सुप्रिया सुळे : 'मोदी सरकारनं स्वत:च्या मंत्र्यांच्या पत्नी आणि मुलांवरही पाळत ठेवली'

"मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तर केलीच पण विरोधकांसह स्वत:च्या मंत्र्यांच्या पत्नी आणि मुलांनाही सोडलं नाही. त्यांच्यावरही देखरेख ठेवली जाते हे अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही विरोधक याचा निषेध करतो." असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, "यासंदर्भात आम्हाला केंद्र सराकारशी चर्चा करायची आहे. पण त्यांनी त्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. संसद चालवण्याची जबाबदारी कायम सत्ताधाऱ्यांची असते. परंतु सरकार केवळ टीव्हीवर दिसते."

दिल्लीत आज (28 जुलै) 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली.पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला धारेवर धरण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. पेगासस हेरगिरी, कोरोना आरोग्य संकट, वादग्रस्त कृषी कायदे अशा मुद्यांवर विरोधकांनी आपली भूमिका यावेळी निश्चित केली.

या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार संजय राऊत यांनी पेगासस मुद्यावरुन मोदी सरकारवर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, "आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे. केंद्र सरकारने पेगाससची खरेदी केली होती का? सरकारने आपल्याच लोकांवर पेगाससचा वापर केला का? आम्हाला केवळ याची उत्तरं हवी आहेत.

आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की पेगासससंदर्भात कोणतीही चर्चा होणार नाही. मला जनतेला विचारायचं आहे की तुमच्या फोनमध्ये नरेंद्र मोदी यांनी एक शस्त्र टाकलं आहे. त्याचा वापर माझ्याविरोधात, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्याविरोधात झाला. याबद्दल सभागृहात चर्चा झाली पाहिजे."

हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "हे सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर बोलायला तयार नाही मग कोणत्या मुद्यावर यांना चर्चा करायची आहे? याविषयी आम्ही आवाज उठवणार. सर्व विरोधक यासाठी एकत्र आलो आहोत."

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसद भवनातील कक्षात ही बैठक पार पडली. दरम्यान, आज पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस होता.

विरोधकांनी पेगासस आणि कोरोनाच्या मुदयावर दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ कागदपत्र सुद्धा भिरकवण्यात आली. यानंतर कामकाज स्थगित करण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)