You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनिया आणि राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर यांच्यासाठी जागा आहे का?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यात झालेल्या भेटीची सध्या जोरदार चर्चा आहे.
'काहीतरी मोठं घडणार आहे' असे संकेत असल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांकडून दिले जात असले, तरी हे मोठं नेमके काय आहे? याबाबत मात्र अद्याप कोणीही काहीही बोललं नाही.
या चौघांमध्ये झालेल्या भेटीबाबत प्रशांत किशोर किंवा गांधी घराण्याकडून दुजोरा मिळालेला नाही. परंतु काँग्रेस हायकमांड चारही बाजूंनी संकटात असताना चर्चा झाली हे वास्तव नाकारता येणार नाही.
काही लोक याकडे पंजाब काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाशी जोडत आहेत.
तसंच राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच हे सुद्धा भेटीमागचे कारण असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसशासित राज्य छत्तीसगढमध्येही टी. एस. सिंग देव आणि भूपेश बघेल यांच्यात सर्व काही आलबेल नाही.
तसंच गेल्या वर्षी सुरू झालेल्या काँग्रेसच्या जी-23 प्रकरणीही अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या बैठकीनंतर राजकीय विश्लेषकांकडून प्रशांत किशोर यांना कॉंग्रेसचे 'ट्रबल शूटर' म्हणून पाहिलं जात आहे.
प्रशांत किशोर यांच्या भेटीचा अर्थ
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विनोद शर्मा सांगतात, "प्रशांत किशोर सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे राजकीय सल्लागार आहेत. अलीकडच्या काळात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनाही चांगला विजय मिळवला. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी विरोधी नेत्यांची भेट घेतली."
"यावरुन आपण असे म्हणू शकतो की प्रशांत किशोर हे विखुरलेल्या विरोधकांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करणारा दुवा असल्याचे दिसते. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत लालू आणि नितीश एकत्र लढले, तेव्हाही त्यांची भूमिका लालू आणि नितीश यांच्यातील दुव्याची होती. प्रचाराच्या वेळी त्यांनी या दोघांचा अत्यंत स्थिर पद्धतीने वापर केला."
काँग्रेसला आजमितीला एका चांगल्या समन्वयकाची गरज आहे. हे काम प्रशांत किशोर उत्तम पद्धतीने करू शकतात असंही विनोद शर्मा सांगतात.
ते म्हणतात, प्रशांत किशोर केवळ काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण विरोधकांनाही एकत्र आणू शकतात. पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतीकाराच्या भूमिकेपासून वेगळं होणार असल्याचीही घोषणा केली होती. विनोद शर्मा यांच्या विश्लेषणला त्या दृष्टिकोनातूनही पाहता येईल.
प्रशांत किशोर यांच्याशी संबंधित आणखी एक वस्तुस्थिती आहे ती म्हणजे, त्यांनी आताचे सत्ताधारी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यापासून ते जगनमोहन रेड्डी, राहुल गांधी, लालू यादव, शरद पवार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यापर्यंत अगदी सर्वांसोबत एकदा तरी काम केलं आहे.
परंतु समन्वयकाच्या भूमिकेला ते किती न्याय देऊ शकतील किंवा सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम ते करू इच्छितात का याविषयी भाष्य करणे सध्या घाईचे ठरेल असंही ते सांगतात. दरम्यान, काही तज्ज्ञ शरद पवार यांना या भूमिकेसाठी अधिक चांगला पर्याय मानतात.
जुन्या काँग्रेस नेत्यांचा धाक आजही कायम
प्रशांत किशोर प्रकरणाशी संबंधित आणखी एक बाजू देखील आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद हा आजचा नाही त्याचप्रमाणे सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील वादही नवीन नाही. तेव्हा हे जुने नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नियंत्रणात नाही तेव्हा कोणी तिसऱ्या पक्षाचे ते ऐकतील का?
ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई सांगतात, "राजकारणात कोणताही माणूस तेव्हाच धाक दाखवू शकतो जेव्हा एकतर त्याने निवडणूक जिंकली असेल किंवा विजय मिळवून दिला असेल. सध्या राहुल गांधी असो वा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने दोन लोकसभा निवडणुका हारल्या आहेत. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली नाही."
"राहुल गांधी तर आपला अमेठीचा मतदारसंघही वाचवू शकले नाहीत. राहुल गांधी आतापर्यंत हा विचार करत होते की केरळ किंवा आसामसारखे राज्य जिंकले तर पक्षाला थोडी ताकद मिळाली असती पण तसेही होऊ शकले नाही. यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे सरकार स्थापन झाले, त्या ठिकाणचे मुख्यमंत्री पक्षनेतृत्वापेक्षा स्वत:ला मोठे मानत आहेत."
याला सोनिया आणि राहुल गांधी यांची कार्यशैली सुद्धा कारणीभूत आहे असंही रशीद किदवई यांना वाटते.
