टोकियो ऑलिम्पिक 2020 : अभिनव बिंद्राला आपण सुवर्ण पदक जिंकल्याचं जेव्हा सगळ्यात शेवटी समजलं...

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

11 ऑगस्ट 2008. भारतीय क्रीडा रसिकासाठी अभिमानाचा दिवस. कारण, या दिवशी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताची राष्ट्रधून वाजली. 10 मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राने 700.5 पॉइंट्सची कमाई करत गोल्ड पटकावलं.

ज्या देशाला गोल्ड मिळतं त्या देशाचं राष्ट्रगीत मेडल वितरणाच्या वेळी वाजवलं जातं. वैयक्तिक प्रकारात भारताला हा मान पहिल्यांदा मिळत होता. आणि तो मिळवून देणारा अभिनव स्थितप्रज्ञासारखा स्मितहास्य करत पोडिअमवर उभा होता.

विशेष म्हणजे त्याने गोल्ड जिंकलंय हे वितरण समारंभाच्या फक्त एक किंवा दोन मिनिटं आधी त्याला कळलं होतं. हजारो लोक शूटिंग रेंजमध्ये टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करत होते.

स्वत: अभिनवला त्याने गोल्ड जिंकल्याचं सगळ्यात शेवटी समजलं होतं. आश्चर्य वाटलं ना वाचून. असं नेमकं काय घडलं होतं?

अभिनव बिंद्राचं ऐतिहासिक गोल्ड

2008च्या ऑलिम्पिकसाठी अभिनवची तयारी चांगली झाली होती. तो आणि सीनिअर साथीदार गगन नारंग 10 मीटर एअर रायफल प्रकारात आपलं नशीब आजमावणार होते. आतापर्यंत भारतीय ॲथलीटने गोल्ड जिंकण्याची फारशी कुणाला सवय नव्हती. त्यामुळे मेडलच्या दावेदारांमध्ये अभिनवचं नावही घेतलं जात नव्हतं.

पात्रता फेरी संपली तेव्हा अभिनव 596 पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर होता. म्हणजे त्याने फायनल गाठली असली तरी मेडलच्या बाहेर होता. पण, फायनलच्या पहिल्याच राऊंडमध्ये अभिनवला मिळाले 10.7 गुण. हे म्हणजे 99% अचूक वेध घेण्यासारखं आहे.

कारण, सर्वाधिक गुण तुम्हाला मिळू शकतात 10.9 फायनलच्या दहाही फैरींमध्ये अभिनव कधीच दहाच्या खाली आला नाही. पण, तरीही शेवटची एक गोळी मारण्यापूर्वी तो आणि हेन्री हेकिनन समान गुणांवर होते.

आता अभिनवचा खरा कस लागणार होता. पण, म्हणतात ना निर्णायक क्षणी खेळ उंचावतो त्याला चॅम्पियन म्हणतात. शेवटच्या शॉटवर अभिनवला मिळाले 10.8 गुण. आणि प्रतिस्पर्धा हेन्री मोक्याच्या क्षणी गडबडला त्याला मिळाले 9.7 पॉइंट. यामुळे हेन्री हेकिनन ब्रॉंझ मेडलवर फेकला गेला.

पण, गंमत म्हणजे फायनलला गेल्यापासून अभिनव किती स्कोअर केला याकडे लक्षच देत नव्हता. त्याला फक्त त्याची रायफल, धरलेला नेम आणि समोरचा पिवळा गोल म्हणजे लक्ष्य दिसत होतं. त्याने जाणूनबुजून आपला सगळा फोकस अचूक वेध घेणं आणि नेम धरताना आपण चुका करत नाही ना यावर केंद्रीत केला होता. म्हणूनच फायनल संपली, अख्ख्या हॉलमध्ये भारतीयांचा जल्लोष सुरू झाला. पण, अभिनवला कोच गॅबीने सांगितलं तेव्हा कळलं की त्याने इतर कुठलं नाही तर गोल्ड जिंकलंय!

पण, हीच तर अभिनवची खासियत आहे. प्रत्यक्ष मेडल जिंकण्यापेक्षा ते जिंकण्याच्या प्रक्रियेवर त्याचा जास्त जीव आहे आणि म्हणून अभिनव वेगळा आहे. गोल्ड पटकावल्यावर तो भारतात परतला तेव्हा त्याची प्रतिक्रिया होती, '2008 ऑलिम्पिक फायनलमधले माझे शेवटचे दहा शॉट माझ्या आयुष्यातले सर्वोत्तम दहा शॉट होते. पण, तेव्हा मी निकाल काय लागेल याची चिंता करत नव्हतो. मला स्पर्धा, स्पर्धेची तयारी, माझं कौशल्य मी पूर्ण क्षमतेनं वापरतोय की नाही याची चिंता होती.

'प्रत्येक शॉट माझा सर्वोत्तमच असावा हा ध्यास तेव्हा मला होता आणि नशीबाने या ध्यासातून मला गोल्डही जिंकता आलं. पण, आजही मेडलपेक्षा माझा भर सरावाच्या अख्ख्या प्रक्रियेवर असतो.'

