मानसिक आरोग्य : ‘पुन्हा लॉकडाऊन लागून शाळा बंद झाली तर घरचे लग्न लावून देतील’

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

"कशाची मज्जा? दीड वर्षं शेतातली कामं केली. निंदलं, कापूस येचला. उलट आता शाळा सुरू झालीय, तर आम्ही मज्जा करतोय."

लॉकडाऊनमुळे दीड वर्षं शाळा बंद होती, तर मजा केली का? या माझ्या प्रश्नावर आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या अभिषेकनं हे उत्तर दिलं.

त्याच्या या उत्तरावरून लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असण्याचा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला असेल, याची जाणीव होते.

कोरोना लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि याचा शाळकरी मुलांवर मोठा परिणाम झाला.

ज्या विद्यार्थ्यांच्या हातात लेखणी असायला हवी होती, त्याऐवजी त्यांच्या हातात खुरपं आलं.

अभिषेक जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील चिंचोली निपाणी गावात राहतो. या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तो शिकत आहे.

आम्ही सकाळी साडे नऊच्या सुमारास चिंचोलीमध्ये पोहोचलो, तेव्हा मुलं शाळेत जाताना दिसून आली.

वाटेत गाडी थांबवून आम्ही अभिषेकसोबत बोललो. त्यानंतर आमची भेट या शाळेतील आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षांच्या मेहेरझान शाह हिच्याबरोबर झाली.

मेहेरझान तिच्या मैत्रिणींबरोबर शाळेत चालली होती.

लॉकडाऊनमध्ये दीड वर्षं काय केलं, असं विचारल्यावर ती म्हणाली, "दुसऱ्यांच्या शेतात मजुरी केली. निंदलं, खुरपलं, कापूस येचला, मिरच्या तोडल्या."

घरच्या परिस्थितीमुळे मजुरी करावी लागल्याचं ती पुढे सांगते.

"लॉकडाऊनमुळे वडिलांची रिक्षा बंद पडली. त्यामुळे पैसे येणं बंद झालं. त्यातच माझी बहीण डिलिव्हरीसाठी घरी आली होती. त्यासाठी वडिलांनी 5 हजार रुपये उसणे घेतले होते. शाळा बंद असल्यामुळे आम्ही मजुरीला जाऊ लागलो. शेतात निंदणी, खुरपणी, मिरच्या तोडणं अशी सगळी कामं केली. दिवसाला 200 रुपये मजुरी मिळायची."

हे सांगत असताना मेहेरझानच्या डोळ्यात पाणी आलं.

मेहेरझान आणि अभिषेक याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. याच गावातील शिवनाथवरही शाळा बंद असताना शेतात मजुरी करायची वेळ आली.

शिवनाथ शेळके सांगतो, "लॉकडाऊनच्या काळात घरी खूप वाईट स्थिती होती. त्यामुळे घरी मदत करण्यासाठी आम्ही दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी जात होतो. 9 ते 5 शेतात काम करायचो. त्यानंतर घरी आलो की बैलांना चारा-पाणी करायचो."

दीड-दोन किलोमीटर अंतरावरील शेतात ही मुलं पायी जात होती. शेतातली कामं आणि एवढ्या अंतरावरचं शेत, त्यामुळे या मुलांचे हात-पाय दुखायचे.

याविषयी विद्यार्थिनी जयश्री पटकन म्हणाली, "आमचं अंग दुखायचं. हात-पाय दुखायचे. पण, आम्ही कुणालाच काही सांगितलं नाही. कारण आईचेही हात-पाय दुखत होते."

आठवीत शिकणारी जयश्री शाळा बंद असताना तिच्या आईबरोबर शेतात मजुरी करायला जात होती.

पण, 13-14 वर्षं वयाच्या या मुलांना त्यांचे पालक मजुरीसाठी का पाठवत होते, असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे.

याचं उत्तर देताना मेहेरझान शाहचे वडील सबदरशाह गुलझरशाह म्हणतात, "लॉकडाऊनमध्ये पैसा बंद झाला. रिक्षाच्या सीटावर परिणाम झाला. पहिले दोन-चार ट्रिपा सहज व्हायच्या. त्यात आमचं मस्त चालायचं. आता एकच ट्रिप होते. तेव्हा डिझेलबी कमी होतं, आता तेही वाढलं."

