कोरोना महाराष्ट्र : लॉकडाऊनमध्ये सोलापूरच्या शेतकऱ्यानं दाखवून दिलं... अशी विकायची द्राक्षं

    • Author, गणेश पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या वर्षी देशात लॉकडाऊन झाल्यापासून वाहतूक बंद झाली. उद्योग बंद झाले होते. जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद झाल्या. यामध्ये सगळ्यांत जास्त भरडले गेले ते शेतकरी आणि कामगार.

लॉकडाऊनचा समाजातल्या सगळ्याच घटकांवर गंभीर परिणाम झाला होता. यात नोकरदारांपेक्षा शेतकऱ्यांची परिस्थिती फार वेगळी आहे. नोकरी करणाऱ्यांचा पगार कमी झाला, म्हणजे खिशात येणारा पैसा कमी झालाय. पण शेतीमाल विकला न गेल्याने अनेक शेतकऱ्यांचा पदरचा पैसा गेला आहे.

कुणी स्वत:चं भांडवल शेतात गुंतवलं होतं, तर काहींनी कर्ज काढून शेती केलेली असते. शेतातला हाताशी आलेला भाजीपाला, फळं तेव्हा जागच्या जागी सडत होती.

नाशिकच्या द्राक्षं पिकवणाऱ्या एका शेतकऱ्याला गेल्या एप्रिल महिन्यात बीबीसीशी बोलताना रडू आवरलं नाही. लॉकडाऊन झाल्याने हताश झालेल्या नारायण जाधव यांनी आपली दोन एकर द्राक्षांची बाग कुऱ्हाडीने तोडली. "माझी बाग 6-7 वर्षांची आहे. पण लॉकडाऊनमुळे माझ्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळाल्या," असं म्हणत ते ढसाढसा रडले होते.

पण एकीकडे असं चित्रं असलं तरी दुसरीकडे काही शेतकरी मात्र स्वत: समोर येत वेगळा मार्ग शोधू पाहत आहेत, त्यात काही यशस्वीसुद्धा होत आहेत.

त्यापैकीच एक आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याच्या देवळाली गावात शेती करणारे सुनील ढेरे. लॉकडाऊनच्या काळातही म्हणजे 23 मार्चपासून त्यांनी 15 टन द्राक्ष विकून 6 लाख रुपयांपेक्षाही जास्तीची कमाई केली आहे.

दारोदारी जाऊन विकली द्राक्ष

"आमचं 14 जणांचं एकत्र कुटुंब आहे. द्राक्षांचा सीझन चालू झाल्यापासून आम्ही दररोज पहाटे चार वाजता उठतोय. सगळेजण सकाळी 7 वाजेपर्यंत ताजा माल तोडतो. मग करमाळ्यात दुपारपर्यंत दारोदारी जाऊन ग्राहकांना आणि फळविक्रेत्यांना विकतो. ताजी आणि गोड द्राक्ष घरपोच मिळत असल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे," सुनिल ढेरे बीबीसीला सांगत होते.

ढेरे यांच्याकडे मारुती व्हॅन आहे. एकावेळी ते 20 कॅरट द्राक्ष नेतात. करमाळा शहरापासून त्यांचं देवळाली गाव दोन किलोमीटर दूर आहे, त्यामुळे दिवसातून तीन फेऱ्या होतात.

पाच किलोचे पॅकेट करून 50 रुपये किलो दराने ग्राहकांच्या दारावर जाऊन विकतात. तर शहरातल्या स्टॉलवर विकणाऱ्या फळविक्रेत्यांना 40 रुपये दराने द्राक्ष विकतात. यामध्ये दलाल किंवा व्यापाऱ्याची मध्यस्ती नाहीये, त्यामुळे त्यांना सरसकट नफा मिळत गेला.

तसंच अनेक द्राक्ष पिकवणऱ्या शेतकऱ्यांनी यंदा बेदाणा केला. त्यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने नेहमीपेक्षा चांगला भाव मिळाला. अशा प्रकारे ढेरे यांनी महिनाभरात जवळजवळ 15 टन द्राक्ष विकली आहेत.

ढेरे कुटुंबियांनी सव्वा तीन एकरात द्राक्ष लावली आहेत. तीन टप्प्यात ही द्राक्ष विकण्यात आली. लॉकडाऊनच्या आधी पहिल्या टप्प्यात 17 टन, दुसऱ्या टप्प्यात टप्प्यात 21 टन द्राक्ष विकली. तर लॉकडाऊननंतर तिसऱ्या टप्प्यातली म्हणजे 15 टन द्राक्ष विकली.

गेल्यावर्षीच्या दुष्काळात द्राक्षबाग वाचवण्यासाठी पाण्याचा टँकर विकत घेतला, असंही ढेरे आवर्जून सांगतात.

'शिक्षणाचा शेतीत फायदा झाला'

लॉकडाऊननंतर भाजीपाला आणि फळे खरेदी करण्यासाठी बाहेर कुणी पडताना दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या घरोघरी जाऊन शेतमाल विकण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. ढेरे यांनी त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला.