तुम्ही आताही या मेडलविषयी अभिनवशी बोललात तर तो तुम्हाला हेच सांगतो की, 'मेडलकडे बघून मी भावनाविवश होत नाही. पण, माझा 22 वर्षांचा नेमबाजीतला प्रवास आणि तो मी ज्या पद्धतीने केला याबद्दल मला अभिमान आहे.'

सर्वोच्च स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी

अभिनव आपल्या भावना फारशा उघड करत नाही. आठवणीत रमणारा तर तो मूळीच नाही. माझं काम मी केलं, या भाषेत तो मेडलविषयी बोलतो.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

पण, सर्वोत्तम कामगिरीचा त्याचा ध्यासही त्याने कधी लपवलेला नाही. किंबहुना मेडलपूर्वीची दहा वर्षं दर दिवशी सर्वोच्च स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचं स्वप्न बाळगूनच तो सकाळी उठत होता.

त्यामुळेच अधेमध्ये आलेली संकटं त्याने मनाला लावून घेतली नाहीत. तो नेमबाजीकडे वळला तेव्हाच त्याच्या दोन्ही डोळ्यांना उणे दोन नंबर होता. त्याने सराव वाढवला तेव्हा हा नंबर आणखी उणे चार इतका वाढला. शेवटी दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली. पण, त्याने खेळ सोडला नाही.

तसंच एक उदाहरण 2006च्या पाठीच्या दुखण्याचं. जड रायफल पेलवण्यासाठी पाठीचा कणा मजबूत असणं महत्त्वाचं. पण, नेमका अभिनवचा मणकाच दुखावला आणि रायफल हातात घेणंही कठीण झालं.

बीजिंग ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धाही तेव्हा सुरू झाल्या होत्या. पण, अभिनवने शारीरिक आणि मानसिक फिटनेससाठी कठोर मेहनत घेतली आणि तो दुखापतीतून तर बाहेर आलाच. शिवाय वर्ल्ड कपमध्ये गोल्ड जिंकत बीजिंगसाठी पात्रही ठरला.

गेली अनेक वर्षं अभिनवचे फीजिओथेरपिस्ट असलेले दिलबाग सिंग राणावत यावर म्हणतात, "अभिनवने स्वत:साठी एक लक्ष्य ठरवलं की, त्यासाठी तो प्रामाणिक आणि कटीबद्ध राहून प्रयत्न करतो. त्या दरम्यान जर दुखापती किंवा इतर शारीरिक अडचणी आल्या तर तो त्यांच्याशी अक्षरश: दोन हात करतो.

"त्याच्या सरावाला जसा जागतिक दर्जा आहे तसाच दुखापतींबद्दल केलेल्या उपायांनाही आहे. तो तंदुरुस्तीबद्दल जागरुक तर आहेच. शिवाय नेमबाजीसाठी आवश्यक शरीराच्या बायो-मेकॅनिकल ठेवणीवरही तो काम करतो."

ऑलिम्पिक मेडलनंतर आलेलं रितेपण

2008नंतर आता 13 वर्षं झाली. अजूनही अभिनव भारताचा एकमेव वैयक्तिक गोल्ड मेडल विजेता ॲथलीट आहे. बीजिंग नंतर तो लंडन आणि रिओ ऑलिम्पिकही खेळला.

लंडनमध्ये पात्रता फेरीत तो 594 गुणांसह सोळावा आला. कारण, त्यानेच काही मुलाखतींमध्ये कबूल केल्याप्रमाणे ऑलिम्पिक गोल्ड मिळवल्यानंतर त्याच्या कारकीर्दीत थोडं रितेपण आलं होतं.

गोल्ड तर मिळवलं आता पुढे काय असा प्रश्न त्याला पडला होता. त्याच्या मते, गोल्ड मेडल जिंकण्याचा आनंद काही सेकंद टिकला आणि पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा राहिला. पुढे 2010च्या राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये टीम प्रकारात गोल्ड जिंकल्यावर त्याने एक वर्षाचा ब्रेक घेतला.

त्याचाच परिणाम त्याच्या लंडनमधल्या कामगिरीवर झाला. रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिल्यावर तर त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निवृत्ती घेतली.

पण, देशातल्या क्रीडा विकासाला हातभार लावण्यासाठी सध्या तो भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या काही समित्यांवर सल्लागार आहे. केंद्र सरकारच्या 'टार्गेट ऑलिम्पिक पोडिअम स्कीम' या ऑलिम्पिकमध्ये मेडल विजेते खेळाडू तयार करण्यासाठीच्या योजनेत त्याचा सक्रिय सहभाग आहे.

आताही टोकियो ऑलिम्पिकसाठी गेलेल्या नेमबाजांवर त्याची नजर आहे. 15 नेमबाज वेगवेगळ्या प्रकारात आपलं नशीब आजमावणार आहेत आणि यंदा एकपेक्षा जास्त गोल्ड भारतीय टीम जिंकेल असा विश्वास अभिनवला वाटतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)