जम्मू काश्मीर : कलम 370 रद्द केल्यानंतर भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र, आतापर्यंत 23 हत्या

भाजप नेते फिदा हुसैन यांच्या आई

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR/BBC

फोटो कॅप्शन, भाजप नेते फिदा हुसैन यांच्या आई

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये संशयित कट्टरतावाद्यांनी गेल्या मंगळवारी भाजप नेते जावीद अहमद डार यांची गोळ्या घालून हत्या केली. डार त्यांच्या घराबाहेर फेरफटका मारत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

भाजपचं म्हणणं आहे की, गेल्या 2 वर्षांमध्ये काश्मीर खोऱ्यात त्यांच्या 23 नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. भाजप प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार एकट्या कुलगाम जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 7 भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.

भाजप प्रक्ते अल्ताफ ठाकूर यांनी डार यांच्या हत्येबाबत दुःख व्यक्त केलंय. कट्टरतावादी निर्दोष लोकांना मारत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच त्यांच्या मते डार हे एका निवडणूक क्षेत्राचे प्रभारी होते.

काश्मीरमध्ये होत असलेल्या भाजप नेत्यांच्या हत्यांची सर्वच पक्षांनी निंदा केली आहे. पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनीदेखील जावीद डार यांच्या हत्येची निंदा केली आहे.

'अपनी पार्टी'च्या नेत्याची हत्या

याआधी गेल्या गुरुवारी, 19 ऑगस्टला कुलगाम जिल्ह्यातल्याच ब्रजोलामध्ये जम्म-काश्मीर अपनी पार्टीचे नेता ग़ुलाम हसन लोन यांनी कट्टरतावाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

जावीद डार

फोटो स्रोत, BJP JK

फोटो कॅप्शन, जावीद डार

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले.

त्यानंतर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कट्टरतावाद्यांनी लक्ष्य करायला सुरुवात केली. आतापर्यंत खोऱ्यात किती भाजप नेत्यांची हत्या झाल्या आहेत, त्यावर एक नजर टाकूया.

13 ऑगस्ट 2021 - राजौरीमध्ये भाजप नेत्याच्या घरावर हल्ला

अनंतनागमध्ये भाजप नेता आणि त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर कट्टरतावाद्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष जसबीर सिंह यांच्या घरावर ग्रेनेडने हल्ला केला.

त्यात भाजप नेत्यासह त्यांच्या कुटुंबातले सहा जण जखमी झाले.

हल्ला झाला त्यावेळी संपूर्ण कुटुंब अंगणात बसलं होतं. या हल्ल्याच त्यांचा 2 वर्षांचा पुतण्यादेखील जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

9 ऑगस्ट 2021 - गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीची हत्या

अनंतनागमध्ये भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आणि सरपंच गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नी जवाहिर यांची कट्टरतावाद्यांनी दिवसाढवळ्या घरात घसून हत्या केली.

गुलाम रसूल डार

फोटो स्रोत, BJP Spokesperson Kashmir

फोटो कॅप्शन, गुलाम रसूल डार

गुलाम रसूल डार यांची पत्नीसुद्धा भाजपशी जोडली गेली होती. पोलिसांनी या हल्ल्याला लष्कर-ए-तोयबाला जबाबदार ठरवलं होतं.

03 जून 2021 - राकेश पंडिता यांची हत्या

भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची कट्टरतावाद्यांनी हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जूनच्या रात्री सव्वा दहा वाजता काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी पंडिता यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात जे गंभीर जखमी झाले. पण रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा पंडिता यांनी त्यांच्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं होतं. ते त्यांच्या सुरक्षारक्षकांविनाच त्यांच्या गावी गेले होते.

29 मार्च 2021 - भाजपच्या 2 नगरसेवकांची हत्या

उत्तर काश्मीरमधल्या सोपोर भागात 30 मार्चला कट्टरतावाद्यांनी नगरपालिका कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात 2 नगरसेवक आणि एका पोलिसाचा देखील मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोन्ही नगरसेवक भाजपचे होते. शम्सुद्दीन आणि रियाज अहमद अशी त्यांची नावं आहेत.