राहुल आणि सोनिया गांधी यांच्या कार्यशैलीत फरक
राहुल गांधी यांचा तरुण नेत्यांवर अधिक विश्वास असतो तर सोनिया गांधी आजही जुन्या काँग्रेसी नेत्यांना सोबत घेण्यावर विश्वास ठेवतात असं मानलं जातं.
याविषयी बोलताना रशीद किदवई सांगतात, "राहुल आणि सोनिया गांधी यांच्या काम करण्याच्या शैलीत एक मूलभूत फरक आहे आणि तो म्हणजे जर कोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर राहुल गांधी त्यांची मनधरणी करत नाहीत. पण सोनिया गांधी शेवटपर्यंत सर्वांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करतात."
"शिवाय, राहुल गांधी लोकशाही मार्गाने जाण्यावर विश्वास ठेवतात पण पक्ष लोकशाही मार्गाने चालत नाहीये. जुने नेते जोडतोडचे राजकारण करण्यात माहिर आहेत. मध्य प्रदेशातील निवडणुकीनंतर पाहिल्याप्रमाणे कमलनाथ आणि दिग्विजय सिंह एकत्र झाले. तर अशोक गेहलोत राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बनण्यात यशस्वी झाले. अशा परिस्थितीत ना सोनिया गांधी जुन्या काँग्रेसजनांना पटवून देण्याच्या स्थितीत आहेत ना राहुल गांधी."
आता काही मोजकी राज्य काँग्रेसच्या हातात आहेत. पक्ष चालवण्यासाठी काँग्रेस नेतृत्त्व एकप्रकारे या राज्यांवर अवलंबून आहे.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील अंतर मिटवण्याचा प्रयत्न प्रियांका गांधी करू शकल्या असत्या पण त्यांचे प्रयत्न सुद्धा अपयशी ठरताना दिसतात.
उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्याकडे दिली होती. पण त्याचे परिणामही जाहीर आहेत.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद दूर करण्याच्या प्रयत्नातही त्या होत्या. परंतु आजपर्यंत तोडगा निघालेला नाही.
अधीर रंजन चौधरी यांचे काय होणार?
संसदेतही काँग्रेस नेत्यांचा दुष्काळ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून अधीर रंजन चौधरी यांची पदावरून हकालपट्टी करण्याची चर्चा सुरू आहे.
मात्र, काँग्रेसने याबाबत घोषणा केलेली नाही. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या निकालानंतर पक्षांतर्गत त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
विनोद शर्मा यांच्यानुसार, सध्या अधीर रंजन चौधरी यांच्याबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. अशी चर्चा होण्याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरी यांचे ममता बॅनर्जी यांच्याशी असलेले संबंध फारसे चांगले नाहीत.
2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता, येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांचा कोणताही मोर्चा तयार झाला तर ममता बॅनर्जी यांना त्यात सामील होण्यात अडथळा आणणारे कोणतेही व्यक्तिमत्त्व त्यात नसावे.
तसेही अधीर रंजन चौधरी यांची राजकीय उंची फारशी नाही पण तरीही संसदेत विरोधी पक्ष एकत्र येणार असेल तर विरोधी पक्षनेते पद महत्त्वाची भूमिका बजावतात.
त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांचे टीएमसीशी जुळत नसल्याने त्यांच्या जागी दुसरा कोणी नेता आल्यास विरोधकांमधील समन्वय अधिक प्रभावी होऊ शकतो असंही ते सांगतात.
संघटनात्मक बदल अखेर कधीपर्यंत?
काँग्रेस पक्षाला अहमद पटेल यांची उणीव भासत आहे कारण इतक्या चर्चांनंतरही ते पूर्णवेळ अध्यक्षाची नियुक्ती करू शकलेले नाहीत. ते पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे.
ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई म्हणाले, "याआधी जेव्हा जेव्हा काँग्रेस एका संघर्षातून गेली तेव्हा पक्षात फूट पडली. अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले. यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आणि यामुळे पक्षाची घडी नव्याने बसली. यावेळी मात्र पक्ष एका वाईट काळातून जात असला तरी पक्षातून बाहेर पडणारे नेते अधिक नाहीत.
"ज्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली ते फारसे मोठे नव्हते. ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, प्रियांका चतुर्वेदी, अभिषेक मुखर्जी ही मोठी नावं आहेत. पण त्यांच्या जाण्यानेही काँग्रेस पक्षात नवचैतन्य येऊ शकले नाही जसे यापूर्वीच्या काळात पहायला मिळाले. यामुळे पक्षाची अवस्था जैसे थे आहे," किदवई सांगतात.
आता काँग्रेसला पूर्ण सर्जरीची आवश्यकता आहे. पण प्रश्न हा आहे की ही सर्जरी करणारा डॉक्टर कोण असेल?
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)