'मायावती तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट': वादग्रस्त उद्गारांनंतर भाजप आमदाराची माफी

फोटो स्रोत, Sadhana Singh FB/Getty Images
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या आमदार साधना सिंह यांनी माफी मागितली आहे.
बहुजन समाज पक्षाकडून साधना सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र चंदौली पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल करून घेतलेली नाही.
साधना यांनी एका सभेत मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्या म्हणाल्या होत्या, "आमच्या माजी मुख्यमंत्री आम्हाला स्त्री वाटत नाही, ना धड पुरुषही वाटतात. त्यांना स्वत:चा सन्मानही लक्षात येत नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं, त्यावेळी दुःशासनाकडून त्याचा बदला घेऊ, अशी प्रतिज्ञा तिने केली होती. द्रौपदी स्वाभिमानी महिला होती."
"एक ती महिला होती आणि एक ही आजची महिला आहे, जिने सत्तेच्या लालसेपोटी आपला संपूर्ण सन्मान विकून टाकला. आम्ही अशा महिलेचा तिरस्कार करतो, ती महिला जातीवर कलंक आहे. जिची एकेकाळी भाजपने अब्रू वाचवली होती, अशा मायावतीने सर्व सुख-सोयींसाठी, आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तिने महिलांची लाज गहाण ठेवली आहे. अशी बाई महिला जातीवर कलंक आहे, ती तर तृतीयपंथी लोकांपेक्षाही वाईट आहे," असं साधना सिंह पुढे म्हणाल्या.
याशिवायही साधना यांनी मायावती यांच्याविरोधात आणखी अनुचित उद्गार काढले होते. त्यांच्या वक्तव्यावरून वादंग झाल्यानंतर साधना यांनी सारवासारव करत माफी मागितली आहे.
माफीनाम्यात त्यांनी लिहिलं आहे, "2 जून 1995 रोजी गेस्टहाऊस कांड दरम्यान भाजपने मायावती यांना मदत केली होती. त्याची फक्त त्यांना आठवण करून द्यायची होती. त्यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या उद्गारांनी कुणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते."
राष्ट्रीय महिला आयोगानेही साधना यांच्या उद्गारांची दखल घेत, त्यांना नोटीस पाठवली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बहुजन समाज पक्षाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी साधना यांच्यावर जोरदार टीका केली. "हे उद्गार मनुवादी विचारांचं प्रतीक आहेत. भाजप उत्तर प्रदेशात झालेल्या 'महागठबंधना'मुळे किती घाबरला आहे, याचं हे द्योतक आहे."
साधना यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी बसपने केली आहे, असं ते पुढे म्हणाले.
दरम्यान, "आमच्याकडे तक्रार आली आहे. आम्ही विधायक साधना सिंह यांच्या वक्तव्याची सीडी मागितली आहे. आक्षेपार्ह उद्गार काढले असतील तर FIR दाखल करण्यात येईल. तूर्तास आम्ही उद्गारांची शहानिशा करत आहोत," असं चंदौलीचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी बीबीसीली सांगितलं.
बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चंदौलीतील बबुरी ठाण्यात FIR दाखल करून घेण्यासंदर्भात आंदोलनही केलं.
भाजप नेत्यांनी मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह उद्गार काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2016 मध्ये उत्तर प्रदेशातील पक्षाचे तत्कालीन उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी मायावती यांचं व्यक्तिमत्त्व 'एखाद्या सेक्स वर्करपेक्षाही खराब' असल्याचे उद्गार काढले होते.
या वक्तव्यावरून वादंग झाल्याने दयाशंकर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. दयाशंकर सिंह यांच्य पत्नी स्वाती सिंह मंत्री आहेत आणि दयाशंकर यांचं पक्षात पुनरागमन झालं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








