You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊतांनी अजित पवारांना इशारा देण्याचे 'हे' आहे कारण
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
"पुण्याचे पालकमंत्री आपले नाहीत. राज्यात जरी सत्ता असली तरी या भागात कोणी आपलं ऐकत नाही, असं कार्यकर्ते म्हणतात, असं होतं कामा नये. अजितदादा देखील मुख्यमंत्र्यांचं ऐकतात आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत."
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा इशारा अजित पवारांना दिला. रविवारी (26 सप्टेंबर) ते भोसरी येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
"मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या दिल्लीवर देखील आम्हाला राज्य करायचे आहे," असं देखील संजय राऊत त्यांच्या भाषणात म्हणाले.
संजय राऊत यांनी रविवारी पिंपरी चिंचवड आणि पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यात त्यांच्या भाषणामधील रोख हा अजित पवारांवर असल्याचा दिसून आलं.
"अजित दादांसोबत बसून बोलू आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आमच्या लोकांना नाराज करु नका नाहीतर गडबड होईल,"असं देखील राऊत भोसरीतील कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.
"पुण्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका. कारण शिवसैनिक तापला की माझी सटकली म्हणून तो रस्त्यावर उतरतो, त्यामुळे त्याची काळजी घ्या," असा इशारा राऊत यांनी पुण्यातील मेळाव्यात दिला.
येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यात पुण्याकडे आता विविध राजकीय पक्ष अधिक लक्ष देत आहेत. या आधी सुद्धा संजय राऊत यांनी पुण्यात येत कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
सध्या पुण्यात शिवसेनेचे 10 नगरसेवक आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये 9 नगरसेवक आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचंही प्राबल्य अधिक आहे.
पुण्यात संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आता शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी पुणे महानगरपालिकेत एकत्र लढली तर अधिकाधिक जागा मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफुस होण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील खेड पंचायत समितीच्या सभापतींच्या विरोधात अविश्वासाच्या ठराव संमत केल्याच्या घटनेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खटके उडाले होते.
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वासाचा ठराव दाखल केला होता.
पंचायत सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले होते. पंचायत समितीच्या बंडखोरीमागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा हात असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता.
याप्रकरणानंतर संजय राऊत यांनी खेडमध्ये जात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी 'दिलीप मोहितेंचा बंदोबस्त करावा नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा' असा इशारा अजित पवारांना दिला होता.
संजय राऊत अजित पवारांना इशारा का देतात?
5 जूनला संजय राऊत यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुणे महानगरपालिका निवडणुकाबाबतची शिवसेनेची भूमिका देखील स्पष्ट केली होती.
त्यावेळी देखील त्यांनी खेडच्या वादाच्या प्रकरणी अजित पवार यांनी लक्ष घालावे असे म्हटले होते.
संजय राऊतांनी अजित पवारांना दिलेल्या इशाऱ्याबाबत बोलताना 'लोकमत' पुणेचे सहसंपादक सुकृत करंदीकर म्हणाले, "शिवसेनेची राज्यामध्ये सत्ता आलेली असताना पुण्यात शिवसेना म्हणावी तितकी सक्रीय झालेली नाही. पुण्यामध्ये शिवसेनेचे अस्तित्व नगण्य आहे."
"गेल्या निवडणुकीत 10 नगरसेवकांच्या पुढे शिवसेनेला मजल मारता आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी संजय राऊतांनी आक्रमक वक्तव्य केली. परंतु जागांच्या वाटाघाटीच्या वेळेला या वक्तव्यांना काही अर्थ उरणार नाही. आघाडी झाली तरी शिवसेनेला जागांच्या बाबतीत राष्ट्रवादीच्याच दबावात राहावं लागेल. कारण राष्ट्रवादीची ताकद खूप मोठी आहे,'' करंदीकर सांगतात.
करंदीकर पुढे म्हणतात, "शिवसेनेचे मर्यादीत बळ लक्षात घेता आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून राऊतांनी हा अट्टहास केल्याचा दिसून येतोय. राऊतांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी देखील गांभीर्याने घेईल असं वाटत नाही.
"पुणे महानगरपालिकेतील लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होईल. आपल्या जागा वाढविण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेला सोबत घेईल परंतु शिवसेनेसाठी आपल्या काही जागा सोडेल असं वाटत नाही," असं करंदीकर यांना वाटतं.
येत्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती व्हावी यासाठी हा अजित पवारांवर दबाव टाकण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
मेहता यांनी म्हटलं, "या आधी संजय राऊत जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग महापालिकेत राबवू असे राऊत म्हणाले होते. पुण्याच्या पालिका निवडणुका अजित पवारांच्या नेतृत्त्वात लढू असं देखील ते धाडसानं म्हणाले होते. आता तीन महिन्यानंतर राऊत पुण्यात आले तेव्हा त्यांच्या आधिच्या वक्तव्याच्या विरुद्ध राऊत बोलतायेत.
"एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात प्रभाग रचनेवरुन वाद आहेत. अजित पवारांनी कोरोनामध्ये पुण्यावर लक्ष केंद्रीत केले होते आणि महापालिका निवडणुकांसाठी देखील ते पुणे आणि पिंपरी-चिंचवडवरच भर देत आहेत. पुणे आणि पिंपरीमध्ये भाजपला त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे संजय राऊत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होण्याबाबत आग्रही आहेत. ही युती फलद्रुप होताना दिसत नाही म्हणून राऊत अजित पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत," मेहता सांगतात.
शिवसेनेची पुण्यातील स्थिती नेमकी काय आहे?
मुंबईत शिवसेनेची सत्ता असली तरी पुण्यात मात्र शिवसेनेचा महापौर अद्याप होऊ शकला नाही. पुण्यात नेहमीच राष्ट्रवादी आणि भाजपचे वर्चस्व राहिले आहे.
2007 साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे 20 नगरसेवक निवडूण आले होते. त्यानंतर ही संख्या कमी होत गेली. 2012 च्या निवडणुकीत 15 तर 2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले.
गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमी होत गेलेत. त्याचबरोबर पुणे शहरात सध्या शिवेसेनेचा एकही आमदार नाही.
पुण्यातील शिवसेनेच्या अधोगतीबाबत बोलताना करंदीकर म्हणाले, ''शिवसेनेचे मुंबईतील नेते, पदाधिकारी यांनी पुण्याला महत्त्व दिले नाही. भाजपसोबत युती असताना पुण्यातील जास्तीत जास्त मतदारसंघ हे भाजपकडे असायचे तसंच लोकसभेची जागा देखील युतीमध्ये भाजपकडे होती. भाजपसोबत युती केल्यानंतर शिवसेनेला वाढण्यासाठी स्कोप मिळाला नाही.
शिवसेनेला पुण्यात प्रभावी पदाधिकारी मिळाले नाहीत तर दुसरीकडे शिवेसेनेच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात पक्ष वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसत नाही. शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना राष्ट्रवादीसोबत जाणं महत्त्वाचं आहे," असं करंदीकर सांगतात.
"पुण्यात शिवसेनेला नेतृत्व नाही. उद्धव ठाकरेंनी पुण्याकडे आवश्यक तेवढं लक्ष दिलं नाही. स्थानिक नेतृत्व देखील पुण्यात तयार होऊ शकले नाही. पुण्यात पक्ष वाढण्यासाठी शिवसेनेचा आश्वासक चेहरा नाही," असं अद्वैत मेहता सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)