You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC Impact : बीबीसी मराठीच्या बातमीनंतर बच्चू कडूंनी ज्योती देशमुखांचं गाव घेतलं दत्तक
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
बीबीसी मराठीनं अकोला जिल्ह्यातल्या कट्यार गावातील शेतकरी ज्योती देशमुख यांची बातमी प्रसिद्ध केली होती.
शेतकरी सासरा, पती आणि दिराच्या आत्महत्येनंतर ज्योतीताई गेल्या 12 वर्षांपासून स्वत: 29 एकर शेती करत आहेत. त्यांचा हा संघर्षमय प्रवास बीबीसी मराठीनं दाखवला होता.
इथं तुम्ही ही बातमी पाहू शकता -
या बातमीनंतर अनेकांनी ज्योती देशमुख यांना फोन करून शुभेच्छा दिल्या, तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेटी दिल्या.
अशातच आता महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ज्योती देशमुख यांचं गाव शेतीसाठी दत्तक घेण्याचं जाहीर केलं आहे.
बच्चू कडू यांनी शुक्रवारी (4 सप्टेंबर) ज्योती देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी त्यांनी म्हटलं, "घरचा कर्ता माणूस आत्महत्या करत आहे. पण, माय-माऊली कसा संसार उभा करते त्याचं एक उदाहरण म्हणजे ज्योतीताई. मी ट्रॅक्टर चालवताना त्यांना पाहिलं तेव्हा आमच्यात काही कमी आहे की काय, असं आम्हाला भासायला लागलं. आत्महत्या हा मार्ग असू शकत नाही. त्याला लाथ मारून जगलं पाहिजे, हे ज्योती ताईंनी आम्हाला शिकवलं आहे."
ते पुढे म्हणाले, "कट्यार गाव आम्ही शेतीसाठी दत्तक घेऊ. वर्षभरात शेती कशी विकसित करता येईल, सगळं लक्ष, सगळा पैसा आपण शेतीवर खर्च करू. एक उदाहरण म्हणून चांगलं गाव कसं निर्माण होईल, हा प्रयत्न करू. ज्योती ताईंचं हे या योगदान लक्षात घेऊन त्यांच्याच नावानं एक योजना तयार करू. दोन-तीन महिन्यातून एकदा आम्ही भेटी घेऊ आणि शेती उभारण्याचं काम निश्चितपणे करू."
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांचे फोन येत असल्याचं ज्योती ताईंनी आम्हाला सांगितलं.
त्या म्हणाल्या, "मला वाटलं नव्हतं की माझा व्हीडिओ इतका व्हायरल होईल म्हणून. यासाठी मी बीबीसी न्यूजला धन्यवाद देते. बीबीसीच्या बातमीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा सत्कार केला आणि समस्या जाणून घेतल्या. शुक्रवारी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू आले होते. गावातल्या शेतांकडे लक्ष देऊ अशी त्यांनी माहिती दिली."
गुरुवारी (3 सप्टेंबर) अकोला जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्योती ताईंची घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं.
ज्योती देशमुख यांचा प्रवास
ज्योती देशमुख यांच्या शेतकरी सासऱ्यानं 2001मध्ये, शेतकरी दिरानं 2004मध्ये तर शेतकरी पतीनं 2007मध्ये आत्महत्या केली.
याविषयी त्यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या घरात तीन आत्महत्या झाल्या. 2007मध्ये सगळ्या शेतीत मूग पेरला होता. पण, त्यावेळी खूप पाऊस झाला आणि मूग सडून गेला. त्यामुळे मग माझ्या पतीला टेंशन आलं आणि त्यांनी आत्महत्या केली."
ज्योती देशमुख यांना शेतातील कामाचा काहीएक अनुभव नव्हता. पतीच्या आत्महत्येनंतर अनेकांनी त्यांना जमीन विकण्याचा सल्ला दिला.
याविषयी त्या सांगतात, "लोकांचं म्हणणं होतं की, बाईनं कुठे शेती करायची असते का, देशमुखांच्या घरातल्या बाईनं शेती करणं शोभतं का, शेती विकून अकोल्याला राहायला जा. पण, माझा लहान मुलगा मला म्हणाला की, आई आता शेती विकली की परत घेता येणार नाही. म्हणून मग मी शेती करायचा निर्णय घेतला."
यानंतर ज्योतीताईंनी स्वत: शेतीतली कामं शिकायला सुरुवात केली. मूगाऐवजी सोयाबीन पेरायला सुरुवात केली. एकदा त्यांना सोयाबीनचं खूप उत्पन्न झालं, ते बघून मग गावातल्या सगळ्यांनीच सोयाबीन पेरायला सुरुवात केल्याचं त्या सांगतात.
गेली 12 वर्षं त्या 29 एकर शेती स्वत: करत आहे. त्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर आणि शेतात बोअरवेल घेतला आहे. शेतीवरच त्यांनी मुलाला इंजीनियर बनवलं आहे, सध्या त्यांचा मुलगा पुण्यात नोकरी करत आहे.
शेतीनं माझ्या मनातली भीती दूर केली. आधी मी सगळ्यांना घाबरायचे, पण आता मी रात्री एकटी शेतात जाऊन कामं करू शकते, असं त्या सांगतात.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता शेतीत कष्ट करून जीवन जगण्याचा सल्ला त्या देतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)