स्नेहा दुबे: इम्रान खान यांना प्रत्युत्तर देणारी भारतीय अधिकारी कोण?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना भारतावर गंभीर आरोप केले. इम्रान खान असं करतील हे काही अनपेक्षित नव्हतं. त्यानंतर इम्रान खान यांचं भाषण संपताच भारतानंही लगेचच 'राईट टू रिप्लाय' अंतर्गत तत्काळ उत्तर दिलं.

भारताकडून संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं स्नेहा दुबे यांनी उत्तर दिलं.

इम्रान खान यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं गंभीर उल्लंघन आणि भाजप सरकारवर मुस्लीमांविरोधी भीतीचं वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला. इम्रान खान यांनी इस्लामोफोबियाचाही उल्लेख केला तसंच संयुक्त राष्ट्रानं याबाबत बैठक बोलावण्याचीही मागणी केली.

''भारत विविध कारवाया आणि निर्णयांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचं उल्लंघन करत आहे. वादग्रस्त भागात संयुक्त राष्ट्रांच्या निगराणीत निःपक्षपणे जनमत चाचणीद्वारे निर्णय व्हावा, असं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावात म्हटलं आहे. भारत कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांचंही उल्लंघन करत आहे. काश्मीरमधील मानवाधिकारांच्या या पायमल्लीवर जगाचा प्रतिसाद मात्र भेदभाव करणारा आहे," असं इम्रान खान म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांच्या या सर्वसाधारण सभेत भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाला विरोध दर्शवत, त्यावर प्रत्युत्तरही दिलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चा करत भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्नेहा दुबे म्हणाल्या. इम्रान खान यांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी भारतानं राइट टू रिप्लायचा वापर केल्याचं त्यांनी सांगितलं.

पाकिस्तान असा देश आहे, जिथं दहशतवादी मुक्त फिरतात, जो शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी दहशतवादाला पाठिंबा देतो, असं स्नेहा दुबे यांनी संयुक्त राष्ट्रांत म्हटलं.

भारताच्या राजदूत स्नेहा दुबे यांनी अत्यंत कठोर शब्दांत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान प्रत्यक्षात आग लावणारा देश आहे. मात्र तो स्वतःला अग्निशामक समजतो असं त्या म्हणाल्या.

सध्या चर्चा होत असलेली, स्नेहा दुबे यांनी दिलेली 5 उत्तरं -

1. दहशतवाद्यांना खुलेआम पाठिबा देण्यासाठी आणि त्यांना शस्त्र पुरवण्यासाठी जागतिक स्तरावर पाकिस्तानला ओळखलं जातं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना आसरा देण्याचा अपमानास्पद विक्रमही पाकिस्तानच्या नावावर आहे.

2. पाकिस्तान केवळ शेजाऱ्यांना त्रास देता येईल या अपेक्षेपोटी दहशतवाद्यांना पोसतो. ओसामा बिन-लादेनलाही पाकिस्तानातच आसरा मिळाला होता. आजही पाकिस्तान सरकार त्याचा 'शहीद' म्हणून गौरव करतं.

3. पाकिस्तानला दहशतवादाची झळ बसली आहे, हे आपण अनेकदा ऐकतो. पण हा असा देश आहे, जो स्वतःच आग लावतो आणि आपणच आग विझवणारे (अग्निशामक) असल्याप्रमाणे भूमिका मांडतो.

4. जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग होते आणि कायम राहतील.

5. देशात असलेली विविधता समजून घेणं पाकिस्तानसाठी कठीण आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या देशात पाकिस्तान अल्पसंख्याकांना उच्च पदांपासून कायम दूर ठेवतो.

पाकिस्ताननं काय म्हटलं होतं?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना, भारतावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला.

इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत, भारतानं 5 ऑगस्ट 2019 नंतर अनेक अवैध आणि एकतर्फी पावलं उचलली असल्याचा आरोप केला.

भारतानं काश्मीरमध्ये नऊ लाख सैनिक तैनात केले आहेत. काश्मिरी नेत्यांना तुरुंगात कैद केलं आहे. माध्यमं आणि इंटरनेटवर बंदी घातली आहे, असं पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये शांततापूर्वक केली जाणारी आंदोलनंही दाबली जातात. तसंच काश्मीरमध्ये 13 हजार तरुणांचं अपहरण आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोपही, इम्रान खान यांनी भारतावर केला आहे.

काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या मृत्यूचा उल्लेखदेखील इम्रान खान यांनी केला. गिलानी यांच्या कुटुंबीयांना मुस्लीम पद्धतीप्रमाणं अंत्यसंस्कारही करू दिले गेले नाही. भारताच्या क्रौर्याचं हे ताजं उदाहरण असल्याचं इम्रान खान म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)