नारायण राणे म्हणतात, 'एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, लवकरच त्यांना भाजपमध्ये घेऊ' #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, लवकरच त्यांना भाजपमध्ये घेऊ - नारायण राणे
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे सध्या महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा घेत आहे. यादरम्यान, राणे शिवसेनेवर सडकून टीका करताना दिसून येत आहेत.
दरम्यान, शनिवारी (21 ऑगस्ट) नालासोपारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
"एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ," असं राणे म्हणाले.
"एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. 'मातोश्री'शिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू," असा दावा राणेंनी या वेळी केला.
शिवसेनेकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही. ही बातमी लोकमतने दिली.
2. संजय राठोड यांना 'त्या' प्रकरणातून क्लिन चीट
आमदार संजय राठोड यांनी कथितरित्या शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ येथील एका महिलेने पोस्टाच्या माध्यमातून केल्याचं समोर आलं होतं.
या महिलेचा तक्रार अर्ज पोस्टाद्वारे घाटंजी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाला होता. पण याप्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून चौकशीअंती राठोड यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, facebook
यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासाबाबत माहिती दिली.
"आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध आपण कोणतीही तक्रार केलेली नाही. हा खोडसाळपणा आहे, असं महिलेने आपल्या जबाबात म्हटलं आहे," असं डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितलं.
यामुळे संबंधित प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीनचिट मिळाला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांचा PF 2022 पर्यंत सरकार भरणार
"कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांचा पीएफ 2022 पर्यंत सरकार भरणार आहे," अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"जे कर्मचारी EPFO मध्ये नोंदणीकृत असतील, त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळू शकेल. केंद्र सरकार नोकरी गमावलेल्यांना 2022 पर्यंत कर्मचाऱ्यांचा पीएफ भाग जमा करणार आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांना छोट्या-मोठ्या नोकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पुन्हा बोलावले, ज्या युनिट्सची EPFO मध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना ही सुविधा दिली जाईल," असं सीतारमण यांनी सांगितलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. फाळणी विसरायची कशी? - सामना
देशाचा स्वातंत्र्यदिन नुकताच साजरा झाला. पण स्वातंत्र्यदिनापूर्वी एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी फाळणी स्मृती दिन पाळण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
यावरून शिवसेना खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी यांना बौद्धिक दिलं आहे.
"14 ऑगस्टला फाळणी स्मृती दिवस पाळायचा ठरवून मोदींनी देशाला एक नवा कार्यक्रम दिला. पण आपल्याला स्वातंत्र्य मिळत असताना देशात काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये, देश अखंड राहावा असं वाटणारी मंडळी त्यावेळी काय करत होती, असा सवाल राऊत यांनी केला. पाकिस्तान निर्मितीचे गुन्हेगार फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. पण गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीना यांच्यावर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती," असं राऊत यांनी लिहिलं.
5. मदिरालयांवर विश्वास असलेल्यांचा मंदिरांशी काहीही संबंध नाही - मुनगंटीवार
"मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही. दारुवाल्यांना सूट देणारं, बार मालकांना सूट देणारं हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे," अशी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे.
राज्यात कोरोनाचं कारण देत मंदिरं उघडली जात नसल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केल्यानंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मंदिरांबाबत राज्य सरकारवर निशाणा साधला.
"उद्धव ठाकरे हे जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, जे बीअर बार आणि दारुमालकांना सूट देतात. मेट्रोचं उद्धाटन चालतं, पुण्यातील कार्यालयाचं उद्घाटन चालतं, डान्सबार सुरु केले तरी यांना चालतं, त्यामुळे कोरोना होत नाही का?" असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
"पण दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा केली तर कोरोना येतो असं राज्यातील थोर नेत्यांना वाटतं," अशा शब्दात मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. ही बातमी 'टीव्ही 9 मराठी'ने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








