You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : आजपासून कॉलेज पुन्हा सुरू, महाविद्यालयांमध्येच होणार लसीकरणाची शिबिरं
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 मध्ये बंद करण्यात आलेली महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत.
लॉकडाऊननंतर प्रथमच महाविद्यालये सुरू होत असल्यामुळे सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं आहे.
दरम्यान, महाविद्यालये सुरू करताना आवारातच लसीकरण शिबीरं सुरू करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाविद्यालय सुरू करण्यासाठी नियमावली
- कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी वर्गात उपस्थित राहू शकतात.
- लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयातच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण.
- विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावं.
- महाविद्यालय किती क्षमतेने सुरू करावं, याचा निर्णय प्रशानाशी विचारविनिमय करून घ्यावा.
- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून महाविद्यालय सुरू करावे.
- परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी नियमावली तयार करता येऊ शकते.
- उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासची सोय करून द्यावी.
- 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही.
- मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लोकल ट्रेन प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुख्य सचिवांना पाठवणार आहे.
चित्रपट आणि नाट्यगृह 22 ऑक्टोबरपासून सुरू
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर सुरू होणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीची घोषणा केली होती. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही ते म्हणाले आहेत.
4 ऑक्टोबरपासून शाळा उघडल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 सप्टेंबर राज्यातील शाळा उघडण्याची परवानगी दिली. त्यानंतर राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या.
शाळेत येण्यासाठी पालकांनी संमती आवश्यक असेल. एखादा विद्यार्थी काही कारणास्तव शाळेत येऊ शकत नसेल, तर ते घरूनही ऑनलाईन क्लास अटेंड करू शकतात, असंही गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
पालक, शिक्षक आणि तज्ज्ञांची शाळा सुरू करण्याची इच्छा होती. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला, असं गायकवाड यांनी सांगितलं.
शाळा सुरू करण्यासंदर्भात नियम
- मुलांना शाळेत येण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल.
- विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही. एखादा विद्यार्थी काही कारणास्तव शाळेत येऊ शकत नसेल, तर ते घरूनही ऑनलाईन क्लास अटेंड करू शकतात.
- मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष द्यावं अशी टास्क फोर्सनं सूचना केली आहे. शाळांमध्ये खेळाला परवानगी नसेल.
- निवासी शाळा संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाहीये.
- क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येणाऱ्या शाळांबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त यांनी लक्ष द्यावं. स्थानिक प्रशासनाला यात सहभागी करत आहोत.
- प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी कसं जोडता येईल. स्थानिक डॅाक्टरांना यासोबत कसं जोडता येईल यावर विचार सुरू आहे.
- या काळात किती मुलं ड्रॉपआऊट झाली याची माहिती शाळा सुरू झाल्यानंतर मिळेल. या मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- मुलं घरी आल्यानंतर काय करावं याबाबत SOP's तयार करतोय. मुलं शाळेत आल्यानंतर शिक्षकांनी कसं वागावं याबाबत टास्क फोर्सने सूचना दिल्यात.
- शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या लोकस प्रवासाबाबत निर्णय होईल. ट्रेन वापरणाऱ्या कॅालेजच्या मुलांसाठी निर्णय होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)