छत्तीसगड हल्ला : माडवी हिडमा कोण आहे ज्याच्या शोधात जवान गेले आणि मृत्युमुखी पडले

    • Author, बाला सतीश
    • Role, बीबीसी तेलुगू

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर नक्षली नेता माडवी हिडमाचं नाव सतत चर्चेत येतंय.

3 एप्रिलला सुरक्षा दलाचे जवान पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मीचा नक्षली कमांडर माडवी हिडमाला पकडायला निघाले होते. पोलिसांना माहिती मिळाली होती की हिडमा आणि त्याचे साथीदार या भागात आलेले आहेत.

पण ऐनवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यावेळेला झालेल्या चकमकीत 22 जवानांचा मृत्यू झाला.

40 वर्षांचा हा बंडखोर माओवादी नेता दंडकारण्यात गेल्या दशकात झालेल्या अनेक मृत्यूंसाठी जबाबदार आहे, असं म्हटलं जातं. माडवी हिडमा यांना ओळखणारे आणि त्याला भेटलेल लोक एका गोष्टीचं आश्चर्य व्यक्त करतात की 'एकच व्यक्ती इतक्या साऱ्या योजना कशी बनवू शकते?'

बीबीसी अशा काही लोकांशी बोललं ज्यांनी माओवादी संघटनेत काम केलं आहे पण आता ते त्या संघटनेपासून वेगळे झाले आहेत. यातल्या काही लोकांची हिडमाशी एकदा किंवा दोनदा भेटही झालेली आहे.

हे लोक सांगतात की, "हिडमा फार सौम्य शब्दांत आणि आदराने बोलतो. असा माणूस इतक्या विध्वंसासाठी कसा काय कारणीभूत असू शकतो या विचाराने आम्ही हैराण होतो."

पण हिडमाने सुरक्षादलांवर जवळपास 10 वेळा हल्ला केला आहे आणि शेकडो जवानांच्या मृत्यूसाठी तो जबाबदार आहे.

कशी झाली सुरुवात?

माओवादी पार्टीत हिडमाचं मोठं होणं आश्चर्यकारक आहे. हिडमाने 1996-97 मध्ये माओवादी पक्षात प्रवेश केला. तेव्हा त्याचं वय फक्त 17 होतं. हिडमाची आणखी दोन नाव आहेत, हिदमाल्लू आणि संतोष.

हिडमा दक्षिण बस्तर भागातल्या सुकमा जिल्ह्यातल्या पुवर्ती गावाचा राहाणारा आहे. असं म्हणतात की याच गावातून 40-50 माओवादी आले आहेत. नक्षलवादी होण्याआधी हिडमा शेती करायचा.

हिडमा मितभाषी आहे, त्याला नवीन नवीन गोष्टी शिकण्यात रस आहे. त्याने माओवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका प्राध्यापकाकडून इंग्लिश भाषाही शिकली आहे. हिडमाची मातृभाषा हिंदी नसली तरी त्याला हिंदी भाषाही येते. त्याचं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे.

माओवादी संघटनेच्या एका माजी सदस्याने बीबीसीला सांगितलं, "हिडमाला 2000 च्या आसपास माओवादी संघटनेच्या हत्यारं बनवणाऱ्या शाखेत पाठवलं गेलं. लोक म्हणतात की हिडमाने तिथे हत्यारं बनवायच्या नवनवीन पद्धती शोधून आपल्या कौशल्याचा परिचय दिला. तो स्वतः हत्यारं बनवायचा, त्यांची देखभाल-दुरुस्ती करायचा आणि स्थानिक पातळीवर ग्रेनेड आणि लॉन्चर्सची व्यवस्था करायचा."

2001-02 च्या आसपास हिडमाला दक्षिण बस्तर जिल्हा तुकडीत पाठवलं. त्यानंतर तो माओवाद्यांची सशस्त्र तुकडी पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मीमध्ये सहभागी झाला.

