तालिबान-अफगाणिस्तान: आम्ही जेव्हा विमानतळावर गेलो तेव्हा तालिबानचे लोक चाबकाने मारत होते

- Author, नेहा शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तानातून अनेक लोकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू आहे तरीही काही लोक अद्यापही तिथे अडकले आहेत. अशात एक महिलेने त्यांचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला.
लतिफा (नाव बदलले आहे). यांचं एअर इंडियाचं 19 ऑगस्टला काबूलहून दिल्लीला विमान होतं. मात्र गोष्टी इतक्या वेगाने बदलतील असं त्यांना वाटलं नव्हतं. तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यावर सर्व विमानं रद्द करण्यात आली. त्यात लतिफा यांचं तिकीट असलेल्या एअर इंडिया च्या विमानाचा समावेश होता.
जेव्हा मी तिच्याशी 21 ऑगस्टला बोलले लतिफा काबूल विमानतळाबाहेर एका मिनी बस मध्ये बसल्या होत्या. तब्बल 20 तास त्यांना काहीही खायला प्यायला मिळालं नाही, स्वच्छतागृहसुद्धा मिळालं नाही.
लष्कराचं एक विमान मिळावं आणि भारतात परतता यावं यासाठी हा सगळा खटाटोप त्या करत होत्या.
लतिफा (नाव बदललेलं) भारतीय आहेत. त्यांचं एका अफगाण व्यक्तीशी लग्न झालं आहे. त्या भारत अफगाणिस्तान प्रवास करत असतात. त्यांचं कुटुंब भारत आणि अफगाणिस्तानात असतं.
15 ऑगस्ट
15 ऑगस्टला सकाळी जेव्हा लतिका झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की अफगाणातले बहुतांश दुतावास बंद झाले आहेत आणि तिथले कर्मचारी मिळेल त्या विमानाने परत जात आहेत. लतिफा भारतीय असल्याने त्यांनी लवकरात लवकर भारतात यावं असं त्यांच्या नवऱ्याला वाटत होतं.
भारतीय असल्याने त्यांच्या जीवाला मोठा धोका होता. लतिफा यांनी त्यांचा निळा बुरखा घेतला आणि त्यांचा नवरा आणि त्या विमानाची चौकशी करायला दुतावासात गेल्या. त्यांच्या सासरचे आणि नवऱ्यासाठी व्हिसा मिळतोय की याची चाचपणी केली .
"जेव्हा आम्ही भारतीय दुतावासात गेलो तेव्हा सुदैवाने ती सुरू आहे. पण वातावरणात तणाव होता हे मात्र नक्की. ते सगळे लोक कागदपत्र जाळत होते. तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ते संध्याकाळपर्यंत काम करतील. मला माझ्या कुटुंबासाठी व्हिसा हवा होता. त्यांनी मला माझ्या कुटुंबियांबरोबर संध्याकाळी परत यायला सांगितलं तसंच पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं आणायला सांगितलं. म्हणून मी घरी गेले." लतिफा सांगत होत्या.

फोटो स्रोत, BBC/LATIFA
परत येताना त्यांनी हा सगळा गोंधळ पाहिला.
"लोक तालिबानच्या भीतीने सैरावैरा पळत होते. माझ्या नवऱ्याने माझा हात पकडला आणि आम्ही घराकडे निघालो. संपूर्ण काबूल शहर रस्त्यावर होतं. ते प्रचंड भयावह होतं. जेव्हा मी घरी आली तेव्हा आमच्या सुरक्षारक्षकांनी गणवेश बदलून कुर्ता पायजमा घातला. माझ्या इमारतीला तालिबानने वेढा घातला."
लतिफा आणि तिचा नवऱ्याने पासपोर्ट घेतला आणि पुन्हा दुतावासात गेले. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना व्हिसा मिळाला.
त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून येणाऱ्या फोनची वाट पाहण्यात त्यांचा वेळ गेला. लतिफा यांचा देश भारत असल्यामुळे त्यांना तिथे जायचं होतं.
19 ऑगस्ट
"मला 19 ऑगस्टला परराष्ट्र मंत्रालयाकडून एक मेसेज आला. मला एका विशिष्ट जागी पोहोचण्यास सांगण्यात आलं.(सुरक्षिततेच्या कारणास्तव जागेचं नाव सांगितलेलं नाही.) आमच्यासारखं ज्या लोकांना जायचं होतं त्यांना तिथे जमायला सांगितलं होतं. मी माझं संपूर्ण कुटुंब सोडून येत होते आणि ते तितकंसं सोपं नव्हतं. मात्र माझ्या कुटुंबाला माझी चिंता होती त्यामुळे मला विचार करायला अजिबात वेळ नव्हता. आम्हाला फक्त एक छोटी हँडबॅग आणायची परवानगी होती. म्हणून मी माझा लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह, फोन, आणि पॉवर बँक घेतली आणि आम्ही तिथून निघालो." लतिफा सांगत होत्या.
