भगतसिंह कोश्यारी : 'पंडित नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे भारत कमकुवत' #5मोठ्याबातम्या

भगतसिंह कोश्यारी

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे भारत कमकुवत - कोश्यारी

"भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला," असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. लोकमतनं ही बातमी दिलीय.

कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते.

पंडित नेहरूंबद्दल बोलताना कोश्यारी म्हणाले, "पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं."

भगतसिंह कोश्यारी

फोटो स्रोत, Twitter/@BSKoshyari

"अटल बिहारी वाजपेयींचं सरकार वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं," असं मत कोश्यारी यांनी व्यक्त केलं.

यावेळी कोश्यारींनी वाजपेयी सरकारचं कौतुक केलं. वाजपेयींनी अणुचाचणी करून भारताची कणखर प्रतिमा जगाला दाखवल्याचं कोश्यारी म्हणाले.

2) 'आपलं मिशन एकच', पंकजा मुंडेंचं वडेट्टीवारांना उत्तर

पंकजा मुंडे यांचा काल (26 जुलै) वाढदिवस झाला. या निमित्तानं सोशल मीडियावरून त्यांना सदिच्छा देण्यात आल्या. काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या सदिच्छांना पंकजा मुंडेंनी दिलेलं उत्तर चर्चेचं केंद्र बनलंय.

विजय वडेट्टीवारांनी ट्विटरवरून पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्यानंतर, पंकजा मुंडे यांनी ट्वीटला रिप्लाय देत म्हटलं, "धन्यवाद. आपले मिशन एकच आहे. आरक्षण बचाओ."

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Twitter

या ट्वीटमुळे पंकजा मुंडे यांच्या भाजपअंतर्गत नाराजीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार हे सातत्याने केंद्राकडे बोट दाखवत असताना, पंकजा मुंडे यांनी 'आपलं मिशन एकच' म्हणत वडेट्टीवारांच्या सुरात सूर मिसळवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

3) राणे मंत्री झाल्यानं कोकणावर आपत्ती - गुलाबराव पाटील

"केंद्रीय मंत्री नारायण राणे आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यानेच ते मंत्री झाल्यामुळे कोकणावर ही आपत्ती कोसळली आहे," अशी टीका शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटलांनी ही टीका केली.

गुलाबराव पाटील

फोटो स्रोत, Twitter/@GulabraojiP

या टीकेला पार्श्वभूमी नारायण राणेंच्या वक्तव्याची आहे. दोनच दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी कोकण दौऱ्यावेळी म्हटलं होतं की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकटं येत आहेत, त्यांचे पाय तपासावे लागतील."

"आरोप-टीका करण्यासाठी नेहमीच राजकीय आखाडा रिकामा असतो. मात्र, आपत्तींमध्ये पीडितांना सहकार्य करणं हेच लोकप्रतिनिधींचं पहिलं कर्तव्य असतं. उद्धव ठाकरे ते कर्तव्य पार पाडतायेत. राणेंनी राजकारण करण्याची गरज नाही," असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

4) दसऱ्याला 'म्हाडा'च्या नऊ हजार घरांची सोडत

दोन वर्षांपासून रखडलेली मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. मुंबई-ठाणे शहरांजवळ हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडा नऊ हजार घरांची सोडत दसऱ्याला काढणार आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. 2018 मध्ये 9018 घरांसाठी सोडत निघाली होती. त्यानंतर सर्वसामान्य नागरिक सोडतीच्या प्रतीक्षेतच होते.

आता ही प्रतीक्षा संपणार असून कोकण मंडळातील सुमारे नऊ हजार हजार घरांसाठी दसऱ्यादरम्यान सोडत काढण्यात येणार आहे. लवकरच या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

पंतप्रधान आवास योजनेतील 6500, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर 20 टक्के योजनेतील 500 घरांचा या सोडतीत समावेश आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, असंही महाजन यांनी सांगितलं.

5) ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना भेटणार, पाच दिवसांचा दिल्ली दौरा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर बरीच टीका केली. त्यानंतर पहिल्यांदाच दोघेजण आमने-सामने येणार असल्यानं राजकीय वर्तुळाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसह ममता बॅनर्जी विरोधी पक्षांमधील काही नेत्यांचीही भेट घेणार आहेत. आनंद शर्मा, अभिषेख मनु सिंघवी यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांच्या भेटीही ठरल्या आहेत.

ममता बॅनर्जी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)