1 एप्रिल 2021 - अन्वर खान यांच्या घरावर हल्ला

भाजपच्या कार्यकारिणीचे सदस्य तसंच लेह आणि कुपवाडाचे प्रभारी अन्वर खान यांच्या श्रीनगरमधल्या घरावर 1 एप्रिल 2021 रोजी हल्ला झाला होता. त्यात अन्वर खान तर बचावले पण त्यांच्या एका सुरक्षारक्षकाचा मात्र मृत्यू झाला.

पोलिसांनी या हल्ल्याला लष्कर-ए-तोयबाला जबाबदार ठरवलं आहे.

भाजप नेते फिदा हुसैन यांच्या अंत्यसंस्काराला आलेले लोक

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR/BBC

फोटो कॅप्शन, भाजप नेते फिदा हुसैन यांच्या अंत्यसंस्काराला आलेले लोक

ऑक्टोबर 2020 - 3 भाजप कार्यकर्त्यांची हत्या

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भाजपच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या झाली. फिदा हुसैन याटू, उमर सिंह राशिद आणि उमर रमजान हजाम अशी त्यांची नावं आहेत.

कुलगामच्या व्हाय.के.पुरा भागात त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. त्यात तिघांचाही मृत्यू झाला.

6 ऑगस्ट 2020 - भाजप सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची हत्या

काश्मीरमधल्या काजीगुंजच्या वेसू भागात कट्टरतावाद्यांनी सज्जाद अहमद खांडे यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

जखमी अवस्थेत सज्जाद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

4 ऑगस्ट 2020 - भाजप सरपंचावर हल्ला

गेल्यावर्षी 4 ऑगस्टला कुलगामध्ये कट्टरतावाद्यांनी भाजपचे सरपंच आरिफ अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. पण त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं.

अन्वर खान

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR/BBC

फोटो कॅप्शन, अन्वर खान

ऑगस्ट 2020 - भाजप नेत्याची हत्या

बडगाम जिल्ह्यातल्या अब्दुल हामिद नजर या भाजप कार्यकर्त्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण नंतर त्यांचा मृत्यू झाला.

जुलै 2020 - वसीम बारी यांची हत्या

काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात संशयित कट्टरतावाद्यांनी 22 जुलै 2020 रोजी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शेख वसीम बारी, त्यांचे वडील आणि भावाची गोळ्या घालून हत्या केली होती.

हल्ला झाला तेव्हा तिघेही त्यांच्या घराजवळच्या त्यांच्या दुकानात बसले होते.

भाजप नेत्यांचं म्हणणं काय आहे?

काश्मीर खोऱ्यात भाजपची लोकप्रियता वाढत असल्याचा दावा भाजप नेते अन्वर खान यांनी बीबीसीशी बोलताना केला होता. तसंच पंचायत निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भाजपचे सरपंच झालेत. शिवाय डीडीसी आणि बीडीसी निवडणुकांमध्येसुद्धा भाजपचे लोक जिंकले आहेत.

कलम 370 हटवलं जाणं हेसुद्धा या हत्यांमागे कारण असू शकतं असं अन्वर खान यांना वाटतं. "कट्टरतावाद्यांना देखील कलम 370 पाहिजे होतं. ते हटल्यानंतर आमच्या लोकांसाठी आता धोका आणखी वाढला आहे," खान सांगतात.

काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यात पहिल्यांदा त्यांच्या 3 जागा निवडून आल्या होत्या.

भाजप प्रवक्ते अल्ताफ यांचं म्हणणं आहे की हा सगळा त्यांच्या संतापाचा परिणाम आहे.

ते सांगतात, "आमच्या नेत्यांवर कलम 370 जाण्याआधीपासूनच हल्ले होत आहेत. पण कलम 370 गेल्यानंतर मात्र कट्टरतावाद्यांनी आम्हा जास्त लक्ष्य केलं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)