अहमदनगर : लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा

फोटो स्रोत, Facebook
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
या क्लिप मध्ये तहसीलदार देवरे लोकप्रतिनिधींकडून कशी छळवणूक होत आहे हे सांगत आहेत. पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे.
या ऑडिओ क्लिप मध्ये त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतलेले नाही, मात्र त्यांचा या क्लिपमध्ये देण्यात आलेला इशारा हा राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.
निलेश लंके हे पारनेर-नगर मतदार संघाचे आमदार असून कोरोना काळात त्यांनी सुरु केलेल्या कोव्हिड सेंटरमुळे ते राज्यभर चर्चेत आले होते. आता या ऑडिओ क्लिप मुळे पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलंय.
तहसीलदार ज्योती देवरे यांनी आपल्या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे म्हणत, महिलांचा प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात, आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
हा प्रकार खूप दिवसांपासून सुरु असल्याने मी आता कंटाळली असल्याचं देवरे सांगतात. खोट्या तक्रारी करणे, छोट्या मोठ्या चुकांचं भांडवल करून दमदाटी करणे, कार्यकर्ते पाठवून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे असं या जाचाला मी कंटाळले असल्याचं तहसीलदार देवरे या क्लिपमध्ये म्हणताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, facebook
दरम्यान, ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच निलेश लंके यांनीही एका व्हीडिओद्वारे आपली बाजू मांडली आहे.
"ज्योती देवरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्त यांनी मुंबईला पाठवला आहे. या अगोदरही मतदार संघात गलथान कारभार झाला त्या त्या वेळी मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला ,मात्र त्यांनी मेसेज करून मला धमकावण्याचा प्रयत्न केलाय , मी आत्महत्या करीन अश्या धमक्या मेसेजद्वारे दिल्या , आणि आता आरोप सिद्ध झाल्याने विनाकारण माझी बदनामी करत असल्याचं," लंके यांनी या व्हिडिओत सांगितलंय.
या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहित थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून 'मी सुद्धा तुझ्याकडे येतेय' हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे असं म्हटलं आहे.
"एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. खरे तर कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकार्याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तात्काळ त्यावर तोडगा काढून त्या महिला अधिकार्याला न्याय द्यावा," असंही फडणवीस यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








