अखिलेश यादव: ओवेसींमुळे मुस्लीम मतांवर फरक पडणार नाही

फोटो स्रोत, Hindustan Times/getty images
- Author, मुकेश शर्मा
- Role, इंडिया डिजिटल एडिटर, बीबीसी न्यूज
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. या निवडणुकांसाठी आम आदमी पार्टी (आप) बरोबरच काका शिवपाल सिंह यादव यांच्या पक्षाबरोबर जुळवून घेण्याचीही तयारी समजवादी पार्टीनं दाखवली आहे.
सपाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यांशी बीबीसीनं खास बातचित केली. त्यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत वीजेसारख्या योजना आणण्याचे संकेतही दिले आहेत.
असदुद्दीन ओवेसींच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नं उत्तर प्रदेशात विधनासभा निवडणूक लढवल्यानं अल्पसंख्याक मतांवर फारसा फरक पडणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
विद्यमान भाजप सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचं अखिलेश यांनी म्हटलं आहे. तसंच सध्या उत्तर प्रदेशात काँग्रेसची स्वतःची अशी मतं नाहीत, त्यामुळं ते स्वतःच्या बळावर याठिकाणी यश मिळवू शकत नसल्याचंही ते म्हणाले.
अखिलेश यादव यांच्याबरोबरच्या चर्चेतील 13 प्रमुख मुद्दे...
1. सपाचा मोठ्या पक्षांबरोबरचा अनुभव चांगला नाही. त्यामुळं आता छोट्या पक्षांबरोबर निवडणुका लढवणार आहेत. छोट्या पक्षांना जागाही कमी द्याव्या लागतील. त्याउलट मोठे पक्ष जास्त जागा घेतात आणि जास्त जागांवर पराभूतही होतात. पण सपा आगामी काळात लहान पक्षांना सोबत घेऊन 350 जागा मिळवून विजयी होईल.
2. आम आदमी पार्टीला सोबत यायचं असेल तर जागा आणि उमेदवारांवर चर्चा करता जाईल. तसंच काका (शिवपाल यादव) यांचाही एक पक्ष आहे. त्यांच्याशीही चर्चा करू. त्यांच्या जसवंत नगर मतदारसंघात सपा उमेदवार देणार नाही.

3. भाजपचा पराभव जवळपास निश्चित आहे. त्यांनी 'संकल्पपत्र' कचऱ्यात फेकला. त्या संकल्प पत्रात तर योगीजींचा फोटोही नव्हता. सध्या शेतकऱ्यांचं उत्पन्न किती आहे आणि ते दुप्पट कधी करणार हा सरकारला प्रश्न आहे. भाजप गरीबांची मतं आणि उद्योजकांकडून पैसे घेतं, आणि सरकारी कंपन्यांची विक्री करतं.
4. युपीच्या सरकारनं आतापर्यंत केवळ आमच्या कार्यकाळात झालेल्या कामांची उद्घाटनं आणि नव्या कामांचा शुभारंभ एवढंच काम केलं आहे. पूर्वांचल एक्सप्रेस वे यांचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. पण अद्याप तोही पूर्ण झालेला नाही. तोही समाजवादी पार्टीच्या सरकारच्या काळात सुरू झाला होता.
5. कोव्हिडच्या काळातील कामाबाबत पंतप्रधान मोदींनी योगींच्या कामाचं कौतुक केलं. पण कोव्हिडच्या काळात सरकारला साफ अपयश आलं आहे. समाजवादी पक्षानं मोठं काम करूनही काही लोक आमच्यावर बाहेर न पडल्याचे आरोप करत आहेत. पण आम्ही ऑक्सिजन, औषधं आणि इतर अनेक प्रकारे मदत केली.
6. मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात समाजवादी पार्टीच्या सरकारनं तयार केलेल्या रुग्णालयांचेच दौरे केले. सैफई, बांदा, झाशी, गोंडा आणि गोरखपूरमध्येही कोव्हिडवर उपचार करणारी रुग्णालयं समाजवादी सरकारनंचं तयार केलेली होती.

7. मी लशीला भाजपची लस म्हटलं होतं तेव्हा सरकारनं घाईमध्ये निर्णय घेतला होता. तेव्हा डॉक्टरांनीही लशीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. आधी सरकारनं मजूर आणि गरिबांना लस द्यावी. लस घेणारा मी शेवटचा व्यक्ती असेल या भूमिकेवर मी आजही ठाम आहे.
8. सरकारनं वीज निर्मिती करण्याऐवजी वीज आणखी महाग केली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीजेसारख्या सुविधा दिल्यास अर्थव्यवस्थेला आपोआप गती मिळेल. अनेक पदं रिक्त आहेत. ती भरली तर 10 लाखांपेक्षा जास्त रोजगार तयार होतील.
9. समाजवादी सरकारनं वाटप केलेले 20 लाख लॅपटॉप लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना कामी आले. निवडणुकीत यावेळी काय घोषणा असतील हे आताच सांगणार नाही. अन्यथा भाजप त्याची कॉपी करून स्वतःच्या नावावर खपवेल.

फोटो स्रोत, Hindustan Times/getty images
10. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिराची निर्मिती होणारच आहे. मंदिर निर्माण होईल पण जमीन अधिग्रहण प्रकरणात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचं उत्तर भाजप किंवा ट्रस्टच्या सदस्यांनी द्यावं. ज्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यांची हकालपट्टी करावी अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा.
11. असदुद्दीन ओवेसींमुळं मुस्लीम मतांवर काही फरक पडणार नाही. उत्तर प्रदेशात आधीही असे पक्ष आले होते. पण अल्पसंख्याकांचा विश्वास समाजवादी पार्टीवरच आहे. कारण सपानं त्यांच्यासाठी काम केलं आहे. बंगालमध्ये फरक पडला नाही, तसंच इथंही होईल. भाजप आणि सपा यांच्यात थेट लढाई आहे.
12. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती सपावर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. पण नाराज तर आम्ही असायला हवं. कारण आमच्या कुटुंबातील सदस्यच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आणि बसपा तर शून्यावरून 10 वर पोहोचली. पण जुन्या गोष्टी काढण्यात आता अर्थ नाही.
13. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण शक्ती पणाला लावत आहे. पण त्यांच्याकडं कुणाची मतं आहेत? काँग्रेसची जी मूल्यं आहेत तीच अनेक बाबतींत भाजपचीही आहेत. काँग्रेस नेतृत्वाला राज्यात आणखी खूप काम करावं लागेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








