You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनू सूदवर इन्कम टॅक्स विभागाची कारवाई?
अभिनेता सोनू सूद यांच्याशी संबंधित जागांवर आणि इतर काही ठिकाणांवर बुधवारी (15 सप्टेंबर) प्राप्तीकर विभागाचे अधिकारी पोहोचल्याचं, पीटीआयनं अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
अधिकारी मुंबईबरोबरच लखनऊसह किमान सहा ठिकाणी पोहोचल्याचं पीटीआयच्या सूत्रांचं म्हणणं आहे.
या वृत्तानंतर सोनू सूद हे नाव सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागलं.
मात्र सोनू सूदच्या घरीदेखील कारवाई करण्यात आली का, याबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही.
प्राप्तीकर विभाग एका रियल इस्टेट व्यवहाराची चौकशी करत असल्याचं अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये शहर सोडून गावी परतणाऱ्यांना मदत केल्यानंतर सोनू सूद चर्चेत आले होते. त्यानंतर माध्यमांत त्यांची प्रचंड चर्चा झाली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील सरकारनं नुकतीच सोनू सूद हे आम आदमी पार्टी सरकारच्या 'देश के मेंटॉर्स' कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर असतील, अशी घोषणा केली होती.
सोनू सूदच्या घरी प्राप्तीकर विभागाचे अधिकारी पोहोचल्याच्या वृत्तानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत सोनू सूदला पाठिंबा दर्शवला.
'सत्याचा विजय होतो.' असं केजरीवाल यांनी म्हटलंय.
अरविंद केजरीवाल यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. ते म्हणाले, "सत्याच्या मार्गावर लाखो संकटं येतात पण अखेर विजय सत्याचाच होतो. सोनू सूद यांच्यामागे लाखो भारतीयांचा आशीर्वाद आहे ज्यांना कठीण काळात त्यांनी मदत केली."
आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हीडिओ पोस्ट केला असून प्राप्तीकर विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
"सोनू सूद हे केवळ बॉलिवूडचे अभिनेते नसून एक सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेची मदत करणारं असं त्यांचं व्यक्तीमत्वं आहे. त्यांनी कोव्हिडच्या काळात लोकांपर्यंत राशन पोहोचवलं. लोकांची मदत केली. भाजपचं सरकार त्यांना घाबरवण्यासाठी प्राप्तीकर विभाग धाड टाकतं आणि त्याला सर्व्हे म्हटलं जातं, ही अतिश्य दुःखद बाबत आहे," असं आतिशी म्हणाल्या.
सोनूचे 'फिल्मी' करिअर
सोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली 'कल्लाझागर' या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
सोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई प्राध्यापिका होती. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर सोनूने मॉडेलिंग आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबई गाठली.
मुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळी नोकरी करून सोनू सिनेमात संधी मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण पहिली संधी सोनूला एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ सिनेमात एक भूमिका केली.
त्यानंतर त्याने तामिळ, तेलगू, कन्नड या सिनेमांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. त्यासाठी या भाषा त्याला शिकाव्या लागल्या. 2002 साली 'शहिद-ए-आझम' या हिंदी सिनेमातून सोनूने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर युवा,आशिक बनाया आपने, शूट आऊट अॅट वडाला, जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू ईयर, पलटन, आर राजकुमार अशा काही हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.
चिनी सिनेमात काम
सोनू सूदने चिनी भाषेतल्या सिनेमातही काम केलं आहे. 2017 मध्ये 'कुंग फू योगा' या सिनेमात सोनूने अभिनय केला आहे. यासाठी जॅकी चॅनच्या मुलासोबत त्याने चीनमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. या सिनेमासाठी सोनूसोबत जॅकी चॅन यांनी भारतातही प्रमोशन केलं होतं.
1996 मध्ये सोनूने त्याची मैत्रीण सोनालीशी लग्न केलं. नागपूरमध्ये शिकत असताना सोनू आणि सोनालीची भेट झाली. त्यांना इशांत आणि अयान अशी दोन मुलं आहेत.
राजकीय वाद
प्रतिकूल परिस्थितीमध्येही शेकडो मजुरांना घरी पोहचवल्यामुळे सोनू सूदच्या मदतकार्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करण्यात येत होता.
सोनू सूद निवडणुकीत भाजपचा स्टार प्रचारक म्हणून दिसेल असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.
'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी सोनूच्या मदतकार्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. तो जे काम करतोय, ते चांगलंच आहे. पण त्यामागे कोणी 'राजकीय दिग्दर्शक' असण्याचीही शक्यता असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत यांनी सोनू सूदच्या कामाविषयी घेतलेल्या आक्षेपांबद्दल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पलटवार केला होता. मोठ्या मनानं त्याचं कौतुक करण्यापेक्षा शिवसेना त्याच्यावर टीका करत आहे. स्थलांतरित मजुरांच्या मद्द्यावर आपलं अपयश लपवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज नाही, अशी टीका निरूपम यांनी ट्विटवरून केली होती.
'सामना'तून झालेल्या टीकेनंतर सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
कोब्रा पोस्टच्या स्टिंगमध्ये सोनू सूदचं नाव
2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी कोब्रा पोस्टनं काही सेलेब्रिटींना 'एक्स्पोज्ड' केल्याचा दावा केला होता. त्यात सोनू सूदही होता. त्यावेळी सोनू सूद मोदी सरकारच्या 'HumFitTohIndiaFit' या अभियानाचा सदिच्छादूतही होता.
त्यावेळी सोनू सूदनं त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवरून भाजपचा फायदा होईल, असा मजकूर टाकण्याची तयारी दर्शवली होती, असं कोब्रा पोस्टच्या त्या वृत्तात म्हटलं होतं.त्यावेळी सोनू सूदने एक स्पष्टीकरण दिलं होतं की "अशा प्रकारच्या ऑफर वेगवेगळ्या ब्रँड्सकडून आम्हाला येतच असतात. आणि जे दाखवण्यात आलं आहे, ते एडिटिंगमध्ये काटछाट करून चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)