सबदरशाह गुलझरशाह रिक्षा चालवतात. चिंचोली ते भोकरदन या रस्त्यावर त्यांची रिक्षा चालते.

मुलीला मजुरीला का पाठवलं, असं विचारल्यावर ते म्हणाले, "लॉकडाऊनमध्ये सगळेच घरी राहून जमतं नव्हतं. त्यामुळे ती आमच्यासोबत शेतात यायची कामाला."

'90 लाख मुलं नव्याने बालमजुरीत'

युनिसेफच्या आकडेवारीनुसार, जगभरातील बालमजुरांची संख्या 16 कोटीपर्यंत पोहोचली आहे. यातील 84 लाख बालमजूर गेल्या 4 वर्षांतील आहेत. याचा अर्थ 10 पैकी एक मूल बालमजुरीमध्ये ढकललं गेलंय. यातील 70 टक्के बालजमुरी शेती क्षेत्रात आहे.

कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 2022च्या शेवटापर्यंत 90 लाख मुलं नव्याने बालजमुरीत ढकलली जाण्याचा धोका आहे.

सरकारने विशेष करुन शेती क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बालमजुरांच्या मूळ कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांनी नमूद केलंय.

शाळा बंदचा मुलींवर अधिक परिणाम

शाळा बंद असल्याचा मुलींच्या आयुष्यावर मुलांपेक्षाही अधिक परिणाम झालाय. मुलांनी शेतात मजुरी केली, तर मुलींना या मजुरीबरोबरच घरचीही कामं करावी लागली.

जयश्री सांगते, "शेतातली कामं तर केलीच शिवाय घरीही आम्ही धुणी-भांडी, स्वयंपाक, झाडझूड ही कामं केली."

शाळेत विद्यार्थ्यांशी आमची चर्चा सुरू असतानाच एक मुलगी तिच्या आईसोबत शाळेच्या मैदानावरून गावाच्या दिशेनं जाताना दिसली.

आमच्याजवळ उभे असलेले शाळेचे मुख्याध्याक सुभाष तळेकर यांनी त्या मुलीला आवाज दिला.

तू कितवीत आहे आणि शेतात कामाला गेली होती का, असं विचारलं.

त्या मुलीनं मी आठवीत असून शेतात कामाला जाते, असं सांगितलं.

शाळेत का येत नाही, असं विचारल्यावर ती मुलगी गप्प उभी राहिली.

तिच्या मागे उभ्या असलेल्या तिच्या आईनं उत्तर दिलं, "तिला शाळेत यायला जीवार येतं."

शाळेचा ड्रेस आणि इतर साहित्य मिळालेल्या तुमच्या पोरीला शाळेत पाठवा, असं तळेकरांनी त्या मुलीच्या आईला सांगितलं. त्यानंतर त्या माय-लेकी तिथून निघून गेल्या.

यानंतर आम्ही गावात आलो. गावात एका शेतात आमची भेट त्र्यंबक शेजूळ यांच्याशी झाली. आमच्या हातातला कॅमेरा पाहून ते आमच्याकडे आले.

त्र्यंबक शेजूळ यांची मुलगी गावातल्याच शाळेत पाचव्या इयत्तेत शिकते. शाळा बंद असल्यामुळे त्याचा मुलीच्या भवितव्यावर आणि अख्ख्या पीढीवर परिणाम होईल, अशी भीती त्यांना आहे.

ते सांगतात, "शाळा बंद असल्यामुळे मुलीला जो अभ्यास नेहमी यायचा, जे रूटीन होतं, त्याची लिंक तुटलीय. त्यामुळे शिक्षणावर थोडा परिणाम झालाय. जो अभ्यासक्रम होता, ते मुलं विसरले. जे येत होतं, ते येऊ नाही लागलं."

मराठवाड्यातील शाळा (8 वी ते 10 वीचे वर्ग) गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलं शाळेत परतू लागली आहेत. असं असलं तरी भविष्याबद्दलची अनिश्चितता मात्र विद्यार्थ्यांच्या मनात कायम आहे.