"मी व्हॉट्सअपवरून द्राक्षांची जाहिरात करायचं ठरवलं. आमच्याकडे द्राक्ष घरपोच मिळतील, असं टेम्प्लेट तयार केलं, त्यावर फोन नंबर दिला. नेहमीच्या ग्राहकांना पाठवले. मग त्यांचे फोन येऊ लागले," असं ढेरे सांगतात.

शेतकऱ्यांनी आधी शेतमालाच्या मार्केटिंगचा अभ्यास करावा, असं ढेरे यांना वाटतं. त्यांच्या मते, "काळ आणि वेळेप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीत आणि शेतमालाच्या मार्केटिंगमध्ये बदल करायला पाहिजेत सोशल मीडियाचा आणि इंटरनेटचा शेतीमध्ये कसा वापर करता येईल हे ध्यानात घ्यावं.

"शिक्षणाचा मला शेतीत खूप फायदा झाला आहे, असं मला वाटतं. लॉकडाऊन झाल्यावर खचलो नाही. दुसऱ्याच दिवशी करमाळ्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना भेटलो. 'साहेब, शेतात लाखोंचा माल पडला आहे. तुम्ही मदत केली तर त्याचं सोनं होईल, अशी साहेबांना विनंती केली. त्यांनीही लगेच शेतीमाल वाहतुकीसाठी परवाना दिला. शेतमालाच्या वाहतुकीसाठी मारुती गाडीचा वापर करत आहे, असं पत्रकही गाडीच्या काचेवर लावलं," असं ढेरे सांगतात.

याबाबत बीबीसीने करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या संपर्क साधला. ते म्हणाले, "लॉकडाऊन झाल्यावर संबंधित शेतकरी माझ्याकडे आले होते. शेतमाल हा अत्याश्यक सेवेत येत आहे. त्यामुळे तुम्ही तसं पत्रक गाडीवर लावा. तुमच्यासोबत दोन पेक्षा अधिक कामगार नेऊ नका. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करा, असं मी त्यांना सांगितलं."

हे करताना कोरोनाची भीती वाटली नाही का, असं विचारल्यावर ढेरे म्हणाले, "मी घराबाहेर पडताना सॅनिटायझरची बाटली कायम गाडीत ठेवली. मास्क घातले. हात सतत धुतले. माल विकताना सोशल डिस्टन्सिंग पाळलं. हे सगळं ग्राहकांनाही दिसत होतं. त्यामुळे त्यांचा माझ्याकडून द्राक्ष खरेदीवरचा विश्वास वाढला.

'लॉकडाऊननंतर शेतीमाल मार्केटिंगमध्ये हे बदल होतील'

"लॉकडाऊनंतर शेतीमाल मार्केटिंगमध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. कमिशन एजंट किंवा व्यापारी यांना बाजुला ठेऊन थेट शेतकरी ते ग्राहक हे मॉडेल उभारू लागलं आहे. भविष्यातही या मॉडेल्सचा आवाका वाढवणार आहे," असं राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"लॉकडाऊनंतर शेतमालाची थेट विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृषी विभागामार्फत आम्ही तालुका आणि जिल्हा पातळीवर कंट्रोल रूम सुरू केल्या. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना संपर्क साधला. त्यांना थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या. आता दरदिवशी राज्यभरात 20 हजार क्विंटल शेतमालाची थेट विक्री होतेय. यात 60 प्रकारच्या कृषीमालाचा समावेश आहे."

याआधी गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्हायची. पण सध्या याचा आवाका वाढला आहे. नगर परिषद आणि महानगरपालिकेतील वार्ड शेतकऱ्यांना विभागून दिले आहेत. ऑनलाईन बुकिंगचा वापर केला जात आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये सुमारे 2800 थेट विक्रीची ठिकाणं निश्चित केली आहेत. तर 3 हजार शेतकरी उत्पादक गट सहभागी केले असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.

"कोणतंही संकट हे आपल्याला एखादा धडा देतं. त्याप्रमाणे लॉकडाऊनच्या संकटातून आम्ही काही गोष्टी शिकतोय. शेतमालाची इतक्या मोठ्या प्रमाणात थेट विक्री होईल असा विचार याआधी झालेला नव्हता. त्याचे फायदे दिसून येत आहेत. आता आम्ही याचा आवाका वाढवणार आहोत. त्यासोबत यात सातत्य, नियमित पुरवठा, सुरळीत वाहतूक, शेतमालाची पॅकेजिंग, क्वालिटी आणि त्याची योग्य प्रकारे साठवण ( storage) याकडे जास्त महत्त्व देणार आहोत. यासाठी महाराष्ट्र सरकारने State of Maharashtra's Agri-business and Rural Transformation Program (SMART) हा प्रकल्प हाती घेतला आहे," असंही दिवसे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)