You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शाह-उद्धव ठाकरेंचं एकत्रित भोजन, दोघांमधील स्वतंत्र बैठकीची चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (26 सप्टेंबर) दिल्लीत बैठक पार पडली.
नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने बोलवलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे हजर राहिले होते. त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलिस महासंचालक संजय पांडे देखील होते.
नक्षलवादी कारवाया आणि नक्षलवादी क्षेत्राचा विकास हा बैठकीचा चर्चेचा विषय होता. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' निवासस्थानी बैठक बोलवली होती.
नवी दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात स्वतंत्र भेट होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात वेगळी चर्चा झाली होती. त्यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज्यात शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
नक्षलग्रस्त दहा राज्यांची बैठक
साधारण 10 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनात या बैठकीला सुरुवात झाली असून अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त दहा राज्यांच्या मुख्यमंत्री आणि पोलीस प्रमुखांची बैठक अमित शाह यांनी आयोजित केली आहे.
या बैठकील केंद्रीय गृह विभागाकडून गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे महासंचालक अरविंद कुमार, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा बैठकीत असणार आहेत.
ही बैठक दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनकडे रवाना होतील. दुपारी 3.20 वाजता दिल्ली विमानतळावरून त्यांचे मुंबईकडे प्रयाण होईल अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अजितदादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल - संजय राऊत
पुण्यातील भोसरी इथं झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी, भाजप यांच्यावर मिश्किल शब्दात भाष्य केलं. मात्र, या भाष्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांनी भोसरीतल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं बोलताना म्हटलं की, "लकमंत्री आपले नाहीत. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. पण असं होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज."
मात्र, लगेच संजय राऊत यांनी माध्यमांनी पूर्ण ऐकून घ्यावं, मग छापावं म्हणत पुढे म्हटलं की, "मुख्यंमत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचं आहे. साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, तिथे आपल्याला टप्प्याटप्प्याने पोहोचायचं आहे. या सगळ्याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत आहे. त्यामुळे अजित पवारांना आम्ही सांगू की आमच्या लोकांचंही ऐकत जा तुम्ही, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)