You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दत्तक नियम : भारतात मूल दत्तक घेण्यासाठीची प्रक्रिया काय आहे?
साताऱ्यात अल्पवयीन बलात्कार पीडितेनं एका बाळाला जन्म दिल्याचं समोर आलं आहे. गंभीर बाब म्हणजे या बाळाला बेकायदेशीररित्या दत्तक दिल्याचंही समोर आलं आहे.
बाळाला बेकायदेशीररित्या दत्तक दिल्या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांवर कारवाई केल्याचं समोर आलं आहे. या दत्तक प्रकरणात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता परस्पर मूल दत्तक दिल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणामुळं, मुलं दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत पैशांची देवाण-घेवाण होते का? नियम धाब्यावर बसवून मुलांचा व्यवहार करण्यात आला का? असे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.
मात्र, प्रत्यक्ष एखाद्याला मूल दत्तक घ्यायचं असेल तर त्यासाठीचे सर्वसाधारण नियम काय असतात? त्यासाठी कोण पात्र असतं? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? असे प्रश्न उपस्थित होतात.
साधारणपणे एखाद्या संस्थेमधून मूल दत्तक घेण्यासाठी संबंधित दाम्पत्याला अनेक कायदेशीर प्रक्रियांमधून जावं लागतं.
केंद्र सरकारनं यासाठी सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी (केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरण) ची स्थापना केली आहे. ही संस्था महिला आणि बाल कल्याण मंत्रालयांतर्गत काम करते.
सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीला CARA नावानंही ओळखलं जातं. ही संस्था नोडल बॉडीप्रमाणं काम करते. CARA प्रामुख्यानं अनाथ, सोडून दिलेल्या किंवा शरण आलेल्या मुलांच्या दत्तक ग्रहण प्रक्रियेसंदर्भात काम करते.
2015 मध्ये मुलं दत्तक घेण्याच्या प्रक्रियेच्या नियमांमध्ये संशोधन करण्यात आलं.
मुलं दत्तक घेण्याची एक प्रदीर्घ अशी कायदेशीर प्रक्रिया नक्कीच आहे. मात्र त्यात कुठंही पैशाच्या व्यवहाराचा उल्लेख नाही. नियमांचा विचार करता, दत्तक घेणाऱ्या आई-वडिलांना बाळाच्या नावावर एखादा बाँड घ्यायला किंवा गुंतवणूक करायलाही सांगता येत नाही.
आई-वडिलांना या पात्रता पूर्ण कराव्या लागतात :
- संभाव्य आई-वडील शारीरिक, मानसिक आणि भावनिक तसंच आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम असणं गरजेचं असतं. अशा संभाव्य पालकांना जीवघेणा आजार नसावा, हेही महत्त्वाचं आहे.
- स्वतःची जैविक संतती असलेल्या किंवा नसलेल्या अशा कुणालाही मूल दत्तक घेता येतं, मात्र त्यासाठी...
- संभाव्य पालक विवाहित असेल तर दोघांचं म्हणजे दाम्पत्याचं एकमत असणं गरजेचं आहे.
- सिंगल किंवा एकटी राहणारी महिला कोणत्याही लिंगाचं मूल म्हणजे मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते.
- तर सिंगल पुरुष केवळ मुलालाच दत्तक घेऊ शकतो.
- संभाव्य आई वडील यांच्या लग्नाला दोन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल तरच ते मूल दत्तक घेऊ शकतात.
- मूल दत्तक घेण्यासाठी आई-वडिलांचं वय हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यानुसार कमी वयाचं मूल दत्तक घेण्यासाठी आई वडिलांचं सरासरी वयदेखील कमी असायला हवं.
- संभाव्य आई वडील आणि दत्तक दिलं जाणारं मूल यांच्यातील वयामधील अंतर किमान 25 वर्षे असायला हवं.
- मात्र दत्तक घेणारे हे नातेवाईक किंवा सावत्र नात्यातील असतील, तर हा नियम लागू होत नाही.
- ज्यांना आधीच तीन किंवा त्यापेक्षा अधिक मुलं असतील, ते मूल दत्तक घेण्यास पात्र नसतात. मात्र विशेष परिस्थितीमध्ये तेही मूल दत्तक घेऊ शकतात.
सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या मते, कोणत्याही दत्तक प्रक्रियेसाठी सर्वात आधी महत्त्वाची 10 कागदपत्रं आवश्यक असतात. त्याशिवाय ही प्रक्रिया सुरूदेखील होत नाही.
महत्त्वाची कागदपत्रं
- मूल दत्तक घेण्याची इच्छा असलेल्या कुटुंबाचे किंवा संबंधित दाम्पत्य अथवा व्यक्तीचे छायाचित्र.
- ज्याला मूल दत्तक घ्यायचे आहे, त्याचे पॅन कार्ड.
- जन्म-प्रमाणपत्र किंवा जन्म तारखेचा पुरावा असलेली कागदपत्रं.
- रहिवाशी प्रमाणपत्र (आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र / पासपोर्ट/ वीजेचं बिल/ टेलिफोन बिल)
- संबंधित वर्षाची प्राप्तीकर भरल्याची प्रत
- ज्यांना मूल दत्तक घ्यायचं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार नाही, याबाबतचं डॉक्टर अथवा पात्र अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र. दाम्पत्य असल्यास दोघांची स्वतंत्र प्रमाणपत्रं जमा करावी लागतील.
- विवाह प्रमाणपत्र ( विवाहित असल्यास)
- घटस्फोटित असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- दत्तक घेण्याची इच्छा असलेल्यांशी संबंधित दोन जणांचे जबाब.
- इच्छुक व्यक्तीची आधीची संतती असेल आणि त्यांचं वय पाच वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्यांची सहमती.
ही कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतरच प्रक्रिया पुढं सरकते. मूल दत्तक घेण्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो.
ऑगस्ट 2015 मध्ये दत्तक प्रक्रियेत आणि नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आणि ही प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या सर्व पात्रता सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी आवश्यक असतात. पण दत्तक घेण्याची प्रक्रिया विविध श्रेणींमध्ये विभागलेली आहे. म्हणजे एनआरआय (अनिवासी भारतीय), इंटर-स्टेट (इतर देशांतील), सावत्र आई-वडील किंवा नातेवाईक या सर्वांसाठी वेगवेगळे नियम आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)