You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र पाऊस : कोल्हापूर जिल्ह्यात मदतीसाठी लष्कर व एनडीआरएफच्या तुकड्या दाखल
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मदतीसाठी लष्कर व एनडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पुरबाधित गावातील नागरिकांच्या बचावासाठी व त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी भारतीय लष्कर व भारतीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) एकूण 6 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या असून बचावकार्याचे कामकाज सुरू आहे.
दरम्यान, कोल्हापुरात आता पावसानं उघडीप घेतली आहे. मात्र, हवामान विभागानं कोल्हापूरसाठी आज (24 जुलै) आणि उद्या (25 जुलै) साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दुसरीकडे, कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळी आज (24 जुलै) सकाळी 11 वाजता 55 फूट 4 इंचांपर्यंत पोहोचली होती. पंचगंगा नदीची पाणी पातळी संथगतीने कमी होतेय. पण अजूनही साचलेलं पाणी कमी झालेला नाही. त्यामुळं जनजीवन ठप्प आहे.
मुसळधार पावसामुळे आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यानं कोल्हापुरात बहुतांश ठिकाणी पाणीच पाणी आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसतोय.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक ठप्प आहे तर सांगली जिल्ह्यातील 74 रस्त्यावरील वाहतूक बंद आहे
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलीय. सांगली-कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.
पंचगंगा नदीचं पाणी यमगर्णी आणि निपाणीमध्ये रस्त्यावर आल्याने पुणे बेंगलुरू हायवे बंद झाला आहे. पुणे- बंगळुरू हायवे वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनं रस्त्यावरच थांबली आहेत.
राधानगरी धरण 100% भरायला केवळ 4 फूट बाकी आहे. राधानगरी धरण हे एकमेव असे धरण आहे जे पूर्ण भरल्यानंतर त्याचे दरवाजे आपोआप म्हणजे स्वयंचलित पणे उघडतात. आज रात्री किंवा पहाटे हे धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होईल.
बॅरिकेड्स लावून पोलिसांनी हे रस्ते बंद केले आहेत.
NDRF च्या टीम्स कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणी या टीम बचावकार्य करत आहेत.
गारगोटीकडून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या मार्गावरील पालघाट या ठिकाणी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या आहेत.
तसंच, पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दगड-धोंडे, खडक घाटातील रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे. डोंगरातील पाण्याचे मोठे लोंढे घाटातील रस्त्यावर आडवे वाहत आहेत.
गारगोटी -कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी -कडगाव हे सर्व मार्ग बंद झाले. गारगोटीचा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागाशी संपर्क खंडित झाला आहे.
कोल्हापूर महामार्ग बंद झाल्याने याचा परिणाम दूध पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.
या गावांशी संपर्क तुटला
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग
कोयना धरणामधून आज (23 जुलै 2021) सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेक्स विसर्ग (2 फूट) आणि पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11,667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
तर सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50,000 क्युसेक(5 फुट) इतका करण्यात आला.
खोडशी बंधाऱ्यातून 15,625 क्युसेक्स तर वारुंजीमधून एकूण 79,599 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.
राजाराम बंधाऱ्यातून 71170 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात झालाय.
एकूण 116 बंधारे पाण्याखाली आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)