लतिफा यांच्याशिवाय 220 असे लोक होते जे एका सुरक्षित घरात वाट पाहत होते. त्यात हिंदू, शीख, आणि काही अफगाण नागरिकांचाही समावेश होता.

फोटो स्रोत, LATIFA/BBC
" तिथे काहीही सोयीसुविधा नव्हत्या. आम्हाला कसं सुरक्षितपणे नेणार याची आम्हाला काहीही माहिती नव्हती. आम्हाला तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात आली नाही. इतकंच काय, कोणतीही आमच्यावर हल्ला करू नये म्हणून तालिबानीच आमची रक्षण करत होते. आम्ही अतिशय अस्वस्थ झालो होतो. आम्हाला खूप भीती वाटत होती," त्या सांगत होत्या.
20 ऑगस्ट
20 ऑगस्टला रात्री 10 वाजता बचाव मोहिमेची नोटीस आली. 10 ते 11.30 या वेळात सात मिनी बसेस मध्ये 150 प्रवासी विमानतळाकडे निघाले.
"आम्हाला तालिबान्यांनी संरक्षण दिलं होतं.एक कार आमच्या समोर होती, तर एक आमच्या मागे. आम्ही रात्री 12.30 वाजता काबूल विमानतळावर पोहोचलो. आपल्या देशात पळून जाण्यासाठी अनेक लोक विमानाची वाट पाहत उभे होते. एका बाजूला गर्दीला आवर घालण्यासाठी तालिबानचे लोक गोळीबार करत होती तर एका बाजुला अमेरिकेचे सैनिक अश्रुधुराचा मारा करत होते. आम्हाला उत्तरेकडील गेटवर नेण्यात आलं. या गेटचा लष्कराचे लोक करतात."
हा गट विमानतळाकडे गेला तरी त्यांचे भोग संपले नव्हते. अमेरिकेकडे या विमानतळाचा ताबा आहे. त्यांनी लोकांना विमानतळावर येऊ दिलं नाही. 20-21 ची रात्र त्यांनी बसमध्ये बसूनच घालवली. भारतात जाण्याची अजूनही काही चिन्हं दिसत नव्हती.

फोटो स्रोत, BBC/LATIFA
"आमच्याबरोबर आजारी बायका आणि लहान मुलं होती. आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो होतो. काही बायकांची पाळी सुरू होती. पण तिथे स्वच्छतागृहांची सोय नव्हती. आम्ही एका उघड्या जागेवर बसलो होतो. आमच्यावर कुणीही हल्ला करू शकत होतं," लतिफा सांगत होत्या.
21 ऑगस्ट
ती रात्र लतिफा आणि इतर प्रवाशांसाठी अतिशय कठीण होती. पण सकाळ त्याहीपेक्षा भयानक होती.
" सकाळी साडेनऊला तालिबानी लोक आमच्या बसजवळ आले आणि आमच्या समन्वयकाला प्रश्न विचारू लागले. त्यांनी त्याचा फोन हिसकावला आणि त्याच्या थोबाडीत मारली. ते काय चाललं होतं आम्हाला कळत नव्हतं."
आता त्या सातही बसेसच्या लोकांना तालिबानचे लोक एका अज्ञातस्थळी घेऊन जात होते.
"आम्हाला एका औद्योगिक वसाहतीत घेऊन गेले. तिथे आम्हाला कैदेत ठेवण्यात आलं. ते तरुण तालिबानी लोक होते. काही मुलं तर अगदी 17-18 वर्षांची होती. आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटत होती. असं वाटत होतं की सगळं संपलं. ते काही तास माझ्या आयुष्यातले सगळ्यात कठीण तास होते. आम्हाला वाटलं आम्ही कधीच आमच्या कुटुंबियांना भेटू शकणार नाही, कधीच घरी जाऊ शकणार नाही."
नंतर एका बागेत माणसं आणि बायकांना वेगळं बसवलं. तालिबानी लोकांनी त्यांचा पासपोर्ट घेतला आणि त्यांना प्रश्न विचारू लागले. ज्या भारतीय बायकांनी अफगाण पुरुषाशी विवाह केला होता त्यांना इतर भारतीयांपासून वेगळं बसवण्यात आलं होतं.