मेहेरझान सांगते, "आता शाळा सुरू झाली आहे. पण, माझ्या मनात आजही भीती आहे. पुन्हा लॉकडाऊन लागला, शाळा एक-दोन वर्षं बंद झाली तर घरचे लग्न लावून देतील, अशी भीती वाटते. मग माझं पोलीस बनायचं स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी भीती वाटते."

मेहेरझानच्या गावातील '4' जणींचं शाळा बंद असताना लग्न लावण्यात आलं. त्यामुळेच तिला अशी भीती सतावत आहे. मेहेरझानला मात्र पोलीस अधिकारी बनून दारुबंदीवर काम करायचं आहे.

शाळा सुरू झाली आहे. पण मागच्या अभ्यासातल्या काही गोष्टी आम्ही विसरलो आहोत आणि ज्या ऑनलाईन शिकवल्या त्या मात्र आमच्या ध्यानात आहे, असंही ती सांगते.

शाळा बंदचा पालकांवर काय परिणाम झाला, हेही जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

ज्यांची परिस्थिती बिकट आहे ते 5-10 टक्के पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत, असं मुख्याध्यापक सुभाष तळेकर यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "ग्रामीण भागात मौसम पाहून लोक मुलांना कामाला लावतातच. शिक्षकानं कितीही प्रयत्न केले तरी. शासनाचे आदेश असलेतरी. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर थोडा परिणाम होतो. ती झीज भरून काढण्याचं काम शिक्षकाचं त्याच्या पालकाला जाऊन सांगणं आहे. पण, काही 5 ते 10 टक्के पालक ऐकत नाहीत."

आम्ही गावात फिरत असताना अजूनही काही पालक आपल्या मुलांना शेतात मजुरीसाठी घेऊन जाताना दिसले. तर काही मुलं बारीक-सारीक सामानाची टपरी सांभाळताना दिसले.

सध्या ग्रामीण भागात हे असं चित्र असलं तरी, शेतात काम करणं आवडत नाही, शाळेत यायला आवडतं. कारण शाळेत ज्ञान मिळतं, खेळायला मिळतं, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

तर जिथपर्यंत आपली कुवत तिथपर्यंत मुलीला शिकवू. शाळा सुरळित चालू झाली तर शाळेतबी पाठवू, अशी सबदरशाह गुलझरशाह यांच्यासारख्या पालकांची भावना आहे.

पण, कमी वयात मजुरी करण्याचे मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होत असल्यानं त्याकडे अधिक सतर्कपणे पाहण्याची गरज बालमानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करतात.

बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला सांगतात, "बालपणातल्या विविध टप्प्यात व्यक्तीची विशिष्ट वाढ होते. शारीरिक, भावनिक, शाब्दिक, ज्ञानाची वाढ होते. सोशल रिलेशन्समध्ये वाढ होते. या गोष्टी ज्या त्या वेळी झाल्या नाही, तर त्या नंतर होऊ शकत नाही.

लहान मुलांना जेव्हा आपण दिवसाचे 8 ते 10 तास मजुरीसाठी पाठवतो, यात मुलांना शिकण्यासारखं काही नसतं. ती फक्त विशिष्ट प्रकारची अंग मेहनत असते. यात आपण मुलांच्या वाढीचं जन्मभराचं मोठं नुकसान करत असतो."

शिवाय बालमजुरीविषयी बोलताना या लहान शेतमजुरांबद्दल फारच कमी बोललं जातं. भारतातल्या गावागावांमध्ये हाच प्रश्न गंभीरपणे पुढे येतोय.

बालहक्क कार्यकर्ते संतोष शिंदे सांगतात, "गावपातळीवर मजुरीसाठी मोठी माणसं मिळत नाहीत. मग आपण मुलांचा वापर मजुरीसाठी का करू नये, असा प्रश्न निर्माण झाला. शाळा बंद असल्यामुळे मुलांचं शिक्षण थांबल्यामुळे त्यांचा उपयोग कुठे करून घ्यायचा तर शेतातलं काम करून घेण्यासाठी केला जातोय.

मुलांकडून अशापद्धतीनं थोड्या मोबदल्यात काम करून घेतलं जात असेल, तर शेतजमुरीच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे."

मुलांच्या हातात पैसा खेळायला लागला तर ते शिक्षणाकडे दुर्लक्ष करतील. यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असंही शिंदे पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)