'सोनिया गांधींनी 2004 साली पंतप्रधान व्हायला हवं होतं' - रामदास आठवले #5मोठ्याबातम्या

आज वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या पाच बातम्यांचा थोडक्यात आढावा पाहूया,

1. 'सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं' - रामदास आठवले

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष होऊ शकतात मग सोनिया गांधी सुद्धा 17 वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे.

2004 साली यूपीएला बहुमत होतं त्यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हायला हवं होतं असं ते म्हणाले. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली.

भारतीय वंशाची महिला अमेरिकेत उपाध्यक्ष होऊ शकते मग 2004 मध्ये भारताच्या नागरिक, राजीव गांधींच्या पत्नी, लोकसभेवर निवडून आलेल्या सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, "2004 मध्ये यूपीएला बहुमत होतं त्यावेळी सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं असा प्रस्ताव मीच पुढे ठेवला होता. त्यांच्या परदेशी वंशाचा त्यावेळी कोणताही विषय नव्हता असं माझं मत होतं."

त्यांना पंतप्रधान व्हायचं नव्हतं तर शरद पवार यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्र द्यायला हवी होती असंही आठवले यांनी म्हटलं.

"शरद पवार लोकनेते असल्याने पंतप्रधानपदासाठी ते अधिक योग्य होते. मनमोहन सिंह यांच्यापेक्षा त्यांना संधी द्यायला हवी होती. यामुळे काँग्रेसची अशी दुर्दशा झाली नसती." असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

2. शारीरिक संबंध ठेवून लग्नासाठी नकार दिल्यास बलात्कार ठरत नाही - हायकोर्ट

दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवून ऐनवेळी लग्नासाठी नकार दिल्यास आरोपीवर बलात्काराचा आरोप लागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुलाने लग्नाचे वचन दिले आणि त्यातून शारिरीक संबंध निर्माण झाले, मात्र आता तो लग्नासाठी तयार नसल्याचं सांगत पीडितेने पोलीस स्टेशनला त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. सकाळने हे वृत्त दिलं आहे.

30 वर्षीय महिलेने बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी मुलाने न्यायालयात याचिका दाखल केली. सहमतीने आमच्यात शारीरिक संबंध झाले होते त्यामुळे बलात्कार होऊ शकत नाही असा युक्तिवाद आरोपीकडून करण्यात आला.

यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने म्हटलं, कागदपत्र आणि तक्रारीवरुन आरोपीला पीडित महिलेशी लग्न करायचे होते असे स्पष्ट होत आहे. मात्र नंतर त्याने लग्नाला नकार दिला. यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

3. 'मराठी माणूस हा काही एका पक्षाचा कॉपी राईट नाही' - नितेश राणे

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगलं आहे.

शिवसेनेला 32 वर्षं सत्ता दिली आम्हाला 5 वर्ष द्या, असं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

मराठी माणसाच्या मुद्यावरुन त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मराठी माणूस हा काही एका पक्षाचा कॉपी राईट नाही, असं नितेश राणे म्हणाले.

मराठी माणसासाठी लढणारा पक्ष होता मग मराठी लोकांना मुंबईपासून दूर वसई, विरार, कल्याण, डोंबिवली याठिकाणी रहायला का जावं लागलं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, "शिवसेनेने मराठी माणसांसाठी काय केलं. पाच वर्ष मराठी माणसाने आपला पर्याय बदलावा. 32 वर्ष तुम्ही एकाच पक्षाला संधी दिलीय. ती शिवसेना तशीही आता पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही."

4. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे बसून अजित पवरांना 'चुकलो' असं का म्हणावं लागलं?

"मी जिल्हाधिकारी म्हणालो का? आता एवढं कुठे शिकलोय मी. खूप दिवसांनी एवढी चूक झाली," असं उपमुख्यमंत्री अजित पवार भर सभेत बोलले.

सातारा जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना 'मी पाच वर्षं जिल्हाधिकारी होतो' असं ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडे चिठ्ठी पाठवली. त्यात लिहिलं होतं 'जिल्हाधिकारी नव्हे पालकमंत्री म्हणा.'

टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं

ही चिठ्ठी वाचताच अजित पवार म्हणाले, "खूप दिवसांनी अशी चूक झाली हो. यापूर्वी मोठी चूक झाली होती. त्याची किंमत मोजावी लागली. तेव्हापासून कानाला खडा लावला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे बसलो आणि साहेब चुकलो म्हणालो."

5. कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा नेता कन्हैया कुमार 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. लोकसत्ताने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच कन्हैया कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु आता कन्हैया कुमार 28 सप्टेंबरला प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे.

कन्हैया कुमार हा त्याच्या भाषणांसाठी ओळखला जातो. शिवाय, 2019 मध्ये बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. भाजपचे नेते गिरीराज सिंह यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)