You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई पाऊस : गोवंडीत घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, 11 जण जखमी
मुंबईतील गोवंडी परिसरात घर कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण जखमी झाले आहेत.
गोवंडीतील शिवाजी नगर भागातील बॉम्बे सिटी हॉस्पिटलच्या जवळ हे घर होतं. तळमजला आणि पहिला मजला असं या घराचं स्वरूप होतं. पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच बचावपथकं घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, जेसीबी, डम्पर अशा सर्व गोष्टींसह बचावपथक दाखल झालं होतं.
मृत्यमुखी पडलेल्यांपैकी नेहा परवेझ शेख (वय 35 वर्षे) आणि मोकर झबिर शेख (वय 80 वर्षे) अशी दोघांची नावं आहेत.
जखमींना राजावाडी आणि सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
मुंबईत आज (23 जुलै) काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेनं दिलेल्य माहितीनुसार, 23 जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसंच, मुंबईत काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास आणि काही ठिकाणी 70 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय.
पोलादपुरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील सुतारवाडी परिसरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमनं ही माहिती दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पाच लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
तर एएनआयच्या वृत्तानुसार, महाड तालुक्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महाड तालुक्यातील कलाई या गावात दरड कोसळल्याची माहिती एएनआयनं दिलीय. या दुर्घटनेमुळे किती नुकसान झालंय, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर नौदलाचे जवान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजर झाले आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी नौदलाचे सात चमू रवाना झाले आहेत.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या पथकाला या घटनेबाबत माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात महाड तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास प्रशासनाला अडथळा येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
गेल्या आठवड्यात 30 मुंबईकरांचा पावसाने घेतला जीव
गेल्या आठवड्यातच मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी अशा दोन भागांमध्ये दुर्घटना घडल्या होत्या आणि त्यात 30 जणांचा मृत्यू झाला.
चेंबूरमध्ये मुसळधार पावसामुळे झाड भिंतीवर कोसळून झालेल्या अपघातात 19 जणांचा, तर विक्रोळीत संततधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला होता. विक्रोळीमधील सूर्या नगर, पंचशीळ चाळ भागात ही दुर्घटना घडली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)