You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीसाठी शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. राज कुंद्रा यांना पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी अटक
पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. कुंद्रा हे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती आहेत.
मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. पॉर्न अॅप्स प्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं दिसत आहे.
यासंदर्भात त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे.
2. पोस्टरवर देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नव्या पुण्याचे शिल्पकार'
"आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त", अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या बॅनरवरुन आणि त्यांना नव्या पुण्याचे शिल्पकार म्हटल्यावरुन टोला लगावलाय.
या ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका बॅनरचा फोटोही टाकला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्स लागलेले पाहायला मिळत आहेत.
त्यावर नव्या पुण्याचे शिल्पकार, विकासपुरुष अशा उपमा फडणवीसांना देण्यात आल्या आहेत. त्यावरून त्यांचं ट्रोलिंग केलं जात आहे. 'टीव्ही9 मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
3. अदानी समूहातील कंपन्यांची सेबी चौकशी
अदानी समूहातील काही कंपन्यांची सेबी तसेच महसूल तपास संचालनालयामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
अदानी समूहातील काही कंपन्यांच्या गुंतवणुकीवरून समूहाचे मुख्य प्रवर्तक गौतम अदानी चर्चेत आले होते. याबाबत तपास नियंत्रणामार्फत चौकशी सुरू असल्याचे संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट करण्यात आले.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
दरम्यान, तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केले जात असल्याचे अदानी समूहाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. आक्षेप घेण्यात आलेले प्रकरण जुने असून याबाबत तपास यंत्रणांना हवी ती माहिती पुरवण्यात येत आहे, असंही कंपनीनं नमूद केलं.
मॉरिशसस्थित सहा फंडांमधील तीन गुंतवणूक खात्यांबाबत अदानी समूहाची चौकशी सुरू आहे. 'ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट' जारी करण्याच्या मुद्दय़ावरून 2016 मध्ये ही खाती गोठवण्यात आली होती.
4. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही- चंद्रकांतदादा
"ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावले. तरीही सरकारचे काही ओबीसी मंत्री सातत्याने खोटं बोलत आहेत.
"फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळू नये असा सरकारचा डाव आहे. मात्र भाजप याविरोधात संघर्ष करेल आणि हा डाव यशस्वी होऊ देणार नाही," असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीचा समारोप करताना पाटील बोलत होते. ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबवायची म्हणजे त्या वेळी मोठ्या संख्येने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहील असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न दिसतो.
मात्र भाजप हे यशस्वी होऊ देणार नाही. पक्षातर्फे ओबीसी जागर अभियान राबवण्यात येईल असंही पाटील यांनी सांगितलं.
5. दरवर्षी अब्जावधी खर्च करूनही मुंबईकरांना त्रास का?- नवनीत राणा
"मुसळधार पावसाने मुंबई तुंबली. ठाकरेंची तिसरी पिढी असफल राहिली आहे. मनपाचे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा झाले असून माझी मुंबई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे," अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
"मुंबईतील मिठी नदी स्वच्छता, गटारे साफ करणे, भूमीगत गटार योजना आदींवर दरवर्षी अरबो रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास का? असा संतप्त सवालही यावेळी राणा यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने संसदीय समिती स्थापन करून मुंबई महानगर पालिकेच्या या अवाजवी खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे म्हणजे यातील उधळपट्टी व नेमके लाभार्थी कोण? हे बाहेर येईल", असंही यावेळी राणा म्हणाल्या.
देशभरात मुंबईची होणारी बदनामी व मुंबई महानगर पालिकेच्या खराब प्रतिमेबद्दल आपल्याला अतिशय दुःख होत असल्याचंही राणा यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)