You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', कोणाकोणाची उपस्थिती?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज (3 ऑगस्ट) विरोधी पक्षांसाठी 'ब्रेकफास्ट मिटिंग'चं आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, शिवसेना, राजद, सपा, भाकप, माकप, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँग्रेस यांसह विरोधी पक्षातील बहुतांश पक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित होते.
दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
राहुल गांधी या बैठकीत म्हणाले, "आपण एकत्र जमलो आहोत, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जितके एकत्र होऊ, तितका आपला आवाज बुलंद होईल. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला आपल्यावर दबावण आणणं कठीण जाईल."
या बैठकीनंतर राहुल गांधी यांच्यासह काही विरोधी पक्षातील नेत्यांनी सायकलवरून संसद गाठली.
शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंक चतुर्वेदी यांनी या बैठकीनंतरचा एक फोटो शेअर करत म्हटलं, 'युनायटेड फ्रंट अॅट कॉन्स्टिट्युशनल क्लब'
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कुठल्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरायचं, याबाबत या बैठकीच चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे.
या बैठकीनंतर संसदेत गेलेल्या राज्यसभा खासदारांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं आणि त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्त्वात आणि आयोजनात ही बैठक होत असल्यानं या बैठकीच्या इतर राजकीय अर्थांचेही तर्क-वितर्क लढवले गेले.
महाराष्ट्रापुरते बोलायचं झाल्यास, कालच (2 ऑगस्ट) शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.
या भेटीनंतर संजय राऊत यांनी म्हटलं की, "राहुल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले."
एकूणच राहुल गांधी हे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं विरोधकांची मोट बांधू पाहत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)