एकेक पायरी चढण्याचा प्रवास

माओवाद्यांच्या कारवायांचा अभ्यास करणारे लोक म्हणतात की 2001 ते 2007 या काळात हिडमा एक सामान्य सदस्य होता. पण बस्तर भागातल्या सलवा जुडूम मोहिमेने त्याला सक्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

एका विश्लेषणानुसार सलवा जुडूम विरोधात लोकांच्या मनात उफाळलेल्या रोषाने बस्तरमध्ये माओवाद्यांना नवसंजीवनी दिली. नाहीतर 90 च्या दशकात तिथे माओवाद्यांसाठी अनुकूल परिस्थिती नव्हती.

याच काळात हिडमालाही माओवादी संघटनेत वरच्या पदापर्यंत पोहचण्याची संधी मिळाली असावी.

एका माजी माओवाद्याचं म्हणणं आहे की, "आपल्या लोकांवर झालेल्या अत्याचाराने त्यांच्या मनात राग साठून राहिला होता."

मार्च 2007 मध्ये उरपल मेट्टा भागात पोलिसांवर झालेल्या एका हल्ल्यात सीआरपीएफचे 24 जवान मारले गेले होते. हा हल्ला हिडमाच्याच नेतृत्वाखाली झाला होता, असं म्हणतात.

माओवादी संघटनेचे एक माजी सदस्य म्हणतात की, "सीआरपीएफच्या जवानांनी पूर्ण गाव जाळलं. जेव्हा हिडमा आणि त्याच्या साथीदारांना ही गोष्ट कळली तेव्हा ते पोलिसांना थांबवण्यासाठी तिथे पोहचले आणि त्यांनी सीआरपीएफवर हल्ला केला."

अर्थात, सीआरपीएफच्या जवानांनी पूर्ण गाव जाळलं होतं याला बीबीसी दुजोरा देत नाही.

ही घटना महत्त्वाची होती कारण तो पर्यंत माओवादी भूसुरुंगावर जास्त अवलंबून असायचे. ही पहिली चकमक होती ज्यात त्यांनी पोलिसांशी समोरासमोर लढाई केली होती.

लोक म्हणतात की माओवाद्यांना भूसुरुंगांवरून बंदुकांपर्यंत आणण्यात हिडमाची मोठी भूमिका होती.

एक माजी महिला माओवादी सांगते, "संघटनेचे नेतेही हिडमाची आक्रमकता पाहून आश्चर्यचकित झाले. नंतरही त्याने अशीच आक्रमकता दाखवली. यामुळेच त्याला संघटनेत मोठी जबाबदारी दिली गेली."

2008-09 च्या सुमारास हिडमा तेव्हा नुकत्याच बनलेल्या पहिल्या बटालियनचा कमांडर झाला. ही बटालियन आजही बस्तरमध्ये सक्रिय आहे.

2011 साली हिडमा दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा सदस्य बनला. एप्रिल 2010 मध्ये ताडमेटलामध्ये झालेल्या एका घटनेत पोलिसांचे 76 जवान मारले गेले होते.

मार्च 2017 मध्ये सीआरपीएफच्या 12 जवानांच्या मृत्यू झाला होता. या दोन्ही हल्ल्यांमागे हिडमाचा हात होता, असं म्हणतात.

बंदुकीचा फार कमी वापर

माडवी हिडमाच्या बाबतीत एक गोष्ट म्हटली जाते ती म्हणजे तो चकमकीदरम्यान माओवाद्यांचं नेतृत्व करतो, पण स्वतः फार कमी वेळा बंदूक उचलतो.

2011 नंतर माओवादी संघटना सोडलेल्या एका माओवाद्याने सांगितलं की संघटनेतही हिडमाविषयी चर्चा व्हायची, "हिडमाच्या लढाईची पद्धत आक्रमक होती, त्याने अनेक लढायांमध्ये भागही घेतला पण तो स्वतः फार कमी वेळा बंदूक चालवतो. जो पर्यंत नाईलाज होत नाही तो पर्यंत हिडमा स्वतः बंदूक उचलत नाही. त्याची टीम खूप सक्रिय आहे. तो लढाईपासून दूर राहात नाहीत, आपल्या साथीदारांचं नेतृत्व करतो."

माओवादी म्हणून प्रवास

आणखी एक माजी माओवादी म्हणतो, "मला तर याच आश्चर्य वाटतं की इतक्या लढायांमध्ये भाग घेतल्यानंतरही त्यांना जरासं खरचटलंही नाही. मला माहिती नाही ती ते 2012 नंतर कधी जखमी झाले की नाही."

