महाराष्ट्र पाऊस: 'पाणी वाढणार नसल्याचं प्रशासनानं सांगितलं, म्हणून घरी थांबलो आणि...'

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

"2019 चा महापूर पाहिलाय. त्यामुळे भीती वाटत नव्हती. पाणी कमी होईल असं वाटलं. पण पाण्याची पातळी इंचा-इंचाने वाढू लागलं."

बचावदलाच्या बोटीत बससेल्या सांगलीच्या वखारभागात रहाणाऱ्या 65 वर्षांच्या आजी त्यांच्या घराकडे बोट दाखवून सांगत होत्या.

महाराष्ट्रातील महापुराचा फटका सांगली जिल्ह्यालाही बसला आहे. सांगली शहरातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त भाग शनिवारपासून (24 जुलै) पाण्याखाली आहे.

कृष्णा नदीला आलेल्या पुराचं पाणी शहरात शिरलंय. पाण्याची पातळी स्थिर असली तरी, कृष्णामाईने संपूर्ण सांगली शहराला चहू बाजूंनी वेढा दिलाय.

कृष्णा नदीची पातळी आज (26 जुलै) आयर्विन ब्रिजच्या इथे 53.5 फुटांवर आलीय. रविवारच्या (25 जुलै) तुलनेत एक फूट कमी आहे.

महाराष्ट्र सरकारच्या माहितीनुसार, सांगलीत आतापर्यंत 1 लाख 69 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय.

'पाणी वाढत गेलं… तशी काळजी जास्त वाटू लागली'

शनिवारी कृष्णा नदीचं पाणी सांगली शहरात शिरलं. पाहता-पाहता सांगली शहर पाण्याखाली गेलं.

सांगलीच्या वखारभागात या आजी आपल्या नातवासह अडकून पडल्या होत्या. त्यांचे पती शनिवारी रूग्णालयात दाखल झाले होते. मुलगा वडिलांसोबत होता. घरी आजी आणि नातू एकटेच राहिले.

बोटीतून जाताना घराकडे बोट दाखवत त्या पुढे म्हणाल्या, "15 दिवसांपूर्वीच या घरी राहायला आलोय. शनिवारी पाणी भरायला सुरूवात झाली. पाणी कमी होण्याची चिन्हं दिसत नव्हती. नातू खूप घाबरला होता. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला."

सांगलीमध्ये बचावकार्यासाठी रस्त्यावर बोटी चालवल्या जात आहेत. अशाच एका बोटीतून रविवारी दुपारी बचावपथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढलं.

हातातील दोन बॅगांसह आणि महत्त्वाच्या सामानासह त्या घराबाहेर पडल्या आहेत.

"2019 च्या पुराचा अनुभव आहे. त्यामुळे भीती वाटली नाही. पण. पाणी उतरत नसल्याने काळजी नक्कीच होती," त्या पुढे सांगत होत्या.

'प्रशासनाने योग्य माहिती दिली नाही म्हणून पाण्यात अडकलो'

सांगली शहरातील राजवाडा चौक, स्टेशन रोड, कपडा बाजार, मारूती चौक, सांगली कारागृह पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. सांगली महापालिका आणि शहर पोलीस स्टेशनही दोन दिवसांपासून पाण्याखाली आहे.

शनिवारी सांगलीत पाणी भरल्यानंतर बचावकार्य सुरू झालं. आणि रविवारी NDRF चं पथंक सांगलीत दाखल झालं. सांगलीत सद्य स्थितीत NDRF ची पथकं तैनात आहेत.

बोटीतून बचावकार्य सुरू असताना बचावपथकाला एक कॅाल आला. एका कुटुंबाने त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत मागितली होती.

बचावपथक त्या इमारतीजवळ पोहोचलं. इमारतीबाहेर पाच फूट पाणी भरलं होतं.

