अखिलेश यादव यांना कोणत्या राजकीय धोक्याचा अंदाज नव्हता?

फोटो स्रोत, Twitter@yadavakhilesh
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी, लखनौ
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी समाजवादी पक्षाबरोबर युती कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यावर, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देताना आमची युती बराच काळ राहणार असं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यांची पहिली जबाबदारी स्वपक्षाच्या उमेदवारास विजय मिळवून देणं ही होती. बीएसपीला त्यांच्या उमेदवारांसाठी आवश्यक मतं गोळा करता आली नाहीत. त्याची कारणं सांगताना अखिलेश म्हणाले की, त्यांना या राजकीय धोक्याचा अंदाज आला नव्हता.
बीबीसी हिंदीला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत या युतीचं भविष्य आणि 2019 च्या निवडणुकीत विरोधी पक्षा पुढची आव्हानं या विषयावर सविस्तर चर्चा केली.
प्रश्न- मायावती यांनी 2019च्या निवडणुकांसाठी युती राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर, आपली प्रतिक्रिया?
उत्तर- राज्यसभेच्या निवडणुकीत जो निकाल लागला, त्यावरून त्या नाराज होतील असं वाटलं होतं. पण आता युती पुढे जाईल असा विश्वास त्यांनी दाखवला आहे.
त्यामुळे ही युती पुढे जाईल आणि जे उद्दिष्ट आहे ते साध्य होईल.
जे लोक सत्तेत आहे ते राज्यघटना आणि कायदा मानत नाही. त्यांना हटवण्यासाठी मदत मिळेल. जे लोक भ्रष्टाचार निर्मूलनाच्या गोष्टी करतात त्यांनी पैशाचा कसा वापर केला आहे ते पहा.

फोटो स्रोत, Getty Images
त्याशिवाय मायावतींनी अनेक सूचना केल्या आहेत. त्यांनी राजकारणात अनेक चढउतार बघितले आहेत. लोक कसे बदलतात हे त्यांनी जवळून पाहिलं आहे. राजकारणाचा मोठा पल्ला गाठण्यासाठी त्यांना दक्ष रहावे लागेल.
प्रश्न- त्यांनी दिलेल्या सूचनांचा तुम्ही विचार केला का?
उत्तर- कोणी आपल्याला सावध करत असेल आणि ते सत्याच्या जवळ जाणारं असेल, तर कोण कट कारस्थान करतंय, काय धोके आहेत ते कळू शकेल.
आमच्या सदस्यांना तुरुंगातून मतदानासाठी येऊ दिलं नाही. एकाच देशात एका राज्यासाठी वेगळा कायदा आहे, तर उत्तर प्रदेशासाठी दुसरा कायदा आहे. आमच्या आमदारानं मत देऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा कामास लागली होती. आमच्या आमदारांनी मत देऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी फिरोजाबादचा दौरा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा वैयक्तिक आदेश दिले होते.
प्रश्न- तुमच्याकडून रणनिती आखण्यात काय चूक झाली?
उत्तर- कोण कसा कट करेल याचा मला अंदाज नव्हता. त्यांच्या लोकांनी आमच्या लोकांना तोडलं. आमचा खासदार पळवला. एका आमदाराचं मत रद्द केलं. हरतऱ्हेचे कट करून आमदाराचं मत विकत घेतलं गेलं.
प्रश्न- तुम्ही मनात आणलं असतं तर तुम्ही परिस्थिती बदलू शकला असता. शेवटच्या क्षणी जर बसपाच्या उमेदवाराला जिंकवण्याचा निर्णय तुम्ही घेतला असता तर...?

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर- यावर माझं इतकंच म्हणणं आहे की, माझ्यावर माझ्या पक्षाची जबाबदारी होती. आम्हाला बरोबर मतं मिळत आहे, असं मला वाटत होतं. दोन मतं रद्द होतील याचा अंदाज मला नव्हता. कट शिजतोय हे माहिती नव्हतं. लोक आत जाऊन मत देत होते. आम्हाला सगळी मतं मिळतील, असा अंदाज होता. पण त्यांचा कट मोठा होता आणि आम्हाला तो नीटसा कळला नाही.
प्रश्न- पण मायावती तुमच्या चुका पोटात घालण्याबरोबरच गेस्ट हाऊसचं प्रकरण विसरण्याबद्दल बोलत आहे?
उत्तर- कट कारस्थानापासून सावध रहायलाच हवं हे आम्ही शिकलो आहे. मायावती अतिशय परिपक्व आहेत. त्यांना सगळं कळतं. गेस्ट हाऊस प्रकरणाचं सगळ्यात चांगलं उत्तर त्यांनी स्वत:च दिलं आहे. मी तेव्हा नव्हतोच आणि त्या पण आता त्या सगळं विसरून पुढे आल्या आहेत.
प्रश्न- 2019च्या निवडणुकांचा विचार केला असता सप आणि बसपमध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ कोण असेल?
उत्तर- राजकारणात ज्येष्ठ आणि कनिष्ठ असं काही नसतं. मायावतींना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. आम्ही अनुभवात कमी पडतो.
प्रश्न- याचा परिणाम जागा वाटपावर दिसेल का?
उत्तर- जागांचं वाटप समोर ठेवून आमची युती झालेली नाही. सध्या हा प्रश्न आमच्यासमोर नाही. जागांच्या वाटपाचा मुद्दा समोर आला तर कधी तडजोडच होणार नाही. आमचं लक्ष तडजोडीवर आहे. जागांच्या वाटपावर नाही. जेव्हा जागांचा मुद्दा समोर येईल तेव्हा त्यावरसुद्धा चर्चा होईल.
प्रश्न- विरोधकांचा सध्या कोणताच चेहरा नाही. तुमच्या मते विरोधी पक्षाचा चेहरा कोण आहे?
उत्तर- भाजपच्या मते सगळे पक्ष त्यांच्या विरोधात एकवटलेले आहेत. त्यांच्याकडून पुढे असंही म्हटलं जाईल की, भाजपची लढाई भाजपेतर पक्षांशी आहे, तसं जर असेल तर त्यात कोणीतरी चांगलं असेलच. आम्ही त्यातून निवडू.
प्रश्न- तुम्ही विकासाबरोबरच लोकसंख्येच्या प्रमाणात हक्कांबदद्ल बोलत असता. हा बदल कसा झाला?
उत्तर- मी स्वत:ला पुढारलेला समजत होतो. पण भाजपनं मला मागास केलं. मी मागास आहे पण प्रगतिशील आहे. मला असं वाटतं की, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लोकांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. कारण मागासवर्गीय आणि दलितांना फक्त 50 टक्के लोकांपर्यंत सीमित ठेवलं जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न- म्हणजे, आता तुम्ही सामाजिक न्यायाच्या लढाईवर लक्ष केंद्रित करत आहात?
उत्तर- त्या लोकांना आम्हाला हक्क द्यायचे आहेत, त्यासाठी आम्ही सतत संघर्ष करू. अतिमागास आणि दलितांना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी देऊ असं सांगतात, पण ती फक्त आश्वासनं आहेत. तुम्ही लोकांमध्ये किती भांडणं लावाल? त्यांच्यात किती फूट पाडाल?
प्रश्न- सप काँग्रेसच्या नेतृत्वात युपीएमध्ये राहणार, दुसऱ्या आघाडीत जाणार किंवा जी परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेणार?
उत्तर- कोणत्या प्रकारची आघाडी तयार होईल हे आता सांगणं अवघड आहे. आमच्या पक्षाचा जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न राहील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








