ममता बॅनर्जी म्हणतात, 'नरेंद्र मोदींचे अच्छे दिन पाहिले आता सच्चे दिन हवेत'

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. नरेंद्र मोदींचे अच्छे दिन पाहिले आता सच्चे दिन हवेत - ममता बॅनर्जी

"आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात 'खेला होबे' पाहायला मिळेल. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी होईल.

"नरेंद्र मोदींचे अच्छे दिन खूप पाहिले, आता देशवासियांना सच्चे दिन पाहायचे आहेत," असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी गेल्या तीन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी करताना दिसत आहेत. यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

दरम्यान, मी काही ज्योतिषी नाही. त्यावेळच्या परिस्थितीवर सगळं काही अवलंबून असेल. विरोधी पक्षांना भाजपला हरवण्यासाठी एकत्र यावं लागेल, असंही ममता यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.

2. महाडमध्ये NDRF चा बेस कॅम्प उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक

महाडमध्ये NDRF चा कायमस्वरुपी बेस कॅम्प उभारण्यात यावा, असा प्रस्ताव आम्ही नोव्हेंबर 2020 मध्ये पाठवला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत विनंती केली होती.

या प्रस्तावाबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

NDRF च्या महाड बेस कॅम्पमुळे रायगडसह रत्नागिरी, सिंधूदुर्गला त्याचा फायदा होऊ शकतो. NDRF चं बेस कॅम्प शक्य नसेल तर SDRF चं कॅम्प उभारावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. त्याबाबत सकारात्मक भूमिका शासनाने घेतली आहे.

कोकणात अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळादरम्यान आपल्याला हे दिसून आलं होतं. पुणे किंवा ठाणे येथून NDRF पथक दाखल होईपर्यंत 8 तासांचा वेळ लागतो. त्यामुळे महाड येथे हे कॅम्प असल्यास त्याचा फायदा संपूर्ण कोकणाला होईल, असं तटकरे म्हणाल्या. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. बँक बुडित झाल्यास खातेदाराला 90 दिवसांत मिळणार पैसे

बँक एखाद्या कारणामुळे बुडित झाल्यास त्या बँकेतील खातेदारांना 90 दिवसांत पैसे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे विम्याची मर्यादा वाढेल आणि त्याअंतर्गत 98.3 टक्के बँक खातेधारक संरक्षित होतील. हा निर्णय सर्व बँकासाठी लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत ठेवीदाराला पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम 90 दिवसांत परत केली जाईल. ही बातमी एबीपी माझाने दिली.

4. गुजरातला द्यायला पैसे आहेत, महाराष्ट्राला का नाही? - नाना पटोले

केंद्र सरकारकडे राज्याचे 1 लाख कोटी रुपये अद्याप बाकी आहेत. पेट्रोल डिझेलचे दर वाढवले जात आहेत. केंद्र सरकारकडे गुजरातला देण्यासाठी पैसे आहेत. पण मग महाराष्ट्राला का देता येत नाहीत, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला केला आहे.

केंद्राने 700 कोटी रुपयांची केलेली मदत ही गेल्या वर्षीची अवकाळी पावसाची मदत होती. त्यामुळे यंदाच्या संकट काळात केंद्र सरकारने लवकरात लवकर मदत करावी. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लक्षात ठेवावा, असं पटोले यांनी म्हटलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

5. शिवसेना, काँग्रेसकडून घराणेशाही वाचवण्याचा प्रयत्न - भाजप

इस्त्रायलच्या पेगॅसस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणावरून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे.

पेगॅसस प्रकरणावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करण्यात येत असताना भाजपनेही याला प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारविरोधात 14 विरोधी पक्षांची बैठक झाली. मोदी सरकारविरोधात यापूर्वीही विरोधक एकजूट झाले होते. काँग्रेस आणि शिवसेनेसह इतर प्रादेशिक पक्ष एकत्र आले होते. पण एकत्र येण्यामागचा त्यांचा हेतू हा आपली 'घराणेशाही वाचवण्याचा' होता, असा टोला संबित पात्रा यांनी विरोधकांना लगावला आहे.

देशावर आणि संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या कोरोनाच्या संसर्गावर चर्चा करण्यास विरोधक तयार नाहीत. पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेचं कामकाज रोखून धरलं आहे. यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ दडला आहे.

सध्या करोनाची तिसरी लाट कशी रोखता येईल? आणि लसीकरण हे मोठे मुद्दे आहेत. पण विरोधक संसदेत यावर चर्चा होऊ देत नाहीएत. हाच खरा देशद्रोह आहे, असं संबित पात्रा म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)