एक वृद्ध पुरुष, त्यांची 70 वर्षांची पत्नी यांना बोटीत बसवण्यात आलं. त्यापाठोपाठ कुटुंबातील दोन महिला आणि दहा वर्षांच्या मुलाला बाहेर काढण्यात आलं.

"आम्हाला प्रशासनाकडून योग्य माहिती मिळाली नाही. प्रशासनाने पाणी वाढणार नाही असं सांगितल. त्यामुळे आम्ही घरी थांबलो," या कुटुंबातील एका महिलेने आपला राग व्यक्त केला.

"रात्री आमच्या इमारतीत फक्त 1 फूट पाणी होतं. रात्रीच पाणी पाच फुटांवर पोहोचलं," त्या पुढे सांगत होत्या.

सांगलीतील हजारो कुटुंब शनिवारपासून पुराच्या पाण्यात अडकले आहेत. या रहिवाशांना प्रशासनाकडून कोणतीही मदत पोहोचलेली नाही असं स्थानिकांच म्हणणं आहे.

त्या म्हणतात, "आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. कोणी पहायला आलं नाही,"

'सांगलीला पुराचा वेढा कायम'

कृष्णा नदीची पातळी रविवारी दिवसभर 54 इंचावर स्थिर होती. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे रविवारी सांगली शहरात पाणी भरलं होतं.

राज्यमंत्री विेश्वजीत कदम सांगतात, "कोयना धरणातून होणार्या विसर्गाचा सांगलीला फटका बसला. मात्र आता पाऊस कमी झाल्याने पाणी पातळी कमी होतेय."

पण, कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग सांगलीकरांची चिंता वाढवणारा आहे.

सांगलीची परिस्थिती काय?

सांगली शहरात दोन दिवसांनंतरही पुराचं पाणी ओसरलेलं नाही. गेले दोन दिवस सांगलीत पुराच्या पाण्यात अडकलेल्याचं बचावकार्य सुरू आहे.

सांगलीकरांनी 2019 आणि 2005 चा महापूर पाहिलाय. त्यामुळे यावेळी लोकांमध्ये भीती फारशी भीती दिसून आली नाही.

स्थानिक पत्रकार सरफराज सनदी सांगतात, "प्रशासनाने पाणी पातळी वाढण्याची सूचना दिल्यानंतर जवळपास 50 टक्के लोक आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी गेले होते. लोकांमध्ये पूराची भीती दिसून येतय. पण, 2019 सारखे लोक बिथरलेले नाहीत."

शहरात शिरलेले पुराचं पाणी अजूनही कमी झालेलं नाही. त्यामुळे बचावकार्य सुरूच रहाणार आहे.

रस्त्यावर बोटी चालत आहेत…

सांगली शहरातील 40 च्या आसपास परिसरात पाणी शिरलंय. त्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत.

सांगली महापालिका, NDRF, स्थानिक बोट क्लब आणि स्वयंसेवी संघटना बोटींच्या माध्यमातून लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत.

बचावकार्य करणारे नितीन चौगुले म्हणाले, "2019 पेक्षा यावेळी पाणी थोडं कमी आहे. लोकांनी मागचा अनुभव लक्षात घेऊन घर सोडलंय."

सांगलीचा पूर का ओसरत नाहीये?

मयांक भागवत यांचे ग्राउंड झिरोवरून विश्लेषण

सांगली तीन दिवसांपासून पाण्यातच आहे. कृष्णा नदीचा पूर अद्यापही ओसरला नाही. कालपर्यंत कृष्णा नदीची धोक्याची पातळी 54.5 फूट इतकी होती. आता ती 53.5 फूट इतकी आहे.

जेव्हा कृष्णा नदीला पूर येतो तेव्हा ते पाणी शहरात शिरतं आणि त्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी जागा नसते.

शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली आले आहेत. जेव्हा कृष्णा नदीची पाण्याची पातळी कमी कमी होत जाईल तसं शहरातलं पाणी देखील ओसरेल असं तज्ज्ञ सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)