नाना पटोले: 'कोश्यारींना राजकारणाची खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा'

भगतसिंह कोश्यारी नाना पटोले

फोटो स्रोत, facebook

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. '..तर त्यांनी आधी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा'

"राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत ती सोडून भगतसिंह कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात. राज्यपाल हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत," अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले बोलत होते.

26 जुलै रोजी कारगिल दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपालांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरू यांच्या शांतीदूत धोरणामुळेच देशाचं नुकसान झाल्याचं कोश्यारी यांनी म्हटलं होतं. पण या वक्तव्यावरून नंतर वाद निर्माण झाला.

"हे विधान भारताचा अवमान करणारं असल्याचं सांगत कोश्यारी यांनी देशाची माफी मागावी," अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

कोश्यारी यांनी राजभवनला भारतीय जनता पक्षाचे कार्यालयच बनवले आहे, असं पटोले म्हणाले.

राज्यपालपदावर असतानाही त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत, अशा शब्दांत नाना पटोलेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

2. 'पदक जिंकल्यावरच आम्ही भारतीय, नाही तर..'

तुम्ही ईशान्य भारतीय असाल, तर फक्त देशासाठी पदक जिंकल्यानंतरच तुम्ही भारतीय असतं, नाहीतर आम्हाला चिंकी, चिनी, नेपाळी आणि आता तर कोरोना म्हणून हिणवण्यात येतं, असं मत अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोनवार-सोमण हिने व्यक्त केलं आहे.

मिलिंद सोमण अंकिता कोनवार

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार

टोकियोमध्ये सुरू असणाऱ्या ऑलिम्पिक खेळामध्ये भारताच्या वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं रौप्य पदकाची कमाई केली.

तिच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच त्याची एक दुसरी बाजू अंकिता कोनवार हिने दर्शवून दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

भारतात जातीवादासोबतच वर्णभेदही पाहायला मिळतो, अशी खंत अंकिताने यावेळी व्यक्त केली.

ही बातमी झी 24 तासने दिली.

3. 'संरक्षक भिंत हा उपाय नाही, पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवावं'

पुरापासून बचाव करण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही. त्याऐवजी कॅनल बांधून पुराचं पाणी दुष्काळी भागात नेलं जावं. दीर्घकालीन उपाय तोच असू शकतो, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

राज्यपालांच्या कोकण दौऱ्यादरम्याण देवेंद्र फडणवीस बोलत होते. पूरस्थिती लक्षात घेता ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा त्यासंदर्भात राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी वरील सल्ला राज्य सरकारला दिला.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांचा पूरग्रस्त भागातील दौरा हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूचनेनुसारच आहे, असंही फडणवीस म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

4. केंद्राने जाहीर केलेली मदत गेल्या वर्षीची - दादा भुसे

राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 701 कोटी रुपये मदतीची घोषणा केली आहे.

पण हा निधी 2020 वर्षातील नुकसान भरपाईचा होता, असा दावा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे.

दादा भुसे

फोटो स्रोत, facebook

राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफ मधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती.

त्यानंतर आज म्हणजे, वर्षभरानंतर लोकसभेमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, असं म्हणत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्राचे आभार मानले आहेत.

दरम्यान, राज्यावर आताही अस्मानी संकट आले आहे. सध्याच्या नुकसानीसाठी देखील तातडीने मदतीची विनंती गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण तसंच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.

यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थ‍िक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल, अशी अपेक्षाही कृषी मंत्री भुसे यांनी व्यक्त केली. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

5. फक्त तिकिट हवं असेल तर मनसेत अजिबात प्रवेश करू नका - राज ठाकरे

आगामी काळात मुंबई, पुणे, ठाणे नाशिकसह राज्यातील तब्बल 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पण यंदा केवळ निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच तिकिट वाटपात प्राधान्य दिलं जाईल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करणार असेल तर अजिबात चालणार नाही. मग जो कुणी असेल त्याने मनसेत प्रवेश करू नये, असे अगदी स्पष्ट शब्दांत राज यांनी सांगितलं आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावं, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली. तसंच पुढील 15 दिवसांनंतर पुन्हा याचा आढावा घेण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)