सपा-बसपात वितुष्ट आणणारं उत्तर प्रदेशचं 'गेस्ट हाऊस' प्रकरण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भरत शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेस्ट हाऊस प्रकरण समजून घेण्यासाठी थोडंसं इतिहासात डोकावण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात 1995 हे वर्षं आणि गेस्ट हाऊस या दोन्ही गोष्टीचं आगळं महत्त्व आहे.
1992 साली मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि भाजपचा वारू रोखण्यासाठी बहुजन समाज पक्षाशी हातमिळवणी केली.
सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांनी मिळून अनुक्रमे 256 आणि 164 जागांवर निवडणूक लढवली. यापैकी सपाने 109 जागांवर विजय मिळवला. त्याचवेळी बसपाने 67 जागांवर विजय मिळवला. मात्र दोन्ही पक्षांची युती फार काळ टिकू शकली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
1995 च्या उन्हाळ्यात या दोन्ही पक्षांमधील मैत्रीपूर्ण संबंध संपुष्टात आले आणि त्यामागे त्या गेस्टहाऊस प्रकरणाची महत्त्वाची भूमिका होती.
त्या दिवशी नक्की काय झालं?
त्यादिवशी गेस्ट हाऊसच्या बाहेर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान यांनी बीबीसीला सांगितलं की त्यावेळी मुलायम सिंह यांचं सरकार होतं. त्याला बसपाचा पाठिंबा होता. मात्र ते सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हते.
वर्षभर ही युती टिकली. त्यानंतर बसपा भाजपबरोबर हातमिळवणी करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. काही दिवसांतच मायावतींनी हा निर्णय सपाला सांगितला.
गेस्ट हाऊसमधील 'ती' बैठक आणि ऐतिहासिक वितुष्ट
ते म्हणाले, "या निर्णयानंतर मायावती यांनी गेस्ट हाऊसमध्ये आमदारांची बैठक बोलावली होती. सपाच्या लोकांना या बैठकीची माहिती मिळाली की बसपाने भाजपबरोबर संधान बांधलं आहे आणि त्या लवकरच सपाची साथ सोडणार आहेत."
प्रधान पुढे सांगतात, "माहिती मिळाल्यानंतर सपाचे अनेक लोक गेस्ट हाऊस समोर गोळा झाले. काही वेळाने जिथे बैठक सुरू होती तिथे उपस्थित असलेल्या बसपाच्या लोकांना मारहाण सुरू झाली. हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे."
"तेवढ्यात मायावती तिथल्या एका खोलीत जाऊन लपल्या. त्यांनी स्वत:ला आत कोंडलं. त्यांच्याबरोबर आणखी दोन लोकं होती. त्यात एक सिकंदर रिजवी होते. त्यावेळी पेजर प्रचलित होता. रिजवी यांनी मला सांगितलं की त्यावेळी पेजरवर सूचना आली होती की कोणत्याही परिस्थितीत दार उघडू नका."

फोटो स्रोत, Mehandi Hasan
"दरवाजा वारंवार वाजवला जात होता. बसपाच्या अनेक लोकांना जबर मारहाण झाली होती. त्यापैकी काही जण रक्तबंबाळ झाले होते. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते."
प्रधान यांच्या मते बसपाचे नेते तिथल्या स्थानिक पोलिसांना वारंवार फोन करत होते मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही.
...मायावती खोलीत लपल्या म्हणून वाचल्या?
"त्याचदरम्यान मायावती एका खोलीत लपल्या होत्या. सपाच्या लोकांनी ती खोली उघडण्याचा प्रयत्न केला. आत उपस्थित असलेल्या लोकांनी दरवाज्यावर सोफा आणि खुर्च्या लावल्या होत्या. जेणेकरून कडी तुटली तरी दरवाजा उघडणार नाही." प्रधान सांगतात.
ज्येष्ठ पत्रकार राम दत्त त्रिपाठी यांच्यामते उत्तर प्रदेशात घडलेल्या या नाट्याचे धागे दिल्लीशी जोडले होते. 1992 साली बाबरी मशीद पाडली गेली. त्यानंतर 1993 मध्ये भाजपाला थांबवण्यासाठी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिलं युतीचं सरकार स्थापन झालं. मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले.

फोटो स्रोत, Badrinarayan
त्यावेळी केंद्रात नरसिंह राव यांचं सरकार होतं. अटलबिहारी वाजपेयी तेव्हा दिग्गज नेते होते. सपा आणि बसपाची युती टिकली तर पुढे अडचणी येतील असं दिल्लीतल्या नेत्यांना वाटत होतं. म्हणून भाजपनं त्यांना ऑफर दिली की सपा शी युती तोडली तर मुख्यमंत्रीपदासाठी मायावतींना भाजप पाठिंबा देईल.
"मुलायम यांना या गोष्टीची कुणकुण लागली आणि त्यांना बहुमत सिद्ध करायची संधी मिळायला हवी. मात्र राज्यपालांनी तसं केलं नाही." त्रिपाठी सांगतात.
मायावतींना वाचवायला कोण गेलं?
ते पुढे म्हणतात,"या ओढाताणीत पक्षाच्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी बसपाने सगळ्या आमदारांना गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं होतं. मायावतीही तिथे होत्या. तेवढ्यात सपाचे लोक तिथे घोषणाबाजी करत पोहोचले."
बसपाचा असा आरोप आहे की सपाच्या लोकांनी तेव्हा मायावतींना धक्का दिला आणि सपाचे लोक त्यांना जीवे मारणार होते असा खटला दाखल केला. याच प्रकरणाला 'गेस्ट हाऊस प्रकरण' म्हटलं जातं.
भाजपाचे लोक मायावतींना वाचवायला तिथे गेले होते असं म्हणतात, मात्र शरत प्रधान यांच्या मते या दाव्यात दम नाही. ते म्हणतात, "मायावती प्रसारमाध्यमांमुळे वाचल्या. त्यावेळी गेस्ट हाऊसच्या बाहेर प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. सपाचे लोक तिथे प्रसारमाध्यमांच्या लोकांना हटवण्याचा प्रयत्न करत होते मात्र तसं झालं नाही."
"काही लोक मायावतींची समजूत काढायला सपा कडून पाठवले गेले. जेणेकरून मायावती दार उघडतील. मात्र त्यांनी तसं केलं नाही." प्रधान पुढे सांगतात.
'तो मला संपवण्याचा कट होता'
त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचे लोक राज्यपालांकडे गेले होते. त्यांनी सत्तेसाठी बसपाची साथ देणार असल्याचं सांगितलं. तेव्हा कांशीराम यांनी मायावतींना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं. तेव्हापासून मायावतींनी सत्तेच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
मायावतींनी त्या दिवसाबद्दल अनेकदा सांगितल्याचं प्रधान सांगतात . ते म्हणतात, "त्या अनेकदा याबद्दल बोलल्या आहेत. मला त्यांनी दिलेल्या अनेक मुलाखतीत सांगितलं आहे की त्या दिवशी त्यांना जीवे मारण्याचा कट होता. जेणेकरून बसपाला संपवता येईल."
त्या दिवशी गेस्ट हाऊस मध्ये जे झालं ते म्हणजे त्यांचा जीव घेण्याचा कट होता म्हणून मायावती सपा चा द्वेष करतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








