आरोग्य भरतीच्या सुधारित तारखा जाहीर, 'न्यासा'बाबतही आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबर रोजी नियोजित परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

आता रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा कधी होणार, याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सुधारित तारखांनुसार, आरोग्य विभागाच्या 'क' गटाची परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी, तर 'ड' गटाची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसंच, या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, असंही टोपे म्हणाले.

"डॅशबोर्डवर परीक्षा केंद्रांची आणि परीक्षा देणाऱ्यांची यादी असली पाहिजे असं कंपनीला सांगण्यात आलंय. एक ऑक्टोबरपर्यंत डॅशबोर्ड तयार करण्यात येईल," असंही टोपेंनी सांगितलं.

न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्र्यांची बैठक झाली. यात आरोग्यमंत्र्यांनी परीक्षेचं आयोजन करणाऱ्या संस्थेला पुढील आदेश दिले -

  • डॅशबोर्ड तयार केला पाहिजे, सर्व केंद्रांची यादी दिली पाहिजे
  • केंद्रनिहाय परीक्षार्थींची यादी दिली पाहिजे
  • एक ऑक्टोबरला वेळापत्रक जारी करावा
  • नऊ दिवस आधी सर्व परीक्षार्थींना हॉल तिकीट मिळाली पाहिजेत

'न्यासा' संस्थेबाबत आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

परीक्षा एजन्सी असलेली 'न्यासा संस्था'बाबतही राजेश टोपेंनी माहिती दिली. ते म्हणाले, "न्यासा संस्था आरोग्य विभागाने निवडली नव्हती. परीक्षा एजन्सीची निवड माहिती आणि तंत्रज्ञान विभाग करतो. आरोग्य विभागाने पेपर सेट करून दिलाय. एवढीच जबाबदारी आरोग्य विभागाची असते."

प्रकरण काय?

आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा वेळेवर रद्द करण्यात आली.

विशेष म्हणजे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधीच्या अफवांना बळी पडू नये, भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे, असं ट्वीट केल्याच्या काही तासानंतर ही नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द झाल्याचे मेसेज परीक्षार्थींना 24 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मिळाले आहेत.

आरोग्य भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन तारखा घोषित केल्या जातील, असं या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

परीक्षा वेळेवर रद्द झाल्यामुळे परीक्षेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालं आहे. काही जणांना प्रवासादरम्यान ही माहिती मिळाली, तर काही जण आधीच परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत.

परीक्षा रद्द झाल्याचं समजताच अनेकांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)