"मी म्हणाले की मी भारतीय आहे त्यामुळे मला भारतीय लोकांबरोबर रहायचं आहे. त्यावर ते म्हणाले की तुला अफगाण लोकांबरोबर रहावं लागेल. आता ते माझ्या भारतीय बंधु भगिनींबरोबर काय करतात याची भीती वाटू लागली. त्यांना एखाद्या अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्याबरोबर काही बरं वाईट केलं तर?"
"एकाने मला विचारलं की मला हा देश सोडून भारतात का जावंसं वाटतंय? आम्ही हा देश उभारतोय त्याने मला विचारलं की मला अफगाणिस्तानात परत यायला आवडेल का? मी त्याला म्हणाले की नाही मला तुमची भीती वाटते. त्यांनी मला दिलासा दिला की घाबरण्याचं काहीही कारण नाही. मला अगदी प्यायला पाणीही दिलं तरीही त्या माणसाची डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत होत नव्हती.
नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या जीवाला धोका आहे आणि ते आमचं रक्षण करत आहेत. ज्या भारतीय गटापासून आम्ही वेगळे झालो होतो त्यातल्या एका महिलेने सांगितलं की तालिबानी लोकांनी त्यांची चांगली काळजी घेतली आणि त्यांना खायला प्यायला दिलं."
त्या दिवशी संध्याकाळी स्थानिक अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना तालिबानींनी सांगितलं की त्यांनी आम्हाला कैदैत ठेवलं कारण त्यांना काही शंका होत्या. त्यांना भारतीयांच्या सुरक्षेची काळजी होती. भारतीयांचं अपहरण केल्याचा दावा त्यांनी फेटाळला.
काही तासांनंतर लतिफाला ज्या भारतीय बायकांचं अफगाण पुरुषाबरोबर लग्न झालं आहे अशा गटाबरोबर बसवण्यात आलं आणि त्यात काही अफगाण नागरिकही होते. त्यात नंतर काही भारतीय नागरिकही मिसळले. 2 वाजता ते काबूल विमानतळाच्या उत्तर गेटवर आले आणि विमानतळावर जायला वाट पाहणं पुन्हा सुरू झालं.
"आम्हाला विमानतळावर जाता यावं यासाठी परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत होतं मात्र त्यांना यश येत नव्हतं. तालिबान्यांनी आम्हाला कसं ताब्यात घेतलं होते हे त्यांना माहिती असुनसुद्धा ते काही करत नव्हते हा पाहून मला प्रचंड राग आला. त्यांची काय चर्चा झाली देव जाणे पण आम्ही तिथे अडकल्यामुळे आम्ही प्रचंड अस्वस्थ झालो होतो."
"त्यांना जर खात्री नव्हती तर त्यांनी आम्हाला घराबाहेर येऊ देण्याची परवानगी द्यायची नव्हती. आम्ही आमच्या घरात लपलो असतो. इतका धोका पत्करून घराच्या बाहेर निघालो असतो. आता आम्ही अगदीच उघड्यावर आलो होतो."
5 वाजता- लतिफाला परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की त्यांना 15-20 मिनिटात विमानतळावर घेऊन जाणार आहे. पण तेही शक्य झालं नाही.
6 वाजता- परराष्ट्र मंत्रालयाकडून आणखी एक फोन आला आणि त्यांना सुरक्षितस्थळी जायला सांगितलं. हाही प्रयत्न व्यर्थ ठरला.
"आपल्या सरकारकडे काही अधिकार नाहीयेत का? ते आम्हाला विमानतळापर्यंत पोहोचवू शकत नाहीत? आमचं इथं अपहरण केलंय आम्हाला बाहेर काढा."
आता लतिफा अतिशय वैतागली होती. एक तर झोप नाही, त्यात धड जेवण नाही, अशा परिस्थितीत त्यांना एका सुरक्षितस्थळी पुन्हा नेण्यात आलं. अक्षरश: उघड्यावर दिवस काढल्यानंतर आता त्यांची अशी अवस्था झाली होती.
6.50 वाजता- आम्हाला प्रशासनाने सांगितलं की आम्हाला रात्री कधीतरी घेऊन जातील पण तेही नेतील की नाही देव जाणे. ते असं अनेकदा म्हणालेत. आमचं अक्षरश: डोकं उठलं होतं आणि आम्हाला आता घरी जायचं होतं. आम्ही तीन दिवस झोपलो नव्हतो. ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना फारच त्रास होतोय.
