महाराष्ट्र पाऊस: 'चिखलात गेलेले संसार आणि न थांबणारे अश्रू' - चिपळूण डायरी

    • Author, मुश्ताक खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी, चिपळूणहून

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हाहाःकार उडालाय. पुराने अनेकांचे जीव घेतले, अनेकांचे संसार वाहून नेले. बीबीसी मराठीचे सहयोगी पत्रकार मुश्ताक खान वार्तांकनासाठी चिपळूणमध्ये होते. त्यांचा हा अनुभव.

ऑफिसची मीटिंग संपल्यावर चिपळूणमध्ये पुराच्या कव्हरेजसाठी निघालो. दापोली ते चिपळूण मार्ग तसा सव्वा तासाचाच. पण मला लागले तब्बल तीन तास. कारण वाटेत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि चिपळूणमधील परशुराम घाटात खचलेला रस्ता.

हा रस्ता एवढ्यात दुरुस्त होण्याची चिन्हं नव्हतीच. बातमी करताना जीव जपा, अशी सूचना ऑफिसनं आधीच दिली होती.

त्यामुळे रिस्क घेऊन गाडी पुढे घेऊन जाणं योग्य नव्हतं. मग गाडी वाटेतच थांबवून पायी जावं लागलं. ग्राऊंड झिरोवर अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर चिपळूण शहरात पोहोचलो.

चिपळूण शहरातील परिस्थिती फारच भयावह होती. बहादूर शेख नाक्यावरील पुल कोसळला होता. एन्रॉन पूलसुद्धा खचलेला दिसला. गोवळकोट पुलावरूनही गाड्या जात नव्हत्या.

चिपळूणमध्ये गुरूवारी आलेला महापूर ओसरू लागला होता. शहरातील सखल भागात मात्र पाणी होतंच. पण बऱ्याच ठिकाणी पाणी कमी झालं होतं.

फर्शीहून पेठमापकडे जाणाऱ्या पुलावर गुरं बांधण्यात आली होती. गाड्याही पुलावरच पार्क करण्यात आल्या होत्या. कदाचित तोच सुरक्षित पर्याय दिसला असेल. लोकांचा आक्रोश, धावपळ, संसाराची जुळवाजुळव करण्याची धडपड दिसत होती.

रस्त्यावर चालताना चिखल, घरात चिखल अशी अवस्था होती. लोकांनी आपला भिजलेला संसार रस्त्यावर काढला होता.

घरातून चिखल बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. महिला हातात फावडं घेऊन चिखल स्वच्छ करण्यात गुंतल्या होत्या. अतिशय विदारक स्थिती होती.

4 फुटांपासून ते 20 फुटांपर्यंत पाणी लोकांच्या घरात आलं होतं. घरातील शिल्लक राहिलेले टीव्ही, फ्रीज, पलंग, सिलेंडर, भांडी, कपडे पाहवत नव्हते. काहींच्या घरात तर यापैकी काहीच नव्हतं...सर्वकाही वाहून गेलं होतं.

मी जेव्हा या भागात पोहोचलो तेव्हा लोकांना वाटलं की, सर्व्हेसाठी प्रशासनाकडून कुणी तरी आलं आहे. प्रत्येक जण आमचं किती नुकसान झालं आहे, याची नोंद करा असं सांगत होतं.

काही लोकं तर आमच्या घराचा फोटो काढलात नाही म्हणून चिडचिड करताना दिसले.

पेठमाप भाग वाशिष्ठी नदीच्या अगदीच लागूनच. कोयना धरणातून पाणी सोडल्यावर नदीच्या पाण्याची पातळी वाढते. पण गुरुवारची रात्र मात्र वेगळी होती.

सकाळी 11 वाजता धरणाचं पाणी सोडलं जाईल अशी सूचना लोकांना दिली गेली होती. पण पाणी आधीच सोडलं गेलं.

लोकांना सामानाची, माणसांची आवराआवर करण्याची संधीच मिळाली नाही. वयोवृद्ध, लहान मुलं, गरोदर महिला यांना या पुराचा सगळ्यांत जास्त त्रास सहन करावा लागला. हे सांगताना लोक यंत्रणेवर नाराज होती हे स्पष्टपणे जाणवलं.

एका घरात तर अडीच फूट चिखल होता. घरात एकटीच महिला होती. कर्ता पुरुष आजारी होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रृ ओघळत होते.

"आम्हाला मदत मिळेल ना हो... कष्टानं जमवलेला माझा संसार उघड्यावर पडला आहे, मी कुठे जाऊ? आता काय करू? घरातल्या पेशंटला डॉक्टरकडे कसं घेऊन जाऊ?" त्यांच्या शब्दांत त्यांच्या दुःखाची तीव्रता जाणवत होती.

मी जेव्हा या भागात पोहोचलो तेव्हा कुणी प्रशासकीय अधिकारी, कर्माचारी किंवा लोकप्रतिनिधी पोहोचलेला नव्हता. लोक रागात होते.

शुटींग करत पुढे जात असताना एक महिला जोर जोरात बोलू लागल्या, "आम्हाला भरपाई मिळालीच पाहिजे. आम्हाला आधी सूचना का दिली नाही? ढगफुटी होण्याची कल्पना तरी दिली होती, पण यावेळी आम्हाला कसलीच माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे," त्या वारंवार सांगत होत्या.

त्या भांडत असल्याच्या सुरातच म्हणजे वरच्या पट्टीत बोलत होत्या. अर्थात ही त्यांच्या मनातील खदखद होती.

शहरातील पेठमाप मोहल्ल्यात एक वृद्ध महिला, त्यांची मुलगी आणि नात असा तिघांचा परिवार. त्यांच्या घरातील सर्व भिंती पडल्या होत्या.

अन्नधान्याची नासाडी झालेली दिसली. मुलीचे दागिने वाहून गेलेले. कपडे खराब झाले. टीव्ही, फ्रीज, पलंग खराब. त्यांच्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू काही थांबता थांबत नव्हते.

प्रतिक्रिया देताना या निर्दयी पुरामुळे आपलं सर्व काही वाहून गेलं आहे ही त्यांची मनात असलेली भावना प्रकर्षाने जाणवत होती.

या पुरामध्ये कोरोना रुग्णांबाबत घडलेली घटना सर्वांत हृदयद्रावक होती. 8 कोरोना रुग्णांना या नैसर्गिक आपत्तीमुळे आपला बहुमोल जीव गमवावा लागला.

शहरातील नगर परिषदेसमोरील अपरांत हॉस्टिपलमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते. पुरामुळे आर्थिक नुकसान होणं एकवेळ सहन करता येऊ शकेल, पण एखाद्यानं जीव गमावणं हे फार भयानक आहे.

चिपळूण शहरात अचानक पूर येतो काय? लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात काय? हे फार दुर्दैवी आहे.

या पुराची बातमी केल्यानंतर चालत शहरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. बाजारपेठेतील पुलाकडे जात होतो. पण वाटेत कमरेपर्यंत असलेल्या पाण्यातून जाऊ लागलो. पण पुढे हिंमत झाली नाही. मागे वळलो.

भरलेल्या पाण्याचं शुटिंग केलं. आणि फर्शीकडे निघालो. माझी गाडी परशुराम घाटात होती. पायी जाणं भाग होतं. वाटेत रस्त्यावर ढोपरापर्यंत पाणी होतं. ओलांडून पुढे सरकू लागलो.

ऑफिसला बातमी पाठवायची होती. पण मोबाईलला नेटवर्क नव्हतं. बराच वेळ चालत असताना एक भल्या माणसाने लिफ्ट दिली आणि परशुराम घाटात पोहोचलो. गाडी घेऊन घरी निघालो.

वाटेत या लोकांच्या परिस्थितीचा विचार करत होते. खूप दु:खी वाटत होतं. घरी पोहोचल्यावर थोडं गरगरल्यासारखं वाटत होतं. भावाने म्हटलं ब्लड प्रेशर तपासून घ्या.

घरी मशीन असल्यामुळे लगेच शक्य झालं. ब्लड प्रेशर होतं 136/104. अशा घटना आपल्या मनावर परिणाम करतातच हे नक्की. मी आता आराम करतो आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)