाजप - 4
राष्ट्रवादी - 4
शिवसेना - 5
माकप - 1
अपक्ष - 1
वाशिममध्ये काँग्रेस अव्वल
एकूण जागा - 14
काँग्रेस - 4
राष्ट्रवादी - 3
भाजप - 2
शिवसेना - 1
इतर - 3
अपक्ष - 1
नंदुरबारमध्ये भाजपला सर्वाधिक जागा
एकूण जागा - 11
भाजप - 4
काँग्रेस - 3
शिवसेना - 3
राष्ट्रवादी - 1
टीप -धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (धुळे) पंचायत समितीच्या दोन जागांवर तर अक्कलकुवा (नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली.
भाजपची स्पेस वाढतेय - देवेंद्र फडणवीस
जनतेने भाजपला कौल दिला आहे. 25 टक्के जागा एकट्या भाजपला जनतेने दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाची स्पेस वाढच चालली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निकालावर दिली आहे.
भाजपने ग्रामपंचायती जिंकल्या आता पंचायत समिती जिल्हापरिषदेतही भाजपने विजय मिळवला आहे. भाजपची स्पेस वाढतच जाईल. पण शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचीच स्पेस खात जाणार आहेत. याचा त्यांनी विचार करावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला.
पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं 50% पेक्षा जास्त ओबीसींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं. त्यानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती.
त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या.
या जागांवर 19 जुलै पोटनिवडणुक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.
परंतु राज्य सरकारची विनंती आणि कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक स्थगित करण्यात आली.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्यासाठी सरकारकडून सर्वपक्षीय बैठका घेण्यात आल्या. यावेळी राज्य मागास आयोग वर्गाच्या माध्यमातून ओबीसींचा 'इम्पेरिकल डेटा' गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेणार नाही अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत झाली. ती एकमताने मान्यही झाली.
त्यानंतर सुप्रीम कोर्टात 9 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत राज्य सरकारचे कोरोना संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकीला लागू होत नसल्याचे कोर्टात सांगितले. त्याचबरोबर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्याचेही आदेश दिले.
त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने 5 ऑक्टोबरला निवडणुका जाहीर केल्या. ओबीसी आरक्षणाविनाच या निवडणुका पार पडल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)