8 वाजता- थकलेल्या आणि उदास अवस्थेत लतिफाने आता घरी जायचा विचार केला कारण भारतात जाणं अद्यापही दृष्टिक्षेपात नव्हतं. मात्र त्याच दिवशी काही भारतीय आणि अफगाण नागरिकांना C-17 विमानाने भारतात आणण्यात आलं. लतिफासारखे अनेक लोक घरी परतले होते, ते मागेच राहिले.
9.40 वाजता- "मला सांगितलं की हे सगळं फार पटकन झालं सुरक्षित स्थळी पोहोचल्यावर त्यांना लगेच विमानतळावर नेण्यात आलं. ते विमान अगदी थोडक्यात हुकलं. त्यांना मला सांगायला वेळच मिळाला नाही. ते आता सगळे विमानतळाच्या आत आहेत.
"सुरक्षित स्थळ सोडलं म्हणून मला स्वत:ला दोष द्यायचा नाहीये. आम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलो होतो. मी अजूनही आशा सोडलेली नाही कारण अजून विमानं आहेत असं मला सांगण्यात आलं आहे.
22 ऑगस्ट
लतिफाला दोनदा परराष्ट्र मंत्रालयाचा फोन आला आणि त्यांचं नाव नवीन यादीत असल्याचं सांगण्यात आलं.
23 ऑगस्ट
लतिफाला रात्री 2.30 वाजता परराष्ट्र मंत्रालयातून फोन आला आणि तिला एका ठिकाणी पहाटे 5.30 पर्यंत पोहोचण्यास सांगण्यात आलं. जे लोक सुटले आहेत त्यांना घेऊन साडेसहावाजता एक बस सुटणार होती.

फोटो स्रोत, EPA
8 वाजता- 21 सीट असलेल्या दोन मिनी बसमध्ये 70-80 प्रवासी असलेले लोक हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य द्वारावर पोहोचले. बाहेरचा सीन आधीइतकाच भीषण होता.
"अनेक लोक अजुनही आपलं नशीब अजमावून पाहत होते. तालिबानी लोक लोकांना चाबकाचे फटके देत होते. हवेत गोळीबार करत होते. आम्हाला सगळ्या खिडक्या बंद करायला सांगण्यात आल्या. ते दृश्य भीतीदायक होतं."
8.45 वाजता- लतिफाला घेऊन जाणारी बस विमानतळाच्या मुख्य दारात आली.
"प्रचंड अडचणींना तोंड दिल्यानंतर आम्ही आत जाऊ शकलो. तिथे मुख्य दारावर तालिबानी लोक होते. काही लोकांना आम्ही आत येतानाही पाहिलं. आम्ही आणखी आत आलो. तिथे आम्हाला अमेरिकेचे सैनिक दिसले. ते आमच्याकडे बघून हात हलवत होते. काही भारतीय अधिकारी आम्हाला घ्यायला आले आणि आमचे पासपोर्टत तपासत होते.
10.00 वाजता- सर्व महिला प्रवाशांना एका तंबुच्या खाली बसवण्यात आलं आणि अमेरिकन सैनिकांनी जेवण दिलं.
11.20 वाजता- अमेरिकन सैनिक आले आणि आम्हाला तंबूच्या बाहेर घेऊन गेले. आता आम्ही धावपट्टीवर बसलो आहोत. आम्ही भारताचं विमान येण्याची वाट पाहत आहोत. अमेरिकेकडून परवानगी घेत आहेत असं आम्ही ऐकत आहोत.
12.04 वाजता- " भारतीय लष्कराचं विमान आम्ही धावपट्टीवर येताना पाहत आहोत. आता आम्ही विमानात चढू.
12.20 वाजता- आम्ही आता लष्कराच्या विमानात आहोत आणि आता ते आम्हाला ताजकिस्तानला घेऊन जात आहेत.
रात्री 1 वाजता- आम्ही तिला फोन केला तेव्हा तिचा फोन स्विच ऑफ होता. याचा अर्थ तिचं विमान उडालं असावं.
24 ऑगस्ट
लतिफा याचं विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 9.40 वाजता पोहोचलं.
मी लतिफाला हाक मारली आणि तुझं स्वागत लतिफा असं म्हणाले.
तिला अश्रू अनावर झाले होते. ती म्हणाली, "मी इथं आहे पण माझे पती आणि माझे कुटुंब अफगाणिस्तानात आहेत. काय चाललं आहे यावर विचार करायला अफगाणिस्तानात वेळच नव्हता. दुशान्बे (ताजिकिस्तान)मध्ये पोहोचल्यावर विचार करायला मिळाला. आता माझे पती आणि कुटुंबीय यांची सुटका होईल यासाठी प्रार्थना करते. त्यांची सुटका झाल्यावरच मला घरी आल्यासारखं वाटेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