"याआधीही अनेक मोठ्या नक्षलवादी नेत्यांची नावं समोर आली आहेत. पण त्या सगळ्यांनी अनेकदा घाईघाईने पोलिसांवर हल्ला केला. त्यांच्या तुलनेत हिडमा प्रदीर्घ काळापासून सक्रिय आहे. माओवादी नेते घिसाडघाईने चुका करतात, त्यामुळे एकतर ते पोलिसांकडून मारले जातात किंवा आत्मसमर्पण करतात असं म्हटलं जातं. हिडमा वेगळा आहे," असं माजी माओवाद्याने बीबीसीला सांगितलं.

3 एप्रिलला झालेल्या चकमकीदरम्यान हिडमा तिथे उपस्थित होता याला अनेक पोलिसांनी दुजोरा दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की हिडमा व्यतिरिक्त सेंट्रल मिलिटरी कमिशन चीफ देव जी आणि तेलंगणा कमिटीचे सचिव हरिभूषणही तिथे आले होते.

स्थानिक पातळीवर चांगले संबंध

हिडमाला बस्तरचा हिरो मानलं जातं. तो एका स्थानिक आदिवासी समुदायाचा आहे. स्थानिक लोकांशी त्याचे चांगले संबध आहेत. तिथला युवावर्ग हिडमासाठी वेडा आहे.

दंडकारण्यात रिपोर्टिंग करणाऱ्या एका स्थानिक पत्रकाराने सांगितलं, "इथले लोक त्यांना देव समजतात. ते सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकतात आणि त्यावरून नोट्सही काढतात. ही त्यांची सवय आहे."

हिडमाला परदेशात प्रशिक्षण मिळालं आहे ही गोष्ट ते नाकारतात. ते म्हणतात, "जितकं मला माहिती आहे त्यावरून त्यांनी कोणतं मोठं शहरही पाहिलं नसेल. ते दंडकारण्य किंवा बस्तरहून पुढेही गेले नसतील. हिडमा यांनी मुख्य रस्त्यावर प्रवास केला असल्याचेही काही पुरावे नाहीत."

नुकतंच हिडमाच्या नावावर लाखो रूपयांचं बक्षीस घोषित केलं आहे. 'द हिंदू' या वृत्तपत्राने 2010 साली लिहिलं होतं की हिडमा माओवादी संघटनेची सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या केंद्रीय समितीचा सदस्य झाला आहे.

पण पोलिसांच्या एका गुप्त अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, हिडमा अजून केंद्रीय समितीचा सदस्य झालेला नाही.

माओवादी संघटनेची रचना

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) तीन शाखा आहेत. पहिली शाखा - पक्ष, दुसरी शाखा - सशस्त्र दल, तिसरी शाखा - जनता सरकार.

पक्ष - पक्षाचं काम संघटनात्मक विकास हे आहे. यात केंद्रीय समिती, राज्य समिती आणि झोनल समित्यांचा समावेश होतो. पक्षाच्या केंद्रीय समितीचा निर्णय अंतिम असतो. सशस्त्र दल आणि जनता सरकारही यांच्या अंतर्गत काम करतं.

सशस्त्र तुकड्या - यांचं काम पोलिसांशी लढणं असतं. सगळेच माओवादी बंदूक उचलत असले तरी या शाखेचे लोक मुख्यत्वेकरून लढाई करतात. यांना पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी असंही म्हटलं जातं.

हे दल बटालियन, विभागीय युद्ध गट आणि तुकड्यांमध्ये काम करतात. यांचं नेतृत्व कमांडर आणि पक्ष करतात.

जनता सरकार - याला क्रांतिकारी जनता समिती असंही म्हटलं जातं. यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांना 'स्वतंत्र भाग' असं म्हटलं जातं. या भागांमध्ये हे प्रतिसरकार म्हणून काम करतात आणि पूर्ण व्यवस्था पाहातात.

ही सरकारं या भागांमध्ये राहाणाऱ्या लोकांना किमान आरोग्यसेवा, काही प्रमाणात शिक्षण आणि शेतकी सल्ले देतात. विशेषतः आदिवासींना मलेरिया आणि डायरियासारख्या आजारांवर उपचार मिळवून देतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)