You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र पाऊस : उद्धव ठाकरे यांचं आश्वासनं, 'ज्यांचं नुकसान झालं त्यांना व्यवस्थित भरपाई दिली जाईल'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळये गावात दाखल झाले आहेत.
ते दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.
उद्धव ठाकरे यांनी तळये गावाला भेट देऊन पाहणी केली.
अतिशय दुर्गम भागातील या गावात शासन सर्व मदत करेल असं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं.
मुख्यमंत्री या गावाची पाहणी करत असतानाच जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, "ज्यांचं नुकसान झालं त्यांना व्यवस्थित भरपाई दिली जाईल. याच्यापुढे अशा घटना घडू नयेत, घडल्या तर जीवितहानी होऊ नये अशाप्रकारच्या उपाययोजना सरकार करत आहे."
ते पुढे म्हणाले, "केंद्रीय यंत्रणांकडून आवश्यक ती मदत मिळत आहे. बऱ्याचं ठिकाणचं स्थलांतर झालं आहे. अजून जिथं आवश्यकता आहे, तिथल्या नागरिकांचं स्थलांतर करू."
रायगडमधील दरड कोसळल्याच्या दोन घटनांमधील मृतांची संख्या 44 वर पोहोचली आहे. महाड तालुक्यातील तळये गावावर कोसळलेल्या दरडीखाली तीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
आणखी 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केलीय. बचावकार्य अद्याप सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तर दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या 35 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण सहा ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
तर महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये काल (23 जुलै) संध्याकाळपर्यंत एकूण 136 जणांचा मृत्यू झाला आहे.
चिपळूणमध्ये पुराचं पाणी कोव्हिड सेंटरमध्ये शिरलं, 8 रुग्णांचा मृत्यू
कोकणात पावसानं धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरी त्यात झालेलं नुकसान दिसू लागलंय.
चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटलमधील कोव्हिड सेंटरमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. चिपळूण नगरपालिकेच्या समोर हे अपरांत हॉस्पिटल आहे.
रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, "चिपळूण शहराला जवळपास 30 तास पुराने विळखा घातल्यानंतर अपरांत हॉस्पिटलमध्येसुद्धा पाणी शिरलं. तिथे 21 रुग्ण होते. त्यातील काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. मात्र, पुराचे पाणी भरताच हॉस्पिटलचा संपर्क तुटला होता."
या पुरामुळे कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
तळये गावात काय घडलं?
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळये गावात दरड कोसळून 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर पोलादपुरातील सुतारवाडी गावात दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले आहेत.
या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)