You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र: 'या' गावात भिंतींवरच भरते शाळा
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील म्हाळवडी गावाने भन्नाट कल्पना अमलात आणली आहे. त्यांनी संपूर्ण गावाचं रुपांतर शाळेत करून टाकलं आहे. गावातल्या सर्व भिंतीच त्यांनी शाळेच्या अभ्यासक्रमाने रंगवून टाकल्या आहेत. त्यामुळे गावातील मुलं आता खेळता-खेळता अभ्यासही करत आहेत..
कोरोनाच्या प्रसारामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील शाळा बंद आहेत. सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला होता परंतु जिथे साधा फोनसुद्धा लागत नाही तिथे इंटरनेट कुठे मिळणार? त्यातच प्रत्येकाकडे मोबाईल, लॅपटॉप असेल आणि त्याची साक्षरता असेल असंही नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हाळवडी गावाची लोकसंख्या दीड हजाराच्या दरम्यान. गावात अनेक मुलांकडे इंटरनेट आणि इतर सुविधा नव्हत्या. मग जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिकवत होते. यात शिक्षकांचा संपूर्ण दिवस जायचा. त्यातच दररोज सर्वच मुलांना शिकवणंसुद्धा शक्य होत नव्हतं.
मुलांना शिक्षण कसं द्यायचं याबाबत गावकऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी गावातल्या भिंती जर अभ्यासक्रमाने रंगवल्या तर मुलं येता-जाता अभ्यास करु शकतील अशी कल्पना पुढे आली. राजेश बोडके या तरुण व्यावसायिकाने यासाठीचा सर्व खर्च उचलण्याचे ठरवले.
राजेश याच गावचा, याच शाळेत शिकलेला. सध्या तो पुण्यात टेलिकॉम क्षेत्रात व्यवसाय करतो. आपल्या गावासाठी, तिथल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे भिंती रंगविण्याचा सर्व खर्च त्याने करण्याचा निर्णय घेतला. गावातीलच संदीप बोडके या पेंटरने भिंती रंगवण्याची तयारी दर्शवली.
गावकऱ्यांच्या सहभागातून मुलांचा अभ्यासक्रम गावातील भिंतींवर रंगवण्यात आला. त्यातही लक्ष वेधून घेणारे रंग वापरण्यात आले. त्यामुळे मुलांचं लक्ष त्या भिंतींकडे जाऊ लागलं. पाहता पाहता गावातल्या भिंती अभ्यासक्रमाने सजून गेल्या.
आता मुलं येता-जाता या भिंतींजवळ थांबून अभ्यासाची उजळणी करतात. एवढंच काय तर गावकरीसुद्धा पारावर बसल्या बसल्या मुलांचा अभ्यास घेतात. या भिंती रंगविण्याचा फायदा केवळ मुलांनाच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना तसेच ज्यांचं काही कारणाने शिक्षण सुटलं किंवा घेता आलं नाही अशा गावकऱ्यांना देखील होतोय.
पाढ्यांपासून ते इतिहासापर्यंत तर गणिताच्या समिकरणांपासून ते स्वच्छतेच्या सवयींपर्यंत सारं काही आता गावातल्या भिंतींवर आहे. बालवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतचा अभ्यासक्रम भिंतींवर रेखाटण्यात आला आहे.
खेळता-खेळता मुलं आता पाढे पाठ करु लागली आहेत. गप्पा मारताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना आत्मसात होतोय. किचकट समिकरणं सतत पाहिल्यामुळे लक्षात राहायला लागली आहेत. या उपक्रमामुळे शिक्षकांना देखील मुलांना शिकवणं सोपं झालंय. या अभ्यासक्रमामध्ये सर्वच आवश्यक माहिती असल्याने स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांची देखील उजळणी यातून होत आहे.
या संकल्पनेबाबत बीबीसी मराठीशी बोलताना राजेश बोडके म्हणाले, ''ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षण घेताना अडचण येते, त्यांच्याकडे सोयी नसतात. शाळा बंद असल्याने मुलांचा कल खेळाकडे जास्त जात होता. त्यामुळे खेळता-खेळता मुलांना शिक्षण देता येईल का याचा विचार आम्ही केला.
ही संकल्पना आम्हाला लॉकडाऊनमुळे सुचली. शिक्षकांना मुलांना शिकवताना खूप अडचणी येत होत्या. त्यातून चर्चेतून ही संकल्पना पुढे आली. ही संकल्पना पूर्णत्वास नेण्याचं काम शिक्षकांनी केलं त्यांनीच कुठला अभ्यासक्रम रेखाटायला हे ठरवले.''
मुलं खेळायला बाहेर पडली की त्यांना भिंतींवरचा अभ्यास दिसतो. यातून मुलांची उजळणी होते. ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा काही अभ्यासक्रमाचा यात समावेश केला आहे. गुंठेवारी कशी मोजायची? अशा विविध गरजेच्या माहितींचा समावेश करण्यात आला आहे. शाळेंच्या भिंती, घरांच्या भिंती सार्वजनिक भिंतींवर अभ्यास रंगविण्यात आला आहे.
काही मुलं या भिंतींच्या समोर जाऊन बसून अभ्यास करतात. मुलांच्या सोबत पालक असतील तर ते देखील भिंतीवर काय लिहिलंय? त्याला जमतंय का? हे पाहातात.
अॅपेक्स कलरचा वापर करुन या भिंती रंगविण्यात आल्याने पुढील 10 वर्षं हा अभ्यासक्रम या भिंतींवर राहील असा दावा या गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गणेश बोरसे करतात. त्यामुळे कोरोनानंतर शाळा सुरु झाल्यावर देखील याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल, असेही ते सांगतात.
या उपक्रमाबाबत बोलताना बोरसे म्हणाले, ''कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा दीड वर्षाचा काळ वाया गेला आहे, तो त्यांच्या भविष्यावर परिणाम करणारा काळ आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान भरुन काढणे आवश्यक आहे. या काळात शासनाने सांगितलेले ऑनलाईन तसेच ऑफलाईन शिक्षणाचा उपक्रम राबवित होतो, परंतु त्याचा फारसा परिणाम विद्यार्थ्यांनमध्ये दिसत नव्हता. त्यातच ग्रामीण भागात सातत जाणारी वीज, इंटरनेट, पालकांकडे असणारा स्मार्टफोनचा अभाव यामुळे देखील मुलांना शिकवताना अनेक अडचणी येत होत्या.''
''ऑफलाईनमध्येसुद्धा आम्ही मुलांच्या घरी जाऊन, ओसरीवर जाऊन मुलांना शिकवत होतो. परंतु यात सर्व विद्यार्थी कव्हर होत नव्हते. अभ्यासक्रमातील बेसिक गोष्टी जर विद्यार्थ्यांच्या समोर सातत्याने समोर असतील तर ते त्यांच्या लक्षात राहतात. त्यातूनच ही कल्पना समोर आली. हा अभ्यासक्रम रेखाटताना सर्वच इयत्तांचा विचार करण्यात आला. या अभ्यासक्रमाचा सर्वांनाच फायदा झाला'', असेही